जननचक्राची ओळख – भाग ४ : शरीरात होणारे इतर बदल

0 1,739

पाळीचक्रामध्ये गर्भाशयातील स्राव आणि ग्रीवेमध्ये होणारे बदल आपण पाहिले. यासोबतच शरीरातही अनेक छोटेमोठे बदल होत असतात. शरीराच्या आणि मनाच्या संवेदनांकडे बारकाईने लक्ष दिल्यास हे बदल आपल्याला नक्कीच जाणवतील.

पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जनाच्या आधीचा आणि नंतरचा काळ असे मुख्य दोन टप्पे असतात. इस्ट्रोजनचा प्रभाव अंडोत्सर्जनाच्या आधी तर प्रोजेस्ट्रॉनचा प्रभाव अंडोत्सर्जनाच्या नंतर जाणवतो.

काय बरं आहेत हे बदल?

अंडोत्सर्जनाआधी 

योनीमध्ये                 बुळबुळीत, ओलसरपणा

पोटात                       गोळे आल्यासारखे वाटणे, मध्यावर दुखणे

स्तनात                     झिणझिणल्यासारखे वाटू शकते

संपूर्ण शरीर               हलके वाटणे

उत्साह                      जास्त

मनस्थिती                चांगली, उत्साही

लैंगिक भावना          जास्त

त्वचा                        तकाकी जास्त, उजळ  तेलकट, काही वेळेस मुरुम

 

अंडोत्सर्जनानंतर

योनीमध्ये                कोरडेपणा

पोटात                      पोटाचा आकार वाढतो, जडपणा येतो (शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं)

स्तनात                    स्तन जडावणे, दुखरे होणे

संपूर्ण शरीर              जडपणा येणे, वजन वाढणे

उत्साह                     कमी

मनस्थिती               कदाचित चिडचिड, उदास

लैंगिक भावना         कमी

त्वचा                       निस्तेज, कोरडी, मुरुम

*अंडोत्सर्जनाच्या वेळी एका बाजूला टोचल्यासारखे दुखणे

शरीरात होणारे हे बदल प्रत्येक पाळीचक्रात थोड्या फार फरकाने जाणवू शकतात. त्यामध्ये फरकही पडतो. तसंच प्रत्येक स्त्रीला हे बदल असेच जाणवतील असंही नाही. जर गर्भनिरोधक गोळ्या किंवा इतर संप्रेरक पद्धतीची गर्भनिरोधकं वापरत असाल तर यातले बरेचसे बदल जाणवणार नाहीत कारण कृत्रिम संप्रेरकांमुळे शरीराच्या संवेदना कमी होतात.

पाळी चक्रात नेमकं कधी आणि काय घडतं याचा हे बदल म्हणजे एक आरसा आहेत. सवयीने आपण शरीरातल्या संवेदनांच्या आधारे आतमध्ये काय चाललंय हे समजून घेऊ शकतो. शरीरात, गर्भाशयात, योनीत आणि ग्रीवेच्या स्रावात होणारे बदल कसे नोंदून ठेवायचे ते पुढच्या भागात.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.