मैं ऐसा क्यूं हूँ? – शरीराची प्रतिमा

0 354

माझी उंची कमी हवी होती, माझे केस जरा अजून दाट हवे होते. माझ्या अंगावर फार केस आहेत किंवा मला एकदम सलमान खानसारखी बॉडी बनवायची आहे. बऱ्याच मुलींना करीनाची झीरो फिगर हवीहवीशी वाटत असते आणि बरीच मुलं आरशात हृतिक किंवा सलमान किंवा अरनॉल्ड पाहत असतात. सगळ्यांना आवडणाऱ्या हिरो, हिरॉइन, खेळाडूप्रमाणे आपलं शरीर हवं असं सगळ्यांना वाटत असतं. आपल्या शरीरात काही तरी कमी आहे असं वाटायला लागतं आणि ते आवडेनासं व्हायला लागतं. टीव्ही, सिनेमात, जाहिरातीत दिसणाऱ्या माणसांसारखं बनायची धडपड सुरू होते. गोरं होण्यासाठी धडपड, बॉडी वाढवण्यासाठी धडपड, पिंपल्स घालवण्यासाठी, केस एकदम सुळसुळीत व्हावेत म्हणून…फक्त धडपड.

आपल्या शरीराबद्दल आपल्या मनात चांगली प्रतिमा असेल, आपलं शरीर, आपणं कसं दिसतो हे जर आपल्याला आवडत असेल तर आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्या शरीराची काळजी घेणं आणि सुंदर दिसावंसं वाटणं ही चांगलीच भावना आहे. पण त्यासाठी आधी काळजी म्हणजे काय आणि मुख्य म्हणजे सुंदर कशाला म्हणायचं ते ठरवायला पाहिजे.

आपण जसे आहोत, जे आहोत ते सुंदर आहोत. टीव्हीवरच्या, सिनेमातल्या, फॅशन शोमधल्या मुलींसारखं असणं म्हणजे सुंदर हे का मान्य करायचं? उष्ण प्रदेशात राहत असताना शरीराचं सूर्यापासून रक्षण करणारा आपला काळा रंग का वाईट मानायचा? मॅचो, सिक्स पॅक म्हणजेच भारी असं का? हे प्रश्न स्वतःला विचारू या. शरीराबद्दल नक्की बोलू या. सुंदर राहण्याचा प्रयत्नही करू या पण तो स्वतःसाठी, स्वतःच्या मर्जीने.

 

खाण्याविषयीच्या समस्या (अनोरेक्झिया, बुलिमिया)

खायला पुरेसं अन्न न मिळाल्याने होणारं कुपोषण एकीकडे तर आपण जाड तर होणार नाही ना, आपलं वजन वाढणार नाही ना या भीतीने केलं जाणारी उपासमार दुसरीकडे. ही अशा प्रकारची उपासमार केल्याने जे काही शारीरिक मानसिक आजार निर्माण होतात त्या सगळ्याला मिळून अनोरेक्झिया नर्वोसा म्हणतात. वजन वाढायच्या भीतीने भूक लागत नाही, खाल्लेलं पचत नाही, विविध प्रकारे ते काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.

या आजाराचा शोध सर डॉ. विल्यम गल यांनी 1872 मध्ये लावला. पण गेल्या 3 दशकांपासून तो जास्त चर्चेत आला. फॅशन इंडस्ट्री आणि मॉडेलिंगच्या व्यवसायाने मुलींच्या शरीराची साचेबद्ध प्रतिमा तयार केली. बारीक, अगदी हाडं दिसणारी अशी ही प्रतिमा या क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक अट बनलीच पण तिचं लवकरच एका फॅडमध्ये रुपांतर झालं. समस्या इतकी गंभीर बनली की विदेशातल्या आणि आपल्या देशातल्याही अनेक मुली आपलं शरीर त्या प्रतिमेत बसवताना स्वतःचीच उपासमार करून घेऊ लागल्या. अखेर फॅशन इंडस्ट्रीला या सर्वांची जबाबदारी स्वीकारून अशा अति बारीक असणाऱ्या मॉडेल्सना नकार द्यावा लागला आणि आम्ही अशा प्रकारच्या अतिरेकी डाएटच्या विरोधात आहोत हे पुढे येऊन सांगावं लागलं.

 

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.