Home / प्रेम Frame / ब्रेक-अप के बाद…

ब्रेक-अप के बाद…

मी तिच्यात आणि ती माझ्यात मैत्रीपेक्षा जास्त इन्व्हॉल्व आहोत, हे आम्हा दोघांनाही वेळोवेळी जाणवत राहिलं… पण ‘पहिले आप… पहिले आप’ अशा नवाबी थाटात दोघंही मनातल्या मनात एकमेकांवर प्रेम करत राहिलो. पण शेवटी, भारतीय परंपरेप्रमाणे मी तिला प्रपोज केलं. (सिनेमातसुद्धा मुलानेच विचारायचं असतं…)  तिचं उत्तर यायला दोन तीन दिवस गेले, तसं माझं टेन्शन वाढलं, पण चौथ्या दिवशी कन्फर्मेशनचा मेसेज आला. मला ज्याची खात्री होती तेच झालं आणि विशेष म्हणजे तिच्या आई- वडिलांनीही आमचं नातं स्वीकारलं.

आता तर काय, गोष्टी फारच बदलल्या होत्या. आमची नवी ‘कपल’ ही ओळख आम्ही स्वीकारली होती. आम्ही दोघंही एकमेकांना राजा/ वेडू/सोनू/ मनू/ राणी अशा टिपिकल गुडी गुडी नावाने हाका मारत होतो. पुढचे चार-साडेचार महिने आमचं छान चाललं होतं. छोट्या छोट्या चौकाश्यांपासून ते मोठ्या सजेशनपर्यंत आणि रुसण्यारडण्यापासून ते मनवण्यापर्यंत सगळे रोमँटिक आजार आम्ही एन्जॉय केले.

मग १५-२० दिवसांसाठी शिवानी बिझी होती. मी तिच्या फोनची वाट पाहत होतो. आणि आता तर आम्ही ऑफिशियली प्रेमात असल्याने पझेसिवनेसचा ज्वर आम्हा दोघांनाही चढू लागला होता. असंच एकदा मी १५- २० दिवस बिझी असताना फोन न करता आल्यामुळे, मला अर्धा तास ऐकून घ्यावं लागलं होतं… अगदी मला फोन का केला नाहीस??? पासून ते ‘जेवत जा रे बाळा वेळेवर….आता तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस पूर्वीसारखं’ पर्यंत….

आता मला अशी संधी चालून आली तेव्हा मी फोन केला, तेव्हा तुटक उत्तर देऊन फोन ठेवला आणि मी परत विचारलं तेव्हा ती म्हणाली, ‘जरा पर्सनल आहे, तुला नाही सांगू शकत’. इतरवेळी पर्सनल स्पेसचा पुरस्कर्ता असणाऱ्या माझ्यातल्या माणसावर एका पझेसिव्ह बॉयफ्रेंडनी ताबा मिळवला होता. हरप्रकारे मी माझ्या तिच्यावर कसं प्रेम आहे आणि मी तिची किती काळजी करत होतो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होतो. चार दिवसांनी तिचे पत्र आले, ज्यात तिनं लिहिलं होतं…

प्रिय अनुराग,

मी काही दिवस बिझी होते, ही माझी चूक असेल कदाचित. पण तूही नंतर पझेसिव्ह वागलास, त्याचा मला त्रास झाला. आज मी तुझ्यामध्ये एका विचित्र पद्धतीने इन्व्हॉल्व आहे. मी स्वतःला हरवतेय/गमावतेय. म्हणजे मी आज प्रत्येक गोष्ट करताना तुझा विचार करत असते… म्हणजे हे केलं तर अनुराग काय म्हणेल, ते केलं तर अनुरागला काय वाटेल, अशा प्रकारे गोष्ट तुझ्याशी माझ्या नकळतच जोडली जातेय…ते मला नकोय…म्हणजे सिनेमाच्याच भाषेत म्हणायचं झालं तर जब वी मेट मधल्या करीनाची सेकंड हाफ मध्ये एकदम अलका कुबल झाल्यासारखं वाटतंय ! त्यामुळे आपण इथेच थांबू या… कायमचं…मला विसर वगैरे म्हणणार नाही कारण तुला विसरणं मलाही कठीण जाणारेय…छान जग, मजा घे… आहेस तसाच रहा…आपण जे काही जादुई शेअर केलं…ते खूप छान होतं…ते मला बरंच काही शिकवून गेलंय…मी थांबते… बाय… टेक केअर…

– शिवानी

तिचं पत्र वाचून तत्क्षणी खूप दु:ख झालं. मला पहिले काही दिवस तिच्या पत्राचा अर्थच उमगला नाही. ‘आपण थांबू या इथे’ यापेक्षा ‘कायमचं’ या शब्दाचा जास्त त्रास झाला. किती एकाएकी संपलं आमचं नातं… शिवानीने सांगितलेलं सत्य हे अर्धसत्य आहे, हे समजलं…. काहीतरी सांगायचं राहिलंय, हे समजलं… परंतु, ते नक्की काय आहे हे कधी तपासून पाहिलं नाही. एखादं नातं असं अचानक का संपलं याचा विचार करत मनाला कोडी घालत बसू नये तर यापुढची नाती कशी टिकवता येतील याचा विचार करावा याची जाणीव व्हायला लागली होती. शिवानीने फार मोठी चूक केली, ‘तिने माझी माफी मागायला पाहिजे’ असंही वाटलं. पण मग स्वतःलाच म्हंटलं,’ अरे ती एवढं तरी सांगून गेली. तेही काही कमी नाही.’ या नात्यानं मला बरंच काही शिकवलं हे मात्र नक्की.

या नात्यानं मला माझ्या ‘पर्सनल स्पेस’ च्या संज्ञेचा पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं. ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ म्हणजे एकमेकांच्या मतांचा आदर करून एकत्र वा वेगळं राहणं याचा अर्थ आता उमगायला लागला होता. ट्रकमागे लिहिलेलं, ‘सुरक्षित अंतर ठेवा’ हे वाक्य माणसांसाठी असतं हे मला या नात्यानं शिकवलं. खरा पुरुषार्थ स्वतःला सिद्ध करण्यात नसून तो सारासार विचार करून निर्णय घेण्यात आहे, हेही मला यामुळं उमगलं. तिनं सांगितल्याप्रमाणे मी छान एन्जॉय करणारय. मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात शिवानी नक्कीच लक्षात राहणारेय. पण म्हणून मी, ‘मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही’, ‘जिउंगा तो उसके यादों के साथ’ असे ‘दिलजले’ ‘आशिकी’ विचार मी करत नाही. किंवा ‘वो मेरी नही हुई तो मै उसे भी किसी का नहीं होने दुंगा’, ‘मै बदला लेकर रहूंगा’ असे सूडात्मक विचारही मी करत नाहीये… मी वाट बघतोय हा ‘ब्रेक’ संपायची…यानंतर कदाचित तो स्पेशल कुणीतरी येणारेय. ‘ती नक्कीच येईल’ आणि या नात्यात केलेल्या चुका मी पुन्हा करणार नाही. शिवानीने म्हंटल्याप्रमाणे ‘आय अॅम नॉट दॅट बॅड’. मी वाट बघतोय हा ‘ब्रेक’ संपण्याची… मी वाट बघतोय ‘त्या स्पेशल समवन’ ची….

साभार: ‘पुरुष उवाच- तरुणाईच्या डोक्याला खुराक’ दिवाळी अंक २०१२ मधील ‘निखील प्रसाद घाणेकर’ लिखित लेखातील काही भाग.

चित्र साभार: http://sudyapp.com

About I सोच

I Soch encourages Pune youth to SPEAK OUT on equality, safety, diversity within the discussions of sexuality. It is a platform to learn, argue and clarify.

Leave a Reply

Your email address will not be published.