‘फिक्शन अ‍ॅन्ड रिअ‍ॅलिटी’- निहार सप्रे

काही महिन्यांपूर्वी सरकारने तब्बल ८०० पोर्नोग्राफिक साईट्सवर घातलेली बंदी चांगलीच गाजली. वादविवाद झाले, चर्चा झाल्या. ज्या वेगाने सरकारने ही बंदी घातली होती, त्याच वेगाने सरकारने ती बंदी उठवलीदेखील.

वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या वाचताना, वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चा ऐकताना वाटलं; ‘पॉर्न’ या विषयावर एवढं चर्वितचर्वण करण्यासारखं काय झालंय? आणि मुळातच पोर्नोग्राफीचा अजूनही आपण एवढा बाऊ का करतो? विचार केला आणि लिहायला बसलो.

गेल्या दोन वर्षांत एका प्रकल्पासाठी मी पुणे आणि आसपासच्या महाविद्यालयांतल्या १८-२२ वयोगटामधल्या अनेक मुलामुलींशी लैंगिकता या विषयासंबंधी बोललो. त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना या विषयासंबंधी उघडपणे बोलण्याकरता एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पादरम्यान ज्या मुलामुलींशी मी बोललो, त्यांतली खूपशी मुलं-मुली मुख्यतः पुण्यातली किंवा पुण्याच्या आसपासच्या निमशहरी किंवा ग्रामीण भागामधली, आणि निम्न-मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातली आहेत. शिवाय बहुतांश मुला-मुलींची आर्थिक-सामाजिक परिस्थिती साधारणच आहे. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून जे अनुभव आले, त्यांतून एक गोष्ट अगदी उघडपणे समजली, की या मुला-मुलींना त्यांच्या स्वतःच्या लैंगिकतेबद्दल आणि एकूणच मानवी लैंगिकतेबद्दल अनेक प्रश्न आहेत. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरता इंटरनेटसारखं प्रभावी माध्यम उपलब्ध आहे.

जवळपास सर्व मुला-मुलींचा सेक्स किंवा लैंगिकता या विषयाशी पहिला संबंध येतो, तो पोर्नोग्राफी किंवा तत्सम माध्यमातून. त्यामुळे त्यांच्याबरोबर लैंगिकतेसंबंधी संवाद सुरू करण्यासाठी पोर्नोग्राफीसंबंधी त्यांची मतं जाणून घेणं आणि त्याचा एकूणच मानवी लैंगिकतेवर कसा परिणाम होतो याविषयी त्यांच्याशी चर्चा करणं खूप गरजेचं होतं. त्या चर्चेमधून जे अनुभव आले ते इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्या मुला-मुलींशी मी पोर्नोग्राफीविषयी चर्चा केली त्यांच्यात क्वचितच अशी मुलं-मुली आढळली, ज्यांनी पॉर्न कधीच बघितलेलं नाही. जवळपास सर्वांनी कधी ना कधी पॉर्न पाहिलं आहे. त्यांत किती जणांना ते आवडलं, हा मुद्दा वेगळा! परंतु असे फार थोडे जण होते, ज्यांनी पॉर्न कधीच पाहिलं नव्हतं. आणि त्याचं मला जाणवलेलं एक मुख्य कारण म्हणजे आता पोर्नोग्राफिक साहित्याची अगदी सहज असणारी उपलब्धता. उदाहरणार्थ, मला आठवतंय, जेव्हा मी या मुलांच्या वयात होतो, तेव्हा इंटरनेटची उपलब्धता आताएवढी नव्हती. मोबाईल फोन आताइतके प्रगत नव्हते, शिवाय मोबाईल फोन्स आताइतके सहजपणे उपलब्धही होत नसत. त्यामुळे म्हणावा इतका खाजगीपणादेखील मिळायचा नाही. पॉर्न किंवा तत्सम साहित्य बघण्याकरता किंवा वाचण्याकरता तर, मला अशक्यप्राय वाटतील अशा गोष्टी कराव्या लागायच्या. त्यात मी एका लहान शहरातला, त्यामुळं तिथे सर्वांना सर्व जण ओळखत. त्यामुळे व्हिडिओ कॅसेट आणण्यासाठी किंवा तत्सम साहित्य मिळवण्यासाठी भगीरथ-प्रयत्न करावे लागत. त्या पाहण्याकरता प्लेयर मिळवणं, (सुरक्षित!) जागा उपलब्ध मिळवणं आणि ते सर्व करताना घरी कळू नये याची खबरदारी घेणं, यासाठी आम्हां मुलांना अनेक (आणि मुलींना तर कदाचित फारच जास्त) उद्योग करावे लागायचे. आता मात्र फार कमी वेळा मुलांना असे उद्योग करावे लागतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे इंटरनेट वेगवान झालंय. त्यात इंटरनेट आता मोबाईलवरही सहज उपलब्ध असतं. त्यामुळे त्यांना पॉर्नही अगदी सहजासहजी, थेट हातात मिळू लागलं आहे. आता त्यांना पॉर्नच्या उपलब्धतेबद्दल तर चिंता करावी लागत नाहीच, पण दुसरं म्हणजे खाजगीपणाचा प्रश्न मोबाईलमुळे सहज सुटतो.

परंतु त्यांच्याशी केलेल्या सर्व चर्चांदरम्यान पॉर्न बघणाऱ्या किती जणांना किंवा जणींना ते आवडतं किंवा त्याच्याबद्दल उघडपणे बोलण्याकरता ते कितपत तयार असतात, हे प्रश्न मात्र नेहमीच उपस्थित होत आले आहेत.

पॉर्नबाबत मुला-मुलींमध्ये जाणवलेला मूलभूत फरक म्हणजे, अशा फारच थोड्या मुली भेटल्या, ज्या पोर्नोग्राफी मनापासून एन्जॉय करतात. मुलं मात्र पॉर्न मनापासून एन्जॉय करतात. फक्त त्याबद्दल उघडपणे बोलायला किंवा ‘मी पॉर्न बघतो, मला ते आवडतं आणि मला ते पाहून हस्तमैथुन करायची इच्छा होते किंवा मी हस्तमैथुन करतो’ हे कबूल करायला लाजतात. बऱ्याचदा त्यांना पॉर्नविषयी बोलतं करण्याकरता मला व माझ्या साथीदारांना आमची वैयक्तिक उदाहरणं द्यावी लागतात आणि मग ती उदाहरणं ऐकून, मुलांना बोलावंसं वाटतं.

मी काम केलेल्या अनेक महाविद्यालयांमध्ये (शहरातल्या प्रथितयश महाविद्यालयांपासून निमशहरी भागातली लहान महाविद्यालयंदेखील त्यांत होती) मुलंमुली एकत्र असणाऱ्या गटांशी चर्चा करताना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली. ती म्हणजे मुलींना केवळ ’पॉर्न’ या शब्दामुळेदेखील किळस वाटते. त्या पॉर्नविषयी चर्चा करायला प्रचंड लाजतात, वेडेवाकडे चेहरे करतात आणि खासकरून जेव्हा मुलंही त्यांच्या गटात असतात, तेव्हा तर फारच. बऱ्याचदा त्यांचं म्हणणं असतं, की पॉर्न पाहणं हे फक्त घृणास्पदच नाही, तर असंस्कृतपणाचंही आहे. त्याच गटातली मुलं मात्र पॉर्न हा शब्द ऐकल्यावर खिदळू लागतात आणि मुली त्या खिदळणाऱ्या मुलांकडे पाहून वेडेवाकडे चेहरे करत त्यांच्याबद्दल जजमेंटल होतात.

एस.एन.डी.टी. कन्या महाविद्यालय, सिद्धिविनायक कन्या महाविद्यालय या मुलींच्या महाविद्यालयांमध्ये फक्त मुलींच्या गटाशी चर्चा करताना हेही जाणवलं, की गटात मुलं नसतील तेव्हा मुली पॉर्नबद्दल मोकळेपणानं बोलतात. बऱ्याचशा मुली कबूल करतात, की त्यांनी आयुष्यात कधी ना कधी पॉर्न पाहिलंय; पण त्यामुळे त्या कधी उत्तेजित तर झाल्या नाहीतच, पण उलट त्यांना त्याची किळस वाटली; काही जणींना तर उलटीच झाली!

आत्तापर्यंत चर्चा केलेल्या मुलींमध्ये केवळ एकच वेगळी मुलगी भेटली. तिनं सांगितलं, की तिला कोणत्याही प्रकारचं पॉर्न बघायला मनापासून आवडतं. ती साधारण अकरावी-बारावीमध्ये असताना तिच्या पॉर्न बघण्याची सुरवात झाली. तिने सर्वात पहिल्यांदा पॉर्न पाहिलं ते तिच्या भावाच्या मोबाईल फोनमध्ये. तेव्हापासून ती जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा पॉर्न पाहते. तिला ते आवडतं आणि एवढंच नाही, तर ती पॉर्न बघून उत्तेजितदेखील होते.

एम.एस.डब्ल्यू. करणाऱ्या एका मुलीने सांगितलं, की तिने जेव्हा पहिल्यांदा पॉर्न पाहिलं, तेव्हा ती २० वर्षांची होती. पॉर्न म्हणजे नक्की काय असतं हे तिला जाणून घ्यायचं होतं. पण ते बघितल्यावर मात्र तिला त्याचा भयंकर मानसिक त्रास झाला. त्याची प्रचंड किळस वाटली. अजूनही तिला पॉर्न या विषयाबद्दल चर्चा करायला लागल्यानंतर त्रास होतो, घृणा वाटते. खासकरून त्यामध्ये दाखवला जाणारा ’ओरल सेक्स’ तिला पटत नाही. तिच्या अनुभवानुसार मुली अगदी आपापसांतदेखील पॉर्न किंवा सेक्सविषयी उघडपणे बोलायला तयार होत नाहीत. आपण पॉर्न बघतो किंवा बघितलंय असं सांगण्याची त्यांना बहुतेक लाज वाटते किंवा मग आपल्या प्रतिमेची त्यांना भयंकर काळजी तरी वाटते. असं काहीतरी पाहणं किंवा त्याविषयी उघडपणे बोलणं म्हणजे काहीतरी भलतंच आहे… किंवा असं काहीतरी करणारी मुलगी वाईट असते, अशा सर्वसाधारण समजुतींमुळे आणि घरातूनही तशाच प्रकारचे संस्कार झालेले असल्यामुळे, सेक्स किंवा पॉर्नविषयी बोलायला मुली कचरतात.

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबातल्या मुलीनं सांगितलं, की तिच्या घरात तसं बऱ्यापैकी जुन्या वळणाचं वातावरण आहे. ती स्वतः बऱ्याचशा सामाजिक कार्यांमध्ये भाग घेणारी, आजूबाजूच्या सामजिक-आर्थिक घडामोडींची चांगली जाण असणारी आणि त्याबद्दल जागरूक असणारी अशी मुलगी आहे. तिच्याबरोबर शिकणाऱ्या तिच्या मैत्रिणींपैकी कोणीही, अजूनही पॉर्न पाहिलेलं नाही. आणि हे सांगताना तिने हेही सांगितलं, की त्या मुली ‘खूप अभ्यासू’ प्रकारामध्ये मोडणाऱ्या आहेत. ( हा जवळपास सर्वच मुलींकडून ऐकायला मिळालेला अनुभव आहे. जर एखादी मुलगी अभ्यासू, सिन्सिअर प्रकारामधली असेल, करिअरला महत्त्व देणारी असेल; तर तिने केवळ आणि केवळ अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, इतर गोष्टींकडे तिचं लक्ष्य जाता कामा नाही. त्यातही पॉर्न किंवा तत्सम अश्लील साहित्य बघणं, वाचणं म्हणजे अतीच झालं. तसं काही करणं म्हणजे तिच्यासारख्या मुलींच्या दृष्टीने ते ’वाया जाण्यासारखं’ (’अल्टिमेट डिसट्रॅक्शन’) आहे.)

ती जेव्हा पुण्यात आली तेव्हा अठरा वर्षांची होती. ती ज्या घरात राहते, त्या घराची मालकीण बऱ्यापैकी तरुण मुलगी आहे. त्या मालकिणीची आणि घरातल्या इतर मुलींची चांगली मैत्री झाली. असंच एकदा गप्पांच्या नादात तिने पहिल्यांदा सर्व मुलींना पॉर्न दाखवलं. त्या वेळी या बंगाली मुलीची पहिली प्रतिक्रिया होती, प्रचंड भीती आणि किळस वाटण्याची. सेक्स म्हणजे असंच काहीतरी असतं, असं वाटल्याने तिला तशी भीती वाटली होती. त्यानंतर काही काळ ती एका मुलाबरोबर रिलेशनमध्ये होती. तेव्हा तिने त्याच्या मोबाईलमध्ये एक‘लेस्बियन पॉर्न क्लिप’ पाहिली होती. तेव्हाही तिला ‘लेस्बियन’ म्हणजे काहीतरी भलतंच आहे असं वाटलं होतं.

नंतर जसजशी ती आमच्याबरोबर लैंगिकता या विषयावर काम करू लागली, तशी ती सेक्स आणि लैंगिकतेसंबंधी खुल्या मनाने बोलू लागली, तिच्या मनातली सेक्सबद्दलची भीती गायब झाली. आता ती इतकी मोकळी आहे, की कधी-कधी चर्चेच्या ओघात ती तिच्या एका जवळच्या मित्राबरोबर पॉर्न बघतेही; पण त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे सेक्शुअल संबंध आलेले नाहीत. तिने त्या मित्राला एकदा विचारलं, “पॉर्न बघून तू भविष्यात तुझ्या पार्टनरकडून तशा प्रकारच्या सेक्सची अपेक्षा कशावरून करणार नाहीस?” तेव्हा त्याने दिलेले उत्तर अगदी मार्मिक आहे. त्याने तिला सांगितलं, की पॉर्नमध्ये दाखवली जाणारी फँटसी आणि जगण्यातलं वास्तव यांमधली रेषा त्याच्या दृष्टीने अगदी स्पष्ट आहे; त्यामुळे तो पॉर्नमध्ये दाखवल्या जाणाऱ्या सेक्सची अपेक्षा त्याच्या पार्टनरकडून कधीच करणार नाही.

पॉर्नबाबत मुलांबरोबर चर्चा करताना येणारा अनुभव मात्र बऱ्याच प्रमाणात वेगळा आहे. मुलींपेक्षाही जास्त, मी मुलांबरोबर पॉर्नविषयी अगदी थेट चर्चा केलेली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे पोर्नोग्राफी ही मुख्यतः पुरुषांना गृहीत धरून बनवलेली असते. त्यामुळे मुलींपेक्षा मुलांच्यात पॉर्न बघण्याचं प्रमाण खूप जास्त दिसून येतं. दुसरं म्हणजे मुलींच्या तुलनेत मुलांना पॉर्न सहजगत्या मिळतं. या पार्श्वभूमीवर पॉर्नमध्ये दाखवला जाणारा सेक्स, त्यातल्या स्त्री आणि पुरुषांच्या प्रतिमा, त्यांचे मुलांवर होणारे मानसिक-शारीरिक परिणाम, त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन, या व इतर अनेक विषयांना अनुसरून मुलांशी चर्चा करणं एकूणच लैंगिकतेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अभ्यासणं, हा आमच्या चर्चेचा मुख्य उद्देश होता.

मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉर्नबद्दल उघडपणे बोलण्यासाठी मुलंही तयार होत नाहीत. वस्तुतः फक्त मुलींच्या ग्रुपशी बोलताना त्या जितक्या सहजपणे लैंगिकतेबद्दल, सेक्शुअल गोष्टींबद्दल बोलतात, तितकीही मुलं मोकळेपणाने बोलायला तयार होत नाहीत. याचं मला जाणवलेलं कारण म्हणजे – मुलींना सेक्शुअल गोष्टींबाबत जितक्या जास्त प्रमाणात शारीरिक आणि मानसिक पातळीवरचे बदल, किंवा कधी-कधी त्राससुद्धा, सहन करावे लागतात; तितक्या प्रमाणात मुलांना सहन करावे लागत नाहीत. त्यामुळे लैंगिकतेबद्दल किंवा सेक्शुअल गोष्टींबाबत ‘माहिती’ मिळवण्यासाठी मुली जितक्या उत्सुक असतात; तितकी मुलं उत्सुक नसतात. दुसरं म्हणजे, ‘मला सगळं माहिती आहे’ हा दुरभिमान मुलांच्यात जास्त प्रमाणात दिसतो आणि त्यामुळं बऱ्याचदा ते ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. आणि तिसरं म्हणजे मुलांच्या गरजा या जास्त प्रमाणात करिअरला महत्त्व देण्यातून आलेल्या असतात. करिअरसंबंधी विषयांमध्ये त्यांना जास्त रस असतो. त्यांना लैंगिकता आणि करिअर या दोन विषयांमधला एक विषय निवडण्याची पाळी आली, तर ते करिअरला प्राधान्य देतात. त्यामुळे मुलांना पोर्नोग्राफी किंवा लैंगिकतेसंबंधात बोलतं करणं हे नेहमीच जास्त आव्हानात्मक ठरलं आहे.

परंतु इथेदेखील जेव्हा आम्ही आमचे स्वानुभव त्यांना सांगतो, तेव्हा अगदी मोजकी का होईना, पण मुलं खुलतात आणि बोलतात. मुलं कोणत्याही सामाजिक-आर्थिक गटातली असली; तरी त्यांनी पॉर्न मात्र पाहिलेलं असतंच. आत्तापर्यंत मी ज्या-ज्या मुलांशी चर्चा केली आहे, त्यांतल्या एकाही मुलाने “मी पॉर्न पाहिलेलं नाही” असं सांगितलं नाहीये. इतकंच नाही, तर सर्व मुलांनी, अगदी कमी वयात म्हणजे चौदाव्या-पंधराव्या वर्षी पॉर्न पाहिलेलं असतं. मुलं नियमितपणे पॉर्न पाहतात, हस्तमैथुन करतात, त्यावर चर्चा करतात, क्लिप्स शेअर करतात. इतकंच नाही, तर काही मुलं त्यांच्या गर्लफ्रेंड्सनाही छोट्या पॉर्न क्लिप्स पाठवतात.

मुलांशी पॉर्नसंबंधी बोलताना आलेले अनुभव मांडताना, एम.एम.सी.सी.च्या एका मुलाने सांगितलेल्या अनुभवापासून सुरुवात करावीशी वाटते. त्याने सर्वात पहिल्यांदा त्याच्या एका नातेवाईकाकडे पॉर्न पाहिलं. तेव्हा तो आठवी-नववीमध्ये होता. ती क्लिप बघून त्याला त्याच्या लिंगामध्ये ताठरता जाणवली. तो इतका घाबरला, की तो पुढचे दोन-तीन दिवस घरात कोणाशीच व्यवस्थित बोलला नाही. नंतर त्याच्या कोणत्यातरी एका मोठ्या मित्राने त्याला ‘तसं का होतं?’ हे सांगितलं आणि तेव्हा त्याने सर्वप्रथम जाणीवपूर्वक पॉर्न बघून हस्तमैथुन केलं.

लहान गावातून पुण्यात शिकायला आलेल्या दुसऱ्या एका मुलाने सांगितलं, की त्याच्या हॉस्टेलवर रॅगिंगचा एक भाग म्हणून मोठ्या वर्गांतली मुलं नवीन मुलांना जबरदस्तीने पॉर्न दाखवत. हे काहीतरी भलतंच आहे असं त्याला ते पाहून वाटलं होतं. सेक्स असा होतो, असा त्याला प्रश्न पडला होता. काही जणांना ते पाहून भीती वाटायची; तर काही जणांनी गावाकडे ते आधीच पाहिलेलं असायचं.

गरवारे महाविद्यालयातल्या एका मुलाने सांगितलं, की त्याने जेव्हा पॉर्न पाहिलं, तेव्हा त्याला प्रश्न पडला. शू करण्याच्या जागी लिंग घालून सेक्स कसा काय होऊ शकतो? त्याला कित्येक वर्षं असं वाटत होतं, की योनीमध्ये एकच जागा असते आणि ती म्हणजे शू करण्याची जागा. आणि सेक्स करताना पुरुष त्यांचं लिंग त्याच जागेत घालतात आणि मूलही तिथूनच बाहेर येतं.

एका कार्यशाळेदरम्यान आम्ही मुलांना प्रश्न विचारला, “तुमच्या मते योनीमध्ये लिंग घातल्यापासून वीर्यस्खलन होईपर्यंत किती वेळ जात असावा?”

जवळजवळ सर्व मुलांनी उत्तर दिलं, की पॉर्न फिल्ममध्ये दाखवतात तितकाच वेळ जात असेल.

मग त्यांना विचारलं, “तुम्ही हस्तमैथुन करताना किती वेळात वीर्यस्खलन होतं?” तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मात्र कुणी तयार होईना.

त्यांच्या थोडं मागे लागल्यानंतर, लाजत-बुजत काही जणांनी उत्तर दिलं – “पाच ते सात मिनिटांत”.

मग आम्ही पुढचा प्रश्न विचारला, “ पॉर्नमध्ये पंचवीस-सत्तावीस मिनिटं सेक्स दाखवला जातो, तो खरा असेल असं तुम्हांला वाटतं का?”

या प्रश्नावर मात्र मुलं गप्प बसली आणि विचारात पडली.

या सर्व चर्चेचा उल्लेख इथं करण्याचं कारण इतकंच, की मगाशी सांगितल्याप्रमाणे सेक्स आणि सेक्शुअॅलिटीशी मुलांचा पहिला संबंध पॉर्नच्या माध्यमातून येत असल्याने त्यांच्या डोक्यात सेक्सविषयी काही अचाट कल्पना घर करून बसलेल्या असतात. त्यांना स्वतःबद्दल आणि एकूणच सेक्शुअल गोष्टींबद्दल प्रश्न पडलेले असतात. काही जणांच्या मनात (खासकरून मुलींच्या मनात) सेक्सबद्दल भीती निर्माण झालेली असते. त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरं न मिळाल्याने त्यांच्या डोक्यातला संभ्रम वाढलेला असतो. योनीमध्ये लिंग घालणे म्हणजे सेक्स इतकीच व्याख्या त्यांच्या डोक्यात घट्ट बसते. त्यामुळे सेक्समधून किंवा सेक्सपूर्वी केल्या जाणाऱ्या फोरप्लेमधून मिळणाऱ्या आनंदाबद्दल विचार करण्याची क्षमता निर्माण होण्यात आडकाठी निर्माण झालेली असते.

पॉर्न चांगलं का वाईट, पॉर्नची काळी बाजू, त्याचे सांस्कृतिक-सामाजिक परिणाम, एखाद्याला पॉर्न आवडावं की नाही, त्यातल्या स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा या सर्व विषयांवर चर्चा तर होत राहणारच. माझ्या मते मुख्य मुद्दा एवढाच आहे, की ज्या वेगाने पॉर्नची उपलब्धता वाढते आहे, त्याच वेगाने प्रेक्षकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही मिळायला लागली पाहिजेत. त्यासाठी गरज आहे, ती त्यावर बंदी न घालता, खुल्या मनाने त्याविषयी बोलण्याची, लैंगिक शिक्षणाची आणि आताच्या तरुण मुला-मुलींना ‘फिक्शन’ आणि ’रिअ‍ॅलिटी’ मधल्या धूसर रेषेची जाणीव करून देण्याची.

साभार : सदर लेख निहार सप्रे यांनी लिहिला असून ‘‘ या विशेषांकात प्रकाशित झाला होता. ‘ऐसी अक्षरे‘च्या सौजन्याने पुनर्प्रकाशित. सर्व प्रताधिकार लेखकाकडे.   मूळ लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

http://aisiakshare.com/node/5244

 

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap