ओझं- प्राजक्ता धुमाळ

0 145

२००६ साली अगदी सहज एक सुंदर कविता माझ्या हातून लिहिली गेली आणि माझ्या कवितेचं विश्व ‘टर्न’ घेऊ लागलं. अगदी वेगाने आमच्या ‘पुरंदर फ्रेंड सर्कल’मध्ये प्रसिद्ध झाली होती, तेव्हा छान वाटलं होतं आणि राष्ट्र सेवा दल, पुरंदर च्या गटाकडून प्रकाशित होणाऱ्या ‘परिवर्तनवादी समता’ या मासिकामध्येही ही कविता तेव्हाच प्रकाशित करण्यात आली होती. जोपर्यंत मी ही कविता लिहिली नव्हती, तोपर्यंत माझ्या निसर्ग कवितांचे काही मित्र चाहते होते, पण इतर मैत्रिणींप्रमाणे माझ्याही अंगात ‘क्रांतिचं वारं’ (त्यांच्याच शब्दांत) घुसलेलं आहे, हे त्यांना माझ्या ‘ओझं’ कवितेतून लक्षात आलं आणि काहींचा तेव्हाच भ्रमनिरास झाला. अशा या कवितेला जोडून असणाऱ्या काही आठवणी जाग्या झाल्या. पण एकूण काय, तर अनेकदा समानतेची भाषणं ठोकली जातात, पण घरात मात्र विरोधाभास दिसतो. या कवितेतील प्रेयसी लग्नानंतर किंवा एकत्र राहायला लागल्यावर तिच्या प्रियकराला काही प्रश्न विचारत घरकामातील जबाबदाऱ्या उचलण्याची, ‘माणूस’ म्हणून दोघांनाही असणाऱ्या समान हक्कांची जाणीव करून देत आहे…

ही कविता लिहिल्यानंतर एक-दोन वर्षांच्या समृद्ध अनुभवांतून, विविध प्रकारच्या जडणघडणीतून ‘तूही आवरू लाग ना..!’ सारखी वाक्यं जरा मला डळमळीत वाटायला लागली आणि ‘तूही आवरायला पाहिजे..!’ असं वाटायला लागलं…

ओझं

ओझं झालं का रे खूप

आपल्या या नात्याचं?

मग काय झालं,

त्या मिळून पाहिलेल्या स्वप्नांचं?

हक्क तरी बजावते का रे मी कधी?

पण तो मलाही आहे

विसरून कसं जातोस तू

‘माणूस’ मीही आहे

तुलाच आहे का अस्तित्व

जरा मलाही समजून घे ना!

तुला काय वाटतं फक्त तूच दमतोस?

जरासं माझ्याकडेही बघ ना!

सगळं काही तुला हवं हातात

पसाराही नको घरात

घर तर दोघांचं ना?

मग जरा तुही आवरू लाग ना..!

– प्राजक्ता धुमाळ

Image courtesy:  https://www.snapdeal.com

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.