क्लोजर… – ले. अच्युत बोरगांवकर

2 810

मित्र १

मी खूप लहान होतो तेंव्हाची गोष्ट. आपल्याकडे काही गोष्टी अगदी ‘लहान सहान’ म्हणून सोडून देतात ना त्यातलीच. बालपणी मी अगदी गुटगुटीत आणि गोरापान वगैरे दिसायचो, थोड्या उन्हाने लगेच लाल व्हायचो असं ते म्हणतात. यात किती तथ्य आहे, माहित नाही. कारण तेव्हा आजच्यासारखी हागलं मुतलं तरी फोटो काढण्याची सोय नव्हती आणि लोकही तेव्हा या बाबतीत कमी बाश्कळ असावेत. असो. मी ज्या रस्त्याने शाळेला जायचो त्या रस्त्यावर एका धिप्पाड, प्रतिष्ठित आणि रिकामटेकड्या इसमाचं  घर होतं.. हा इसम माझ्या शाळेला जाण्याच्या आणि येण्याच्या वेळात त्याच्या घराच्या कट्ट्यावरच पडीक असायचा. जाता येता मला उचलून घेणे, मांडीवर बसविणे, माझे गालगुच्चे घेणे, अघोरीपणे मला पार चोळून, रगडून काढणे आणि मग मी कसा लाल झालो म्हणून हसणे, इतरांना त्यातून हसवणे हा त्याचा धंदा. हे नेहमीचंच. दिवसातून दहादा तरी मला या रस्त्यानं जायला लागायचं. त्यामुळे मी कितीही काळजी घेतली तरी एकदा तरी त्याच्या तावडीत सापडायचोच. मी रडकुंडीला यायचो, नव्हे अनेकदा रडत रडत घरी जायचो. घरचे मोठे यावर कधी त्याच्याशी भांडले किंवा त्याने हा प्रकार थांबवावा म्हणून त्याला बोलले किंवा पोलिसात गेले (थिस वॉज तो आऊट ऑफ क्वेश्चन) असं काही काही मला आठवत नाही. पण हा छळच होता असं आता मला वाटतं. त्यात त्याला काय आनंद मिळत होता माहित नाही. लैंगिक आनंदासाठी तो हे सर्व करायचा असं आजही ‘मला’ म्हणवत नाही.

आजही गावाकडे गेल्यावर पार थकलेला, वयस्कर असा तो मला दिसतो, भेटतो, माझ्याशी हसून बोलतो. मी ही त्याच्याशी बोलतो. २५-३० वर्षांपूर्वीच्या माझ्या वेदना मला त्याला सांगाव्याशा वाटत नाहीत. त्या मलाच फार महत्वाच्या वाटत नाहीत आज, कदाचित. असं का?

मित्र २

यस्टरडे, आय रिसीव्हड कॉल फ्रॉम हीम. त्याच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी. तो माझ्यापेक्षा २०-२५ वर्षे मोठा. आता साठी पार केली असेल. माझ्या लांबच्या नात्यातला. त्याचा फोन आला आणि अपार प्रयत्नांती अडगळीत टाकलेला भूतकाळ झरकन माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. मी तेव्हा चौथीत वगैरे असेन. मी कुठल्या तरी कार्यक्रमासाठी या नातेवाईकाकडे गेलेलो. तिथल्या सर्वांशी आणि त्याच्या घराशीही मी तसा परिचित. इतर मंडळी गप्पा मारत असताना मी नकळत या माणसाच्या खोलीत गेलो तसं त्यांनं मला जवळ बोलावलं आणि आपल्या मांडीवर बसवलं. मला खाली काही तरी जाणवले आणि मी तिथून उठण्याचा प्रयत्न केला तसा माझ्यावरील त्याचा दाब वाढला आणि जबरदस्तीने त्याने मला आपल्या मिठीत आवळलं. आय ट्राइड टू गेट रीड आऊट ऑफ हीम बट… तो मला स्वतःच्या अंगावर रगडून घेत होता. मी ओरडू शकलो असतो. पण तेही कळण्याचं माझं वय नव्हतं. थोडा अधिक लहान असतो तर कदाचित रडलो असतो. तो माझ्याशी गोड बोलत होता, पण सोडत ही नव्हता. आय वॉज ट्रॅप्ड… आय कुड सी हिज पेनीस… मी रडत किंवा ओरडत नाही हे पाहून नंतर नंतर तो अधिक खुलेपणाने माझ्याशी सलगी करू लागला…काही क्षणांनी कधी तरी त्याने मला सोडलं…आय क्वीकली रॅन डाऊन. बाहेर गेलो तर सगळे मला हसत होते. इतका वेळ मी त्या माणसाच्या खोलीत काय गप्पा मारल्या असे मला विचारात होते. मी कोणाला काही सांगितले नाही.

आज त्याचा फोन आला तेव्हा भूतकाळाचे भान असूनही मी त्याच्याशी बोललो. त्याला माझी सल जाणवू दिली नाही. मध्ये एकदा तो भेटला तेव्हा मी त्याच्याशी तुटक वागलो एवढंच. अगदी एवढंच… माझ्या मनात खरंच काही सल आहे का याविषयी? ती असावी का? आयुष्याचा किती काळ ही सल कायम ठेवावी? त्याला काही धडा शिकवावा का? त्याने काय साधणार? असे अनेक प्रश्न कधी कधी मला छळतात.. आय वॉन्ट टू शट थिस फॉर एव्हर…

मित्र ३      

मी प्रसादासाठी रांगेत उभा होतो. १४-१५ वर्षांचा असेन. एका राष्ट्रीय बाबाच्या भव्य रामकथेला गेलो होतो. एकटाच. त्या दिवसात गावचे मारवाडी-गुजराती व्यापारी अतिभव्य रामकथा वगेरे आयोजित करायचे. आजही ते असेच वागतात म्हणे. तर ही प्रसादासाठीची रांग खूप मोठी होती. एक बाप्या माणूस, सावळा, पन्नाशीचा माझ्या मागे उभा होता. तो माझ्या मागे उभा आहे, हे कळण्याइतपत हालचाल त्याने हळूच सुरु केली होती. दोन तीन वेळा झाल्यावर माझ्या लक्षात आलं, की हे सहज नाही. त्याचा हात धीम्या गतीने माझ्या लिंगाकडे जात होता. आजपर्यंत मित्रांच्या तोंडून मी जे ऐकून होतो ते प्रत्यक्ष अनुभवत होतो. त्या पाच ते दहा मिनिटात मी जो काही निर्णय घेतला त्याचा काय अर्थ होता मला आजही काळत नाही. पण त्याने माझा एकूण नूर पाहून मला एका निर्जन स्थळी नेले. मी गेलो. त्याने मला त्याच्यासाठी हस्तमैथुन करायला सांगितले. मी तसे केले. मीही उत्तेजित झालो होतो. त्याच्या ते लक्षात आलं असावं. त्याने मला मोकळे होण्यास मदत केली. नंतर मी त्याला शरीर संबंधाबद्दल एक दोन प्रश्न विचारले. निव्वळ उत्सुकता! त्याने स्व-अनुभवाने त्याची उत्तरे मला दिली आणि तो त्याच्या रस्त्याने निघून गेला. तिथून घरी परतत असताना एक विचित्र भावना माझ्या मनात होती. योग्य-अयोग्य याचा निर्णय घेऊ शकण्याचं ते वय नकीच नव्हतं. एक भयानक भीती जरूर वाटत होती. आपल्याला कोणी पकडले असते तर! हा अनुभव एक दुष्टचक्र बनून माझ्या आयुष्यात राहिला. ते भेदण्यासाठी खूप वेळ लागला. मला त्याची किंमत चुकवावी लागली. अनेकांना ती तशीच चुकवावी लागली असणार. हे व्हायला नको होतं असं आज वाटतं. कायम अपराधी वाटत रहातं. या सगळ्याचा तसा शेवट तर झाला, पण मनातून या गोष्टी कशा काढणार? आय नीड अ क्लोजर…

मी

माझ्या पुरुष वाचक मित्रानो, या गोष्टी माझ्या नाहीत. नक्कीच. तुमच्या आहेत? नाहीत? मग इतर कुणाच्या तरी असतील! ज्यांच्या कुणाच्या आहेत असे अनेकजण आपल्या आजूबाजूला किंवा कदाचित आपल्या आत आहेत. त्यांच्या भूतकाळाची भुतं वर्तमानावर हवी होण्याचा प्रयत्न करत असतील. त्या आठवणीही जगण्याची चव घालवत असतील. वरील गोष्टी सांगतात की, जगण्याच्या ओघात आलेल्या कटू अनुभवांची ही स्मृतीचित्र पुसली जावीत असं या पुरुषांना वाटत आहे. किंवा कधी काळी जाणते-अजाणतेपणी आपण घेतलेल्या निर्णयांच्या आठवणी आणि त्यातून उत्पन्न होणारा अपराधी भाव विसर्जित व्हावा अथवा असं वाटत आहे. अशा एका क्लोजरच्या शोधात असलेले हे मित्र आतल्या आत, खूप खोल अस्वस्थ जाणवतात. त्यांना तो क्लोजर  मिळो, स्वस्थता लाभो! आमीन!!!

नोट – लेखातील गोष्टी काल्पनिक आहेत. त्यांचा जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असल्यास निव्वळ येगायोग समजावा. आणि मुद्दामहून त्यांचा शोध घेण्याचं तसं काही कारणही नाही. नाही का!

 

2 Comments
  1. लेट्स speak
    खरं पाहिलं तर हा खूप महत्त्वाचा व मार्मिक विषय आहे तथापि आजही त्या विषयी बोलायचं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट समजली जाते
    माझे आई वडील दोघेही या बाबतीत अगदी सजग होते त्यामुळे या विषयावर सुट्टीच्या दिवसात चर्चा घडत असे.यावेळी बरीच माहिती मिळायची त्यामुळे आयुष्यात चुकण्यापेक्षा बरच शिकलो

    1. I सोच says

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद… खरं आहे तुमचं म्हणणं… बाल लैंगिक शोषण ही गंभीर समस्या आहे…याविषयी शक्य तितक्या मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.