नाजूक प्रश्नांवर बायकांच्या मदतीला धावून येणारा ऑनलाइन आरोग्य संवाद

सोशल मीडियावरील गजबजाटात स्त्रियांच्या आरोग्याला महत्त्व देत त्यासंदर्भात जनजागृतीचं काम करणारे अनेकजण आहेत. कुणाशी बोलावं, कसं विचारावं असा संकोच बाजूला सारून ही मदत घेणंही सोयीचं आहे.

180

 

आज माझ्या बाळाला दूध पाजताना माझ्या स्तनाच्या अग्रभागी खूप वेदना झाल्या.’
‘‘मी उद्या प्रवास करत आहे. पाळीसाठी वापरायचा मेन्स्ट्रुअल कप नेमका कसा स्वच्छ करू?’ ‘फार धावावं लागतं माझ्या मुलीमागे तिनं जेवावं यासाठी. काय करू?’

एक काळ असा होता जेव्हा असे प्रश्न स्त्रिया शेजारणीला, आईला, सासूला किंवा मैत्रिणीला विचारत असत. अजूनही विचारतात. परंतु धावपळीच्या आणि  दगदगीच्या आयुष्यात या प्रश्नांची उत्तरं ‘गूगल’ करणं फार सोपं वाटायला लागलंय, नाही का? पंचाईत ही असते की गूगल फारच वरवरची, तुमच्या वैयक्तिक गरजा समजून न घेता उत्तरं देतो. कधी कधी घाबरवून टाकतो. पण सोशल मीडियाचा उत्तम वापर करीत स्त्रियांना त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधायला काही गट, व्यक्ती मनापासून प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियावरील बजबजाटात स्रियांच्या आरोग्याला महत्त्व देत काम करणारे काही दीपस्तंभ आहेत. आजच्या जगात, स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं त्यांची गरज खूप आहे.

गेल्या काही वर्षांपासून ‘लॅक्टेशन मॅटर्स’ या आपल्या फेसबुक पेजवरून डॉ. तरू जिंदाल ही तरुण डॉक्टर आणि स्तनपान तज्ज्ञ स्तनपानाविषयी मौलिक सल्ले देत आहे. स्तनपान नेमकं  कसं करायचं, का करायचं, पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचं दूध का द्यावं, कमीत कमी दोन वर्षं किंवा त्याहूनही अधिक काळ स्तनपान का करावं, बाळंतपणाच्या वेळी काय केल्यानं स्तनपान सोपं होतं, दूध कमी पडल्यास काय करावं यासाठी महत्त्वाची माहिती सोप्या शब्दात; परंतु शास्त्रीय आधार घेत पुरवीत आहे. गावोगावच्या नर्सना स्तनपानाची योग्य माहिती ती पुरवते तसेच डॉक्टरांना स्तनपान तज्ज्ञतेचे धडे देते; परंतु त्याबरोबरच स्तनपानाचे प्रश्न असणा-या स्त्रियांना त्यांच्या गावातल्या तज्ज्ञाशी जोडून द्यायचाही प्रयत्न करते.

लहान मुलांच्या वयाच्या तिस-या ते पाचव्या वर्षांपर्यंत त्यांना कोणतं अन्न द्यायचं, ते देताना कशा पद्धतीनं दिलं तर मुलांना अन्नाची आवड निर्माण होते, अशा असंख्य प्रश्नांनी आई बेजार झालेली असते. नोकरी करणार्‍या, घरकामानं थकून गेलेल्या आईला मोबाइलवर गाणं लावून मुलाला पटापट खाऊ घालणं सोपं वाटू शकतं. याचा परिणाम मुलाच्या वागण्यावर आणि खाण्यावरही होतो. आईसुद्धा लहानग्यांच्या वाढत्या हट्टीपणानं आणि खाण्याच्या तक्रारीनं त्रस्त असते. अशा आईसाठी अतिशय उपयुक्त असणारे ‘बेबी लेड विनिंग’ची उपयुक्त पद्धत समजावणारे कित्येक ब्लॉग्ज आणि फेसबुक तसेच व्हॉट्सअँप सपोर्ट ग्रुप स्त्रियांसाठी वरदान ठरत आहेत. फेसबुकसारख्या माध्यमावर ‘सस्टेनेबल मेनस्ट्रय़ुएशन’वर आधारित सपोर्ट ग्रुप असेच महत्त्वाचे कार्य करीत आहे. पाळीच्या दिवसात सॅनिटरी पॅड वापरल्यानं कचरा वाढतो, जो सार्वजनिक आरोग्यास धोकादायक असतो. चांगल्या दर्जाचं कापड तयार करणं, ते वापरताना घ्यायची काळजी, येणा-या अडचणी, पाळीसाठी वापरायचा सिलिकॉन कप, ते धुताना आणि बाहेर वापरताना कसा वापरायचा असे अनेक नाजूक प्रश्न या ग्रुपवर बायका बोलू शकतात. भारतात जरी संख्या कमी असली तरी ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडामध्ये अशाच प्रकारचे सोशल मीडियावरील मेनोपॉज सपोर्ट ग्रुप तसेच स्त्रियांकरिता खास कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहेत.

स्त्रियांसाठीचं खास कार्ड’ तयार करून भारतातील काही मोबाइल कंपन्यांनी खास स्त्रियांकरिता एक विशेष सुविधा सुरू केली. अनेक स्त्रियांना बाहेरगावी गेल्यास, कुणाशी फोनवरून बोलून संपर्क करणं अशक्य झाल्यास किंवा मोबाइल फोनसाठी भरलेली पूर्व रक्कम संपल्यास मदतीकरिता फोन वापरणं निव्वळ अशक्य होतं. या कार्डद्वारे स्त्रियांना गरजेच्या वेळी ‘मला ताबडतोब संपर्क करा’ अशा आशयाचा मेसेज तीन जणांना पाठवता येतो.  स्त्रियांच्या मनावरचा ताण कमी होण्यात अशा सुविधांची मोठी मदत मिळते.
सोशल मीडिया, मोबाइल फोन यामुळे आरोग्य-संवादाची नवी दारं  स्त्रियांकरिता खुली झाली आहेत !

 गरजेला धावून येणारे स्तुत्य उपक्रम 

अर्थात अनेक स्रियांकडे मोबाइल फोन नसतो किंवा असल्यास त्यावर ‘फेसबुक’ किंवा व्हॉट्सअँपसारख्या सुविधा नसतात. परंतु तरीही अशा स्त्रियांना एकमेकींशी जोडण्याकरिता जगभरात प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानात स्री आरोग्यसेविकांना आणि  गावातील महिलांना फोनद्वारे जोडण्याचा एक महत्त्वाचा उपक्र म राबविण्यात आला. स्वस्त दरातील मोबाइल आणि कार्डमध्ये भरलेले पैसे या दोन गोष्टींमुळे बाळ आजारी असल्यास, औषध संपल्यास, आई आजारी असल्यास तत्परतेनं आरोग्यसेविकेला बोलावणं या उपक्रमातून शक्य झालं. असे लहान प्रमाणावर राबवलेले उपक्रम सामाजिक आणि स्त्री आरोग्याच्या क्षेत्रात नवीन आशा निर्माण करीत आहेत.

(लेखिका सार्वजनिक आरोग्य विषयाच्या अभ्यासक आहेत)

बातमीचा स्त्रोत : http://www.lokmat.com/sakhi/online-health-dialogue-helps-women-deal-their-delicate-problems/

 

Comments are closed.