प्रिय, काळ्या रंगाची मुलगी _ अरुंधती गडाळे

अगं खरंच तू माझ्यासाठी प्रियच आहेस आणि हो जगाला तुझा जो काळा रंग आवडत नाही न त्याच रंगामुळे तू मला प्रिय आहेस. अगं, माझ्या घरातल्या छोटीने पण मला एकदा विचारलं, “दीदी मी लहान होती तेव्हा काळी होते का ग?” चार वर्ष वयाच्या मुलीचा हा प्रश्न. स्वतःला सावरतच मी तिला उत्तरले, “कोण बोललं ग तुला असं, वेडे आहेत ते, तू तर सर्वात सुंदर मुलगी आहेस माहिती आहे का तुला.. तू बेस्ट डॉल आहेस… ती खुश झाली. सुंदरतेच्या फालतू, थुकरट संकल्पनेचं बीज आज कोवळ्या मनात पेरलं गेलं होतं. त्या बीजाची विषारी गोडी तिच्या पायात आयुष्यभर राहील.. तीच बेडी तिच्या मनाला जखडून टाकेल या फालतू सुंदरतेच्या व्याख्येनं. किती तकलादू आणि खोटं आहे सगळं… आणि बाहेर चर्चा चालू आहे, आपण एकविसाव्या शकतात आलो आहोत याची … जग कसं बदलतं आहे याची … मला तरी हा बदल दिखावटी वाटतो, जाहिराती करण्यापुरता… त्या जाहिरातीत देखील  मुली असतात, नाही का !

जाहिराती सांगत असतात चांगली नोकरी हवी, गोरी हो ; चांगला नवरा हवा, गोरी हो;  प्रमोशन हवं, गोरी हो ; कॉलेज मध्ये मित्र हवे, गोरी हो ; आत्मविश्वास हवा, गोरी हो ; सिनेमात जायचं असेल तर गोरी असशील तर अजून गोरी हो, एकंदर मुलीला तिच्या बुद्धीमत्तेनं जे जे मिळवता येईल तसे ते न मिळवता तिच्या गोऱ्या रंगाने खूप कमी कष्टानं मिळेल. हे या भिकार जाहिरातींमधून दाखवतात आणि हे फक्त गोऱ्या रंगाविषयीच नाही बरं का ! तर तुझं वजन किती असावं, तुझी छाती, तुझं पोट सपाट हवं त्यासाठी तू न- खाता मरणाच्या दारात डायट करून गेलीस तरी चालेल यांना, तुझे केस, तुझे डोळे हे पण त्यांना जाहिरातीतील मुलीसारखे हवे असतात. नाही तसंच साचेबंद जगावं, बनावट जगावं म्हणूनच ही जाहिरातबाजी चालवलेली आहे. वर्षानुवर्षे आणि तू पण अडकली आहेस यांच्या या जाळ्यात. त्यांना तुझी विचारशक्ती नाहीशी करायची आहे. त्यांना तुझे प्रश्न नको आहेत त्यांना तुला शोभेची बाहुली बनवायची आहे. तू जर दिसायला यांच्या सुंदरतेच्या कल्पनेत बसणारी नसशील तर तुला समाजामध्ये वावरण्याचा हक्क ही हे हरामखोर नाकारतील. काही नाकारताच ! मलाही मी लहान होते तेव्हा आणि आत्ता देखील माझ्या दिसण्यावरून, काळ्या रंगावरून हिणवलं जातं.

त्या ४ वर्षाच्या मुलीचा प्रश्न माझ्या जखमांवरची खपली काढत होता. मला माझ्या बालपणात घेऊन जात होता. तिचा प्रश्न माझ्या डोक्यातून जातंच नाही ! मला अस्वस्थ करतो आहे… मी आज जशी आहे त्यात या काळ्या रंगाचा खूप मोठा वाटा असावा असं मला नेहमी वाटतं. इतकं की मी देखील माझा द्वेष करू लागले होते. काळा रंग असणाऱ्यांना जगण्याचा हक्क नाही असं वाटावं इतका या सगळ्याचा माझ्या मनावर होता. मी कमी बोलते असं खूप लोकांना वाटतं, हो मी मानसं टाळते. मला भीती असते ते माझ्या रंगावर बोलतील, मला भीती असते ते माझ्या चष्म्यावर बोलतील, ते माझ्या नाकावर बोलतील याची भीती असते. मग मी त्यांना टाळते. मला अजून एक खात्री असते ती म्हणजे ते माझ्या विचारांवर बोलणार नाहीत ते माझ्या बुद्धीवर बोलणार नाहीत कारण मुलींच्या शरीरावर बोलायचं, त्यांच्या दिसण्यावर बोलायचं. बोलायचं झालं तर पुरुषांच्या बुद्धीविषयी बोलायचं. हुशार हा फक्त पुरूषच. त्याला आपल्या सुंदरतेने रीझवायचं काम स्त्रीकडे आणि तसं तिला नाही करता आलं तर हा तिच्या दिसण्याचा दोष बरं का ! नाही तर सल्ले तयार असतात. फेअर अँड लवली लावण्याचे, पार्लरमध्ये जात जा म्हणायचे आणि हे सांगणाऱ्या स्त्रिया जास्त ! याचं वाईट वाटतं. असो, म्हणून मी टाळते लोकांना.

माझा रंग, रूप लोकांना भावणार नाही याची जाणीव करून देणाऱ्या माझ्या मैत्रिणीच तर होत्या. मित्र नव्हते. कारण मुलांना जशा मुली मैत्रिणी म्हणून हव्या असतात तशी तर मी आजिबात नाही. माझ्या तथाकथित सुंदर मैत्रिणींच्या अंगरक्षकाची भूमिका बजावायचे. त्यांना मुलं छेडतात, प्रपोज करतात. बिचाऱ्या ! त्यांच्या सुंदरतेमुळे किती त्रास सहन करतात ना ? त्यांच्या दृष्टीने मी सुंदर नाही म्हणून मला अशा प्रकारचा कुणी त्रास देत नसावे.

मुलांना बायको ही गोरी हवी असते. स्वतः कसे आहेत हे आरशात बघायला विसरत असावेत बहुतेक. बायको त्यांना बायको म्हणून नाही तर मित्र, नातेवाईक यांच्यासमोर मिरवणारी सुंदर (?) बाहुली म्हणून हवी असते. इतकं सगळं लिहूनही मी आशावादी नाही की हा समाज सुधारेल, अजूनही मला भीती आहे माझा रंगावरून, माझ्या दिसण्यावरून मला नाकारले जाईल. नोकरीत सुंदर, गोऱ्या रंगाच्या मुलीला माझ्या आधी प्रमोशन मिळेल फक्त तिचा रंग बघून (जात ही रंगाच्या आधी बघितली जाते ! असो हा वेगळा मुद्दा आहे.) त्यात आता लग्नाचं वय…

मी झगडते स्वतःशी. समजावत असते स्वतःला रंगात काही नसतं म्हणून. तसंही जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला फसवणं जास्त सोपं वाटतं. पण चामडीच्या रंगात खूप काही आहे याची जाणीव करून देणारे रोज भेटत असतात आयुष्यात, मग काय जगायचं नाही असं थोडीच आहे ? मग स्वतःशी एक मस्त गाणं गुणगुणावं… मी कशाला आरशात पाहू गं………..

साभार: ‘मिळून साऱ्याजणी जुलै २०१६’ या मासिकातील अरुंधती गडाळे लिखित ‘प्रिय, काळ्या रंगाची मुलगी’ या लेखातील काही भाग 

चित्र आभार : http://www.bbc.com/news/world-asia-india-36136965

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. Ravindra More says:

    Cheharyavaracha kala spot ha daivy chamatkar ahe. Tyababat charcha karane kiva manat katuta anane mhanaje Devacha apaman kelyasarkhe hoil. Tyamule jyana ha Prasad milala ahe tyani tyacha anandane swikar karnech yogya tharel.

    • I सोच says:

      आजूबाजूचे लोक आनंदाने स्वीकार करू देत नाहीत हे वास्तव आहे. बऱ्याच जणांचा काळा रंग असल्याने वेगळी वागणूक मिळत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap