हॉर्मोन्सचे इंजेक्शन वापरून संतती नियमन_ डॉ. रीतू परचुरे.

0 939

‘नको असलेलं गरोदरपण/प्रेग्नन्सी’ हा एक भारतातला महत्वाचा प्रश्न आहे. भारतात जवळजवळ २०% गरोदरपणं ही नको असलेली असतात. लग्न झालेल्या किंवा न झालेल्या अशा दोन्ही गटांमध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणात दिसतो. कधी असे गरोदरपण पुढे गेले तर अबॉर्शन केले जाते. पर्याय कुठलाही असो, त्याच्या अनेकांगी– मानसिक, शारीरिक व आर्थिक – दुष्परिणामांना बायका व त्यांच्या जोडीदाराला/कुटुंबाला सामोरे जावे लागते.

खरंतर ‘नको असलेलं गरोदरपण’ सहज टाळता येऊ शकतं. आजच्या घडीला संतती नियमनाचे, म्हणजेच ‘गर्भधारणा/प्रेग्नन्सी’ राहू नये यासाठीचे अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. संततीनियमनाची साधने / पध्दती वापरण्यास अतिशय सोप्या आहेत. पण तरीही याबद्दल असलेली अपुरी/चुकीची माहिती, साधने उपलब्ध नसणं, एकूणच लैंगिक संबंध या विषयाबद्दल न बोललं जाणं, त्यातून निर्माण होणारी लाज, भीती या सगळ्याच्या एकत्र परिणामांमुळे संततीनियमानची साधने वापरण्याचे प्रमाण भारतात बरंच कमी आहे.

संततीनियमनाच्या पर्यायांपैकी काही पर्याय कायमस्वरूपी तर काही तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. तात्पुरत्या साधनांचा परिणाम हा एका ठराविक काळापुरता असतो. उदा. कंडोम हे संततीनियमनाचे तात्पुरते साधन आहे. त्याच्या वापरामुळे प्रेग्नसी बरोबरच लिंगसांसर्गिक आजारांपासूनही संरक्षण मिळते. पण कंडोमची उपयुक्तता फक्त तेवढ्या संबंधापुरती असते. त्यामुळे कंडोमचा वापर प्रत्येक संभोगाच्या वेळी करणे गरजेचे असते. दुसरं उदाहरण म्हणजे तोंडाने घ्यायच्या ‘माला-डी’ सारख्या गोळ्या. गोळ्या नियमित घेत असल्यात जोपर्यंत गोळ्या सुरु आहेत तितपर्यंत त्यांचा उपयोग होतो. ज्यांना अशी नियमितता पाळणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची तात्पुरती साधनं वापरता येऊ शकतात. ही साधनं एकदाच वापरून जरा जास्त काळासाठी संरक्षण देतात. उदा कॉपर टी / तांबी  हे बऱ्याच जणांना माहीत असलेले साधन. एकदा तांबी बसवली की पुढे ३-५ वर्षं प्रेग्नन्सी पासून संरक्षण मिळते.

हॉर्मोनचे इंजेक्शन हे याच प्रकारातले अजून एक साधन. यामध्ये एक किंवा दोन प्रकारची हॉर्मोन्स (progestin only / progestin+estrogen) शरीरात टोचली जातात. हे फक्त बाईने / स्त्रीने वापरावयाचे साधन आहे. या हॉर्मोन्समुळे स्त्रीबीज बीजांडामधून फलित होऊन बाहेर टाकले जाण्याची प्रक्रिया थांबते.  तसेच गर्भाशयमुखाजवळील स्त्राव घट्ट होतो; त्यामुळे शुक्राणू स्त्री बीजापर्यंत पोहचू शकत नाहीत व अशा प्रकारे गर्भधारणा टाळली जाते.

हॉर्मोनच्या इंजेक्शनमध्ये DMPA/NET-IN/CYCLOFEM इ. इंजेक्शन्स भारतात उपलब्ध आहेत. यातील DMPA हे इंजेक्शन जास्त प्रमाणात वापरले जाते. ते साधारत: दर ३ महिन्यांनंतर परत घ्यावे  लागते. प्रसुतीनंतरच्या काळात किंवा अॅबॉर्शननंतरही हे इंजेक्शन घेता येऊ शकते. योग्य प्रकारे व वेळच्या वेळी घेत राहिल्यास प्रेग्नन्सीचा धोका जवळ जवळ नसतो. इंजेक्शन घ्यायचे थांबवल्यानंतर साधारण ९-१० महिन्यांनतर प्रेग्नन्सी राहु शकते. अर्थात हे इंजेक्शन घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे.

हॉर्मोनच्या इंजेक्शनमुळे गर्भधारणा तर टाळता येतेच पण त्यापलीकडेही काही फायदे मिळतात. उदा. इंजेक्शन घेतलेल्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयात गाठी होण्याचा धोका कमी होतो. इंजेक्शन काही महिन्यातून एकदाच घ्यायचे असल्याने प्रत्येक संबंधाच्या वेळी दुसरी काही खबरदारी घ्यायची गरज नसते. अर्थात शरीरसंबधातून ‘गरोदरपण राहणे’ फक्त एवढाच भाग नसतो. एच. आय. व्ही.  किंवा इतर लिंगसांसर्गिक आजारांचा धोकाही असतो. या आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी सध्यातरी पुरुषांनी किंवा बायकांनी वापरायचे कंडोम हा एकच पर्याय उपलब्ध आहे. हॉर्मोनच्या इंजेक्शनमुळे लिंगसांसर्गिक आजारांपासून कुठलेही सरंक्षण मिळत नाही. त्यामुळे ज्यांना जोखीम आहे त्यांनी इंजेक्शन बरोबर कंडोमही वापरणे हितावहच आहे.

या इंजेक्शनचे काही दुष्परिणामही आहेत. अनियमित पाळी येणे, पाळी न येणे ही लक्षणे बऱ्याच जणींमध्ये दिसून येतात. परंतु इंजेक्शन थांबवल्यानंतर पाळी पूर्वपदावर येते. काही अभ्यासांमध्ये हाडं ठिसूळ होणे, स्तनांचा कॅन्सर, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होणे याप्रकारचे गंभीर दुष्परिणाम क्वचित दिसून आले आहेत.

साधारण १९५०-६० च्या दशकात हॉर्मोनची इंजेक्शन्स वापरायला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत जगभरात अनेक स्त्रियांसाठी हा संततीनियमनाचा सोयीस्कर मार्ग ठरला आहे. भारतात मात्र हॉर्मोनच्या इंजेक्शनचा वापर काही प्रमाणात वादग्रस्त ठरला आहे. दुष्परिणामांच्या शक्यतेमुळे समुपदेशन, योग्य ती वैद्यकीय मदत व देखरेखीखाली ही इंजेक्शन्स घेणे गरजेचे आहे. परंतु भारतीय सरकारी व्यवस्थेमध्ये एकंदरीत अशा प्रकारच्या सुविधांचा अभाव असायची शक्यता असते. या कारणास्तव हॉर्मोनच्या इंजेक्शनचा संततीनियमन कार्यक्रमामध्ये अंतर्भाव करू नये अशी आग्रही भूमिका काही स्वयंसेवी संस्था, आरोग्यासंदर्भात काम करणारे गट सातत्याने घेत राहिले आहेत. भारतात ही इंजेक्शन्स खाजगी दवाखाने, केमिस्ट, डॉक्टरांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहेत. सरकारी संततीनियमन कार्यक्रमाद्वारे ती उपलब्ध करण्याच्या निर्णयाला नुकतीच मान्यता मिळाली आहे.

Email – health@prayaspune.org

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.