जनायटल हर्पिस – जननेंद्रियांवरची नागीण

0 480

जनायटल हर्पिस – जननेंद्रियांवरची नागीण

हर्पिस हा आजार दोन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हर्पिस सिंप्लेक्स 1 आणि हर्पिस सिंप्लेक्स टाइप 2.  या आजारात रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे शिश्नावर, योनिमुखाभोवती किंवा योनिमार्गात पुरळ येतात. संबंधानंतर २ ते १४ दिवसांत हे पुरळ उमटतात. विषाणूची लागण लैंगिक संबंधातून होते. गुद मैथुन किंवा मुख मैथुनातूनही बाधा होते. या विषाणूची लागण असलेल्या पण त्याची कसलीही लक्षणं नसलेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आल्यासही हा आजार होऊ शकतो.

लक्षणं

  • शिश्नावर, योनिमुखाभोवती किंवा योनिमार्गात पाणी भरलेल्या फोडांसारखे अगदी लहान पुरळ
  • अनेक लहान फोड एकत्रित दिसतात. हे दुखरे असतात.
  • त्वचेचा थर निघून गेल्यावर लहान जखमा
  • अवधाण, डोकेदुखी, मानदुखी व ताप ही लक्षणे असू शकतात.
  • लघवीस जळजळ होते.

३ आठवडयात हे फोड आपोआप बरे होतात. मात्र याचे विषाणू शरीरात चेतासंस्थेत कायमचे सुप्त राहतात. काही कारणांनी शरीरावर ताण पडल्यास व प्रतिकारशक्ती कमी झाल्यास शरीरातील झोपलेले विषाणू जागे होऊन पुन्हा याच प्रकारच्या पुरळाचा त्रास होऊ शकतो. सर्वसाधारणपणे पाच-सहा वेळा असे पुरळ येऊन गेल्यावर हळूहळू हा आजार आपोआप थांबून जातो. आजाराची लक्षणे (फोड) दिसत असताना शरीरसंबंध टाळावेत. इतर वेळी तुम्हाला हा संसर्ग आहे याची तुमच्या जोडीदाराला कल्पना द्या. लैंगिक संबंधात ‘निरोध’ वापरल्यास संसर्गाचा धोका बराच कमी होऊ शकतो. गरोदरपणी नागीण झाल्यास जन्मणाऱ्या बाळाला संसर्ग होऊ शकतो.

उपचार

या विषाणूवरती कोणताही उपचार नाही. मात्र फोड असताना स्वच्छता राखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी दिवसातून दोन-तीन वेळा साबणाच्या कोमट पाण्याने जखमा धुवाव्यात. याबरोबर इतर कोणताही लिंगसांसर्गिक आजार नाही याची खात्री करणे आवश्यक असते. असायक्लोव्हीर मलम व गोळया या आजारात उपयुक्त ठरू शकतात. यासाठी ७ दिवस उपचार घ्यावे लागतात.

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.