शीघ्रपतन : स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट

0 363

माझ्या पुरुष मित्रांनो,

आमची ही वेबसाईट सुरु झाल्यापासून जे काही ४०० एक प्रश्न आम्हाला आले त्यातील अंदाजे २०%, म्हणजे एक पंचमांश प्रश्न, हे दोन गोष्टींशी संबंधित होते. एक म्हणजे हस्तमैथुन आणि दुसरे म्हणजे शीघ्रपतन. अर्थात यातील बहुतेक प्रश्न पुरुषांनी विचारले आहेत याचा अंदाज आपणा सुजाण वाचकांना आला असेलच. त्यांना यथोचित उतरंही आम्ही दिली आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टींशी संबंधित ‘समस्यांचं’ निराकरण करण्याचा पुरेसा प्रयत्न वेबसाईट वर झालेला आहे. इच्छुक वाचक हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं वेबसाईटवर वाचू शकतात. अर्थात आजही असेच अनेक प्रश्न परत येतच आहेत.

प्रस्तुत लेखात शीघ्र वीर्यपतनावर एका तार्किक उपायाचा विचार केला गेला आहे. आशा आहे तुम्हाला हा लेख उपयोगी वाटेल. हा लेख बिंदुमाधव खिरे लिखित ‘मानवी लैंगिकता – एक प्राथमिक ओळख’ या पुस्तकातील माहितीवर पूर्णपणे आधारित आहे. मानवी लैंगिकतेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर नेमकी आणि शास्त्रीय माहिती देणारे हे पुस्तक सर्वांच्याच संग्रहात असायला हवे.

स्टार्ट स्टॉप स्टार्ट

एक ताई म्हणाल्या ‘हे फिल्डिंग लावतात, बॅटिंगला उभे राहतात पण विकेट लगेच पडते.’ लैंगिक प्रश्नांमध्ये सर्वात मोठा प्रश्न जो अनेक पुरुषांना भेडसावतो, तो म्हणजे शीघ्र वीर्यपतन. काहींना याची इतकी लाज वाटते की ते संभोग करायचं टाळतात. या प्रश्नामुळे पुरुषांचा आत्मविश्वास खूप कमी होतो. संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी खालील मार्गांचा वापर केला जातो. यातल्या स्टार्ट-स्टॉप-स्टार्ट पद्धतीचा शास्त्रोक्त वापर करून अनेकांना चांगला फरक पडलेला दिसतो.

लैंगिकतेवर काम करणाऱ्या ‘मास्टर्स अँड जॉन्सन’ या डॉक्टरांनी हा मार्ग सुचविला आहे. त्यात थोडा बदल करून ही पद्धत इथे दिली आहे. हा मार्ग सोपा असला तरी तो मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्यानं करावा. पहिल्या टप्प्यानंतर सर्व टप्प्यांसाठी जोडीदाराची गरज लागते.

पहिला आठवडा हस्तमैथुन करायला लागायचं पण वीर्यपतन होऊ द्यायचं नाही. वीर्यपतन व्हायची वेळ आली की इतर कोणते तरी (अध्यात्मिक?) विचार करून लिंगाचा ताठरपणा घालवून द्यायचा. परत लैंगिक इच्छा आणून लिंग उत्तेजित करायचं व परत हीच क्रिया करायची. असं दररोज झोपायच्या अगोदर तीन वेळा करायचं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन करून किंवा संभोग करून वीर्यपतन करायचं नाही. या टप्प्यात हळूहळू पुरुषाने त्याच्या वीर्यपतनावरचं नियंत्रण सुटण्याचा बिंदू ओळखायला लागायचं. कोणत्या क्षणानंतर आपला संयम सुटणार हे त्याने व्यवस्थित ओळखायला शिकावं.

दुसरा आठवडा जोडीदाराने शीघ्रपतन होणाऱ्या व्यक्तीला हस्तमैथुन करण्यास सहाय्य करावं. जसा वीर्य पतनाचा क्षण जवळ तसा पुरुषाने जोडीदाराला थांबवावं. थोडा अवधी जाऊ द्यावा आणि लिंग शिथिल झालं की परत लैंगिक इच्छा आणून लिंग उत्तेजित करावं व परत हीच प्रक्रिया करावी. असं दररोज तीन वेळा करायचं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन/संभोगातून वीर्यपतन होऊ द्यायचं नाही.

तिसरा आठवडा –

पुरुषाने पाठीवर झोपायचं. लैंगिक उत्तेजना येऊन लिंग उत्तेजित झालं की जोडीदाराने आपल्या योनीचा स्पर्श लिंगाला करावा. जर वीर्यपतन होतंय असं वाटलं तर त्या क्षणी तिथेच विराम घ्यावा. हळूहळू लिंगाचा योनी प्रवेश करवून या स्थितीत काही वेळ जावू द्यावा. लिंग शिथिल होऊ द्यावे आणि परत लिंग उत्तेजित करून योनी प्रवेशी स्थितीत यावे पण नंतर कुठलीही हालचाल करू नये. हीच स्थिती १० ते १५ मिनिटे कायम ठेवावी. असं दररोज झोपायच्या अगोदर तीन वेळा करावं. हे एक आठवडा करायचं. हा सबंध आठवडा हस्तमैथुन/संभोगातून वीर्यपतन होऊ द्यायचं नाही.

चौथा आठवडा वरील टप्प्यात एक बदल करायचा. आता लिंगाला योनीप्रवेशी स्थितीत काही मिनिटं तरी राहण्याची सवय झालेली असते. या टप्प्यात स्त्री जोडीदाराने लिंगाचा योनीप्रवेश झाल्यानंतर हळूहळू खाली वर अशी हालचाल करायची. वीर्यपतन होतंय असं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी पुरुष जोडीदाराने ही हालचाल थांबवावी. वीर्य पतनाची भावना गेल्यानंतर परत हालचाल पूर्ववत करावी. असं १० मिनिटे दररोज पुढचा एक आठवडा करायचं. या टप्प्यात पुरुषाचा संभोग कालावधी वाढलेला दिसतो.

पाचवा आठवडा स्त्रीने पाठीवर झोपायचं. पुरुषाने उत्तेजित लिंगाचा योनी प्रवेश करावा. जर वीर्यपतन होतंय असं जाणवलं तर अल्प विराम घ्यावा आणि वीर्यपतनाची भावना गेल्यानंतर परत लिंग आत घालण्याचा प्रयत्न करावा. लिंग योनीत असताना हळूहळू हालचाल करावी. वीर्यपतन होतंय असं जाणवलं तर परत थोडा वेळ थांबावे. वीर्यपतनाची इच्छा गेल्यानंतर परत ‘स्ट्रोक’ सुरु करायचे.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

१. सबुरी हवी. घाई घाईत पुढचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करू नका.

२. काही वेळा एक टप्पा पार करताना अपयश येतं. याचा अर्थ पूर्वीच्या टप्प्यात अजून सुधारणा हवी. इथं दिलेला ‘एक आठवडा’ असा प्रत्येक टप्प्याचा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो.

३. संभोगाचा कालावधी वाढला की काही महिने/वर्षानंतर काही जणांचं परत लवकर वीर्यपतन सुरु होतं. अशा वेळी परत वरील टप्प्यांचा वापर करून संभोगाचा कालावधी वाढवायचा प्रयत्न करावा.

इतर काही पद्धती –

१. डबल निरोधचा वापर निरोध वापरून संवेदनशीलता कमी होते म्हणून काहीजण डबल निरोध वापरून संभोगाचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करून बघतात.

.अॅनेस्थेटीक जेली काहीजण संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी अॅनेस्थेटीक जेली लिंगाला लावून लिंग काही अंशी बधिर करून संभोग करतात. या रसायनामुळे संभोगाचा कालावधी वाढू शकतो. पण लिंगाची संवेदनशीलता कमी होते व संभोगातून कमी सुख मिळतं.

अशा प्रकारचं रसायन निरोधाच्या वांगणात वापरून संभोगाचा कालावधी वाढवणारे निरोध बनवले जातात. या ‘एक्स्ट्रा टाईम’ निरोधाच्या वांगणात अशा तर्हेचं अनेस्थीटिक रसायन मिसळलेलं असतं.

३.मानसिक आजारांवरील औषधं क्लायंटचा संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी काही मानसोपचारतज्ज्ञ मानसिक आजारांवरील औषधांचा वापर करतात. लवकर वीर्यपतन न होणं हा काही औषधांचा ‘साईड इफेक्ट’ असतो. काही जणांना याचा फायदा होतो.

 

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.