स्त्री = माता, भगिनी? – निहार सप्रे

“साल्यांनो पोरींची छेड काढता, तुमच्या घरी आया बहिणी नाहीत काय?” – एक कॉमन डायलॉग 

‘आय सोच’ने एनएसएस कँपमध्ये घेतलेल्या कार्यशाळांमध्ये आलेल्या तरुण तरुणींच्या मतांविषयी लिहिताना मागच्या लेखात एखाद्या घटनेला प्रतिक्रिया म्हणून तरुण-तरुणींनी “आत्महत्या करण्याचा किंवा बदला घेण्याचा सरळ सोप्पा मार्ग” पत्करण्याच्या विचारांविषयी लिहिले होते. यावेळी दुसरा विषय म्हणजे मुला-मुलींचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोण केवळ माता किंवा बहिणीपुरताच मर्यादित का आहे? म्हणजे बलात्कार, छेडछाड किंवा कोणत्याही प्रकारच्या हिंसेबद्दल बोलताना मुलामुलींकडून “आपल्या ‘आया बहिणींबरोबर’ छेडछाड किंवा हिंसेची घटना तुम्ही कराल का? नाही… तर मग बाकी मुलींबरोबर का करता?” हा एकंच मुद्दा उपस्थित का होतो?

या विचारामागं दोन कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे आपण केवळ स्वार्थीपणे फक्त आपल्या आया-बहिणींचाच विचार का करतो आणि बाकी मुली किंवा स्त्रिया, फार किंवा अजिबात महत्वाच्या का नसतात? आणि दुसरं म्हणजे एखाद्या मुलीकडे किंवा स्त्रीकडे आपण केवळ आई किंवा बहिण या रूपातच का बघतो किंवा का पाहावं; आणि हा मतप्रवाह इतका कॉमनली कसा काय दिसतो? म्हणजे मुली किंवा स्त्रियांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बाकी नाती उदाहरणार्थ, मित्र/मैत्रीण, लिवइन पार्टनर, जनरल आवडणारी/रा मुलगा किंवा मुलगी अशा नात्यांचा किंवा तिचा केवळ एक व्यक्ती म्हणून बघण्याचा विचार का नसतो?

या मुद्यांना अनुसरून एनएसएस कँपमध्ये मुला-मुलींना दिली गेली ती एक सत्यघटना इथे नोंदवावीशी वाटते. (ज्या घटनेचे त्या घटनेतील मुख्य पात्रावर झालेले परिणाम विद्यार्थ्यांना नाटक स्वरूपात दाखवायचे होते). एका मुलीवर पुणे युनिवर्सिटीच्या कँपसमध्ये एका मुलाने जबरदस्ती केली. त्यावेळी तिच्याबरोबर काही गैरप्रकार झाला नाही पण पोलीस डायरीमध्ये तिचे नाव नको यायला, करिअरवर विपरीत परिणाम नको व्हायला म्हणून तिने FIR दाखल केला नाही. काही वर्षांनी तिला समजलं कि ज्या मुलाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता त्याने आधी कँपसवर तीन बलात्कार केले होते व तो PSIची परीक्षा देणार होता आणि तो काही काळाने PSI झालादेखील. तिने त्या मुलाबद्दल तेव्हाच तक्रार का नोंदवली नाही? या गोष्टीचा आजही तिला त्रास होतो आणि PSI झालेल्या त्या मुलाने नंतर काय केले असेल, किंवा किती मुलींवर अत्याचार केले असतील, या विचाराने तिला स्वतःचीच चीड येते आणि मन विषण्ण होते.

या घटनेचा परिणाम म्हणून कँपमधल्या जवळपास सर्व मुला-मुलींनी ‘ती मुलगी पोलिसांच्यात तक्रार करते’ किंवा ‘वर्गातील मुलांना एकत्र करून त्याला धडा शिकवते’ अशा आशयाची नाटकं केली. परंतु सर्व नाटकांच्या शेवटी एकच मेसेज दिला, ‘विसरू नका कि तुमच्या आई बहिणींवरदेखील असा प्रसंग येऊ शकतो. आणि तसा विचार करूनच निर्णय घ्या, त्या दृष्टीने मुलींकडे बघा’ वगैरे…

या विचाराच्या मागं कुठेतरी आपली समाजरचना किंवा आपण कोणत्या सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीमधून येतो या गोष्टींचा मोठ्ठा हात आहे असं लक्षात येतं. जर एखाद्या मुलाला किंवा मुलीला लहानपणापासून आई आणि बहिण या नात्यांच्या पलीकडील नात्यांबद्दल Exposure मिळालंच नसेल तर त्यांच्या मनात स्त्रियांबद्दल एकूणच ‘ती माझ्या आईसारखी आहे’ किंवा ‘बहिणीसारखी आहे’ अशीच छबी कायमस्वरूपी बसली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं म्हणजे धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या आपल्याला लहानपणापासून आई म्हणजे ‘पवित्र, आपल्याला सांभाळून घेणारी, जन्मदात्री’ आणि बहिण म्हणजे ‘घरकी इज्जत’ अशा कल्पना डोक्यात भरवल्या गेल्या असल्यानं, त्यापलीकडे जाऊन माणूस म्हणून स्त्रीकडं बघण्याचा दृष्टीकोणच आपल्याला मिळाला नसल्याची शक्यता असू शकते.

या संदर्भाने एक समाज म्हणून आपल्याला विचार करायला हवा की मुलीला किंवा स्त्रीला आपण अगदी लहानपणापासून एका विशिष्ठ ‘साचेबध्द प्रतिमांमध्येच’ पाहत असतो का? त्या प्रतिमांच्या पलीकडेदेखील, स्त्रीकडे एक माणूस म्हणून बघणं आपल्याला शिकवलंच जात नाही का? अशा प्रतिमा बनवण्यामागे पुरुषसत्ताक समाजरचना, साचेबध्द प्रतिमा तोडल्यामुळे निर्माण होणारी क्लिष्टता, मिडिया यांचा खूप मोठा हात असतो का? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लहानपणापासून आपल्याला एका विशिष्ठ प्रकारच्या नात्यांबद्दल शिकवलं जातं. आई, बहिण, बाप, भाऊ, बायको या नात्यांच्या पलीकडे जाऊनही काही नाती असू शकतात याचं आपल्याला दिलं जात नाही आणि त्यातून दुसऱ्यांकडे वेगळ्या नात्यांच्या दृष्टीकोनातून बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनात क्लिष्टता निर्माण होते.

ही विचारांची चौकट भेदून पलीकडे जाणं आपल्याला शक्य करता येईल का?

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

One Response

  1. Kiran says:

    तुम्हाला आया बहिणी नाहीत का ? असं म्हणून जर अत्याचार कमी होणार असतील तर असं म्हणायला काय हरकत आहे ? शेवटी अत्याचार कमी होणं महत्वाचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap