संशयाचं भूत

0 813

आपल्या पत्नीचं शीर कुऱ्हाडीने धडावेगळं करून ते हातात घेऊन पुण्याच्या रस्त्यावर फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा फोटो हादरवून सोडणारा होता. जिच्यासोबत निम्म्याहून जास्त आयुष्य घालवलं, संसार केला तिच्याच चारित्र्यावर पराकोटीचा संशय पतीच्या मनात होता आणि त्यातूनच त्याने हा खून केला. त्याची चौकशी होईल, मानसिक आजार आहे का हे पाहिलं जाईल, संशयाचं कारण काय याचा मागोवा घेतला जाईल…पण मूळ प्रश्न राहीलच. आपल्याच पत्नीचा खून करण्याइतका आणि शीर धडावेगळं करण्याइतका पराकोटीचा संशय का?

तुला एखाद्या मुलाचा फोन का आला, तू त्याच्याकडे का पाहिलंस अशा आणि इतरही आरोपांनी मानसिक त्रास देण्याच्या घटना वाढत आहेत असा तरूण मुलींचा अनुभव आहे. प्रेमाच्या, लग्नाच्या नात्यामध्ये चारित्र्यावरचा संशय विष कालवतो. अशाच संशयाच्या इतरही काही खऱ्या कहाण्या…

एक मैत्रीण शिक्षिका म्हणून काम करते. तिचा नवराही शिक्षक. मित्रांची कायम ऊठबस घरात. सगळ्यांशी हसून खेळून राहणाऱ्या या मैत्रिणीला आजकाल इतकं दडपण यायला लागलं आहे की विचारता सोय नाही. नवऱ्याचा एखादा मित्र आला आणि नुसतं हिच्याशी बोलला तरी नवऱ्याच्या मनात संशयाचं भूत जागं होतं. तू त्याच्याशी का बोललीस? किंवा तो तुझ्याशीच का बोलतो? दुसऱ्या मैत्रिणीची कथा अशीच. गावांमध्ये फिरून काम करणारी ही मैत्रीण मोकळ्या वातावरणात वाढली. मुलं-मुली भेद न करता सगळ्यांशी मैत्रीच्या नात्याने राहणारी. पुरुष सहकाऱ्याच्या गाडीवर मागे बसून गेली म्हणून हिच्या कार्यकर्ता असणाऱ्या नवऱ्याने कसले कसले आरोप केले. दोघांचा प्रेमविवाह, हे मुद्दाम सांगायला हवं.

गावाकडच्या आणि शहरातल्या काही कहाण्या तर विश्वास बसणार नाहीत अशा. तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या एका ताईच्या नवऱ्याला संशयाने असं काही पछाडलं आहे… बायको संडासला म्हणून जरी बाहेर पडली तरी हा तिच्या मागे जाणार…आणि या संशयाचा कडेलोट झाला म्हणून की काय आता त्याने घरामागेच खड्डा खणून ठेवलाय म्हणजे संडासला लांब जायला नको. एकाची तर सवय हीच की घरातून बाहेर जाताना घराला कुलूप लावून जायचं म्हणजे दुसरं कुणी येणार नाही किंवा बायको कुठे जाणार नाही.

किती तरी कहाण्या आहेत अशा. माझ्या मित्रांसमोर केस का विंचरले, दुसऱ्या पुरुषाशी का बोललीस, अमुक अमुक काका तुझ्याकडेच का येतो, याच्या गाडीवर मागे का बसलीस असे प्रश्न नवऱ्याच्या किंवा जोडीदाराच्या मनात घोंघावू लागले की त्याचं वादळ व्हायला आणि त्यात आहे ते नातं कोसळायला वेळ लागत नाही.

एका मैत्रिणीची कहाणी हेलावून सोडते. तू अमुक अमुक पुरुषाकडे का पाहिलंस यावरून भांडण विकोपाला गेलं आणि तिने स्वतःला जाळून घेतलं. मरता मरताही तिचे शेवटचे शब्द होते, मैं सच्ची उसको नही देखीं. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची इतकी धडपड… तिच्या जोडीदाराला का खरं वाटलं नाही तिचं बोलणं, का नाही बसला विश्वास? कोणतं भूत बसलं होतं मानगुटीवर?

प्रेमाच्या नात्याचा पाया विश्वास असायला हवा. मालकी, अविश्वास, वागण्या-बोलण्यावर नियंत्रण, तू फक्त माझी किंवा माझा – हा प्रेमाचा पाया होऊ शकत नाही. ६० वर्षाचा माणूस ५५ वर्षाच्या पत्नीवर संशय घेतो मग तरूण मुला-मुलींची परिस्थिती काय असेल?

तुमच्याबाबत असं काही घडत असेल तर वेळीच सावध व्हा आणि कुणाची तरी मदत घ्या. तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वतंत्र असण्याचा, मोकळं असण्याचा आणि स्वतःच्या मर्जीने, भीती आणि हिंसामुक्त जगण्याचा अधिकार आहे.

तुमची मतं नक्की कळवा.

छायाचित्र – साभार – विद्या कुलकर्णी

Leave A Reply

Your email address will not be published.