जोडीदाराची विवेकी निवड – निशा फडतरे
‘लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात’ असं एक गृहीतक च समाजात रूढ आहे. या बांधलेल्या गाठी मग कधी कच्च्या तर कधी पक्क्या अशा पण असतात का ? मनात सहज प्रश्न येतो, ज्या व्यक्तीला आपण पूर्णपणे ओळखत देखील नाही अशा व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं? साहजिकच मोठ्यांच/पालकांचं म्हणणं पडतं की, पूर्वीपासून हेच चालत आलंय आणि आम्ही नाही का केलं? पण चुकीची गोष्ट पूर्वीपासून चालत आलेय म्हणून आपण तशीच करायची का? आपण सूज्ञ नागरिक म्हणून योग्य परिचय आणि पडताळणी करून लग्नाचा निर्णय घ्यायला नको का ? स्वतःचं करियर निवडताना अगदी लहानपणापासूनच तयारीला लागलेले आपण लग्नाचा निर्णय मात्र ‘वेळ आल्यावर पाहू’ इतकं निष्काळजी कसं काय असू शकतो ?
सर्वसाधारणपणे आपल्या समाजात लग्न जुळवण्याच्या दोन पद्धती असतात अरेंज मॅरेज आणि लव मॅरेज.
अरेंज मॅरेज पाहता यामध्ये पालकांचा सहभाग जास्त असतो. यात मुलामुलींना एकमेकांना ओळखायला फारसा वाव मिळत नाही. आणि मिळालाच तर तो कांदेपोहेच्या वेळी गच्चीत मिळालेली 10 मिनिटे. ड्रेस घेताना देखील तासंतास लावणारे लोक या १० मिनिटांत आयुष्याचा जोडीदार कसा बरं निवडू शकतील? आणि मग इथंच खरी कसोटी लागते.
लव मॅरेज, प्रेमविवाह हे ऐकायला गोड वाटत असेल पण यातही तितक्याच त्रुटी आढळतात. फक्त दोघांनीच यात विचार केलेला असतो. पालकांचा सहभाग कुठेच नसतो त्यामुळे पालकांची नाराजगी असतेच बऱ्याचदा. आणि अगदी विचार करून घेतलेला हा निर्णय असतोच असे नाही. कधी आकर्षणातून प्रेमात पडून सुद्धा हा निर्णय घेतलेला असतो. या प्रेमावर आम्ही चांगलं आयुष्य जगू शकू असं आधी वाटत राहतं. पण खऱ्या अडचणी लग्न झाल्यावर जाणवायला लागतात.
आता या दोन्हींना देखील काही पर्याय आहे का? लव मॅरेज आणि अरेंज मॅरेज या दोन्हींना एकत्र घेऊन पालक आणि मुलं यांना वेगळा काही मार्ग दाखवता येईल का? जिथं पालकांचा आणि मुलांचा दोघांचाही सहभाग असेल? हो. आणि याचं उत्तर मिळालं ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरु केलेल्या जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमातून. परिचय विवाह हा उत्तम पर्याय आपल्याला या ठिकाणी भेटतो आणि यालाच आपण जोडीदार निवडण्याची विवेकी प्रक्रिया असं म्हणतो. गेली अनेक वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जोडीदाराची विवेकी निवड हा उपक्रम चालवते. गेली सव्वा वर्ष व्हाट्स अँप सारख्या प्रभावी मीडियाच्या माध्यमातून हा उपक्रम तरुणांच्या समोर आलाय. आरती नाईक ,सचिन थिटे आणि महेंद्र नाईक हे महाराष्ट्र अंनिस चे कार्यकर्ते व याच उपक्रमात सुरवातीपासून सहभागी असलेले दिक्षा काळे, सतीश उगले आणि निशा फडतरे अशी सम्पूर्ण टीम हा उपक्रम लग्नाळू तरुण तरुणींसाठी चालवत आहेत.
उपक्रमातील म्हवत्वाची वैशिष्ट्ये :-
- लग्नाळू तरुण तरुणी व पालक यांच्यासाठी लग्न या विषयांवर संवादशाळा
- लग्नाळू तरुण तरुणींसाठी ऑनलाईन प्रशिक्षण व्हॉट्स अप च्या माध्यमातून.
- पालक आणि मुलं यांच्यासाठी सवांद केंद्रे.
- लग्न या विषयाला धरून पालक आणि मुलं यांच्यात सवांद असायला हवा म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांची आणि मुलांची सवांद शाळा घेतली जाते.
याशिवाय पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन लग्नाबद्दल वेगळा विचार करू पाहणाऱ्या तरुणांसाठी व्हाट्स अप ग्रुप चालवला जातो. साधारण ५० दिवसांचा हा ग्रुप आहे. यामध्ये लग्न ,सहजीवन, स्वतःची ओळख अशा बऱ्याच विषयाला धरून प्रश्न विचारले जातात. रोज एक प्रश्न आणि त्या प्रश्नावर चर्चा असा हा तरुणांचा लाडका उपक्रम आहे. या उपक्रमातून लग्न जमवली जात नाहीत पण लग्न या विषयावर सर्वाना आपली मतं मांडण्यासाठी हा एक हक्काचा मंच आहे. जोडीदार हा पत्रिकेतील गुण पाहून न निवडता तुमचे विचार, आवडी निवडी, भविष्यातील स्वप्न अशा विषयांवर चर्चा होऊन निवडायला हवा असा हा मार्ग या उपक्रमाने दाखवला आहे.
यासाठी एक आधुनिक कुंडली देखील आहे ती जुळणं अधिक महत्वाचं.
कुंडलीतील क्रम:- परस्पर पसंती, जबाबदारी पेलण्याची क्षमता, हुंडा विरोधी आहे का, सवयी व्यसने, आवडी निवडी स्वभाव, परिपूर्ण माहिती, भविष्यातील स्वप्नं, वैद्यकीय तपासणी, आनुवंशिक रोग
या आणि अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करून संपूर्ण परिचयातून झालेला असा ‘परिचय विवाह’ म्हणजे जोडीदाराची खरी विवेकी निवड असेल. “या उपक्रमात आल्यापासून आम्हाला आमची खरी ओळख झाली असं इथला प्रत्येक सहभागी आवर्जून सांगतो.” आणि अनेकांना याचा वैयक्तिक आयुष्यात खूप फायदा झाला. लग्नासारख्या विषयावर गप्प राहण्यात आणि मग नातं जोडण्यात काहीच अर्थ नाही. म्हणूनच ‘चुप्पी तोडो और रिश्ता जोडो’
वरील उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क:
निशा – 9922596158
दीक्षा – 9960258589
सचिन- 9619608572
सतिश – 9833120228
(व्हाट्स अप उपक्रमात सहभागी होण्यासाठी फोनवर मुलाखत घेतली जाते आणि मगच या ग्रुपमध्ये प्रवेश मिळतो) –
निशा फडतरे
जोडीदाराची विवेकी निवड टीम
Very efficient project it will help many responsible citizens of our society
Thanks a lot… Please give your suggestions and feedback to make it better…
group band ahe je mobileno. dilet tech whsts app vr nhit,,mg try kasa krycha tumvhyshibolnycha ki call karava lagel
कृपया निशा- 9922596158 या नंबरवर फोन करा आणि याविषयी विचारा.