निमित्त ‘चि. व चि. सौ. का’ चं…- निहार सप्रे

कोणतीही कथा कितीही साधी असली तरी ती लिहणारा लेखक किंवा त्या कथेला चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर ठेवणारा दिग्दर्शक जाणते – अजाणतेपणे अनेक वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवत असतो. या गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवताना त्या लेखकाला/दिग्दर्शकाला मुद्दाम प्रयत्न करावे लागतात असं नाही तर तो/ती स्वतःच्या जाणीवेतून येणाऱ्या गोष्टीच पडद्यावर मांडत असतो.

मधुगंधा कुलकर्णी लिखित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘चि. व चि. सौ. का’ हा चित्रपटही असाच, त्या दोघांच्या जाणिवेतून तयार झालेला चित्रपट आहे आणि त्यामुळं तो आपल्याला अनेक गोष्टी देऊन जातो.

तसं पाहता, या चित्रपटाची कथा वेगळी किंवा काहीतरी समाज प्रबोधन करणारी आहे का? तर नाही. कथा अत्यंत साधी, कौटुंबिक, निखळ मनोरंजन करणारी अशी आहे. एका मुलाखतीमध्ये मधुगंधा कुलकर्णींनी म्हंटल्याप्रमाणे “या कथेतून त्यांना कोणताही सामाजिक संदेश देणं अपेक्षित नव्हतं तर एक निखळ, कौटुंबिक, मनोरंजनात्मक कथा मांडणंच अपेक्षित होतं”. पण मुळातच परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी अत्यंत संवेदनशील असल्यानं, मनोरंजनात्मक कथा मांडताना देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे जो संदेश या कथेतून दिला आहे, तो इथं मांडणं महत्वाचं वाटतं.

‘चि. व चि. सौ. का’  ची कथा आहे, सत्यप्रकाश (ललित प्रभाकर) आणि सावित्री (मृण्मयी गोडबोले) या तरुण – तरुणीची. दोन संपूर्णपणे वेगळ्या स्वभावाचे, भिन्न आवडी – निवडी असणारे सत्या आणि सावी लग्नासाठी एकत्र भेटतात. चहा – पोह्याचा कार्यक्रम होतो आणि दोघं एकमेकांना पसंद करतात. पण खरी मजा सुरु होते तेव्हा, जेव्हा सावी, सत्यासमोर एक विचित्र अट घालते. ती अट म्हणजे लग्नागोदर दोन महिने, अशरीर संबंध ठेवून एकत्र रहाण्याची. दोघांचेही पालक सावीची अट ऐकून अवाक् होतात, गोंधळून जातात आणि सावीला तिच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न सुरु होतात. पण सावी तिच्या निर्णयावर ठाम असते. दुसऱ्या बाजूला, मुळातच प्रयोगशील असणारा सत्या, हा प्रयोग करून बघायचा म्हणून सावीच्या अटीला दुजोरा देतो. त्याचे पालक त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागतात, पण तोही त्याच्या निर्णयावर ठाम असतो. आणि त्या पुढे निर्माण झालेल्या गोंधळाची, चर्चांची, त्यामधून निर्माण होणाऱ्या गमतींची कथा म्हणजे ‘चि व चि. सौ. का’.

चित्रपट जसजसा पुढे सरकतो तशी चित्रपटात येणारी पात्रं आणि घटना मानवी लैंगिकतेबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल खूप काही सांगून जातात.

मुळात सर्वात प्रथम येणारा मुद्दा म्हणजे सावीचा सत्याबरोबर लग्नाअगोदर रहाण्याचा घेतलेला निर्णय. आजही जरी मोठ्या शहरात जास्त प्रमाणात आणि लहान शहरात अगदी मोजक्याच उदाहरणांमध्ये मुला मुलीनी एकत्र राहण्याच्या घटना दिसत असल्या तरी आजही लिव-इन-रिलेशनशिप कडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोण थोडा पारंपारिकच आहे. परंतु जर परंपरा कशा मोडायच्या? समाज काय म्हणेल? या गोष्टींकडे थोडं दुर्लक्ष करून आपण तटस्थपणे विचार केला, तर एकमेकांना, एकमेकांच्या पालकांना, संस्कृतीला खरंच जाणून घेण्यासाठी, एकमेकांबरोबर एकत्र राहून जास्तीत जास्त वेळ घालवण्यात आणि एकमेकांच्या सर्व सवयी, आवडी – निवडी समजून घेण्यात काय हरकत आहे? आपण एखाद्या व्यक्तीशी बोलून, भेटून त्या व्यक्तीला नक्कीच जाणून घेऊ शकतो. परंतु प्रश्न तेव्हा क्लिष्ट होतो जेव्हा आपण एकमेकांबरोबर राहू लागतो. अशा वेळी एकमेकांमधल्या अनेक छोट्या – छोट्या गोष्टी किंवा सवयी असतात ज्या फक्त भेटून, बोलून समजत नाहीत तर त्यासाठी एकत्र राहण्याची गरज असते. मग अशा वेळी लिव-इन-रिलेशनशिप हा पर्याय का असू शकत नाही? सावीच्या निर्णयावर सगळे ‘पालक’ अवाक् होतात. परंतु कुटुंबातली एक व्यक्ती असते जी तिच्या निर्णयाचं अगदी दिलखोल समर्थन करते. ती व्यक्ती म्हणजे सत्याची आज्जी. जेव्हा तिला सावीचा निर्णय कळतो तेव्हा ती अगदी सहजपणे म्हणते, ‘दोघं एकत्र रहाण्यानं फार तर फार काय होईल? मुलगा नाहीतर मुलगी!’ तिच्या या वाक्यातून ती किती पुढारलेली आहे ते समजतं. इथं प्रश्न आपल्या मागच्या पिढीतील लोकांनी स्वतःमध्ये थोडा बदल घडवून आणण्याचादेखील आहे. जर मागच्या पिढ्याच जात – पात, धर्म, वर्ण या गोष्टी उराशी बाळगून बसले आणि हट्टानं, आपल्या मुला-मुलींना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून आपल्याला हवं तेच त्यांच्याकडून करून घेत राहिले तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्ये आणि पर्यायनं समाजामध्ये बदल कसा घडणार?

अशी बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवलेली आणि नवीन काळाला अनुसरून, नवीन पिढीबरोबर खांद्याला खांदा देऊन चालणारी व्यक्ती म्हणजे सत्याची आज्जी. चित्रपटात वेळोवेळी तिचं पात्र वेगळीच मजा आणतं. आज्जीची आणखी एक गम्मत म्हणजे, तिचं तिच्या शेजारी राहणाऱ्या एका विधुर वृद्धाबरोबर अफेअर चालू असतं. सत्याच्या वडिलांना, म्हणजे तिच्या मुलाला तो सगळा थिल्लरपणा वाटत असतो. घरातली जवाबदार व्यक्ती म्हणून तो सतत त्याच्या आईला हे करू नको, ते करू नको, लोक काय म्हणतील असे टोमणे मारत असतो (अर्थात हे सर्व विनोदी अंगानं चालू असतं) पण सत्या आणि नंतर सावी आज्जीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि एकदा सत्याच्या वडिलांना न सांगता सत्या आणि सावी दोघं मिळून आज्जी आणि त्या विधुर माणसाचं लग्न लावून देतात. सत्याचे वडील ते कळल्यावर खूप आकांड-तांडव करतात तेव्हाही आज्जी, सत्या आणि सावी अत्यंत शांतपणे आणि तर्कशास्त्रीय पद्धतीनं ती परिस्थिती  हाताळतात. इथं या घटनेला अनुसरून एक मुद्दा मांडावासा वाटतो. आपल्याकडं समाज उगाचच अशा प्रकारच्या गोष्टींकडं विचित्र नजरेनं बघतो. म्हाताऱ्या बाईनं जीन्स आणि टी शर्ट घातला की आपण म्हणतो तिला म्हतार चळ लागलाय. एखादं वृध्द जोडपं, तरुण तरुणींसारखं रोमान्स करताना दिसलं किंवा त्यांनी लग्न करायचं ठरवलं की आपण त्यांच्यावर बोटं उचलतो. या सर्व समजुती आपल्या नातेसंबधांकडं बघण्याच्या जुनाट दृष्टीकोनातून तयार झाल्यात. जर का आपली इच्छा असेल की आपला समाज बदलावा तर आधी आपला स्वतःचा दृष्टीकोण बदलणं गरजेचं आहे. अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाही.

चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यावर काही कारणास्तव सत्या आणि सावी मध्ये कडाक्याचं भांडण होतं आणि दोघं एकमेकांच्या उणीवा काढत, एकमेकांच्या सवयींना नावं ठेवत जोरात भांडतात. इतकं की आता जुळून येणारं नातं तुटतंय की काय? असं वाटू लागतं पण जेव्हा ते दोघं विभक्त होतात तेव्हा त्यांना जाणवतं की त्यांनी एकमेकांच्या चांगल्या सवयी शिकून घेतल्यात. सत्या प्राणी प्रेमी होतो, लोकांना वेगन होण्याबद्दल सल्ला देऊ लागतो तर दुसरीकडं सावी पाणी वाचवण्याचे आणि निसर्ग संवर्धनाचे संदेश लोकांना देऊ लागते. इथं एक महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो. कोणत्याही दोन व्यक्ती जेव्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतात तेव्हा दोघांपैकी कोणीच शंभर टक्के परिपूर्ण नसतं आणि त्या तशा बनाव्यात अशी अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे. कारण दोन्ही व्यक्ती दोन वेगवेगळ्या घरांमधून, संस्कृतींमधून आलेल्या असतात. पती – पत्नी, पार्टनर्स यांच्या मध्ये बेबनाव असतात, मतभेद असतात पण खरं प्रेम तेव्हाच फुलतं जेव्हा दोघंही एकमेकांच्या उणीवांचा इश्यू न करता, सामंजस्यानं त्या उणीवांचा स्वीकार करतात आणि एकमेकांसाठी परिपूर्ण ठरतात. कारण कुठेतरी दोघांनाही एकमेकांची गरज असते. त्यामुळं एकमेकांना समजून घेऊन, शक्य असेल तिथे स्वतःमध्ये बदल घडवून, एकमेकांच्या मतांचा आदर करत एकत्र राहणं हेच एक निकोप  नात्यासाठी आणि निकोप समाजव्यवस्था बनण्यासाठी गरजेचं असतं. यासाठी गरज आहे आपला नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विस्तृत करण्याची !

 

चित्र साभार: Chi Va Chi Sau Ka Official Trailer

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap