‘आंतरजातीय विवाह – प्रश्नांची उकल’ _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

2 385

‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह – प्रश्नांची उकल’ (भाग १) _ प्रा. डॉ. मेघा पानसरे

‘आंतरजातीय/धर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’ या विषयावर ‘आयसोच’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. यासाठी ‘भारतीय महिला फेडरेशनच्या कोल्हापूर’ च्या जिल्हाध्यक्ष तसेच, आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र, कोल्हापूर’ च्या सचिव, प्रा. डॉ. मेघा पानसरे यांना आमंत्रित केले होते. उपस्थित युवकांचा खूपच चांगला प्रतिसाद आणि सहभाग होता. या सत्रामध्ये ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राच्या स्थापनेची गरज का निर्माण झाली याविषयी त्यांनी केलीली मांडणी वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

 एक मुस्लीम मुलगा आमच्याकडे आला आणि म्हणाला की, ‘माझ्या होणाऱ्या बायकोला सरकारी वसतिगृहामध्ये डांबून ठेवलं आहे. तिला सोडवण्यासाठी तुम्ही माझी मदत करा.’ या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की, ती मुलगी हिंदू होती, वयाने सज्ञान होती मात्र तिच्या पालकांना तिचा मुस्लीम मुलाशी विवाह करण्याचा निर्णय मान्य नसल्यानं, पोलीसांना पैसे देऊन तिला न सोडण्याविषयी सांगितले होते. या प्रकरणात आम्ही लक्ष घातलं आणि त्या मुलीला सोडवून आणलं. तिला सोडवून आणल्यानंतर आमच्यासमोर प्रश्न होता की, त्या मुलीला ठेवायचं कुठं? कारण मुलाच्या कुटुंबियांना तिच्या घरी येण्याबद्दल अडचण असणार हे स्वाभाविक होतं. म्हणून तिला आमच्या घरी ठेऊन घेतलं आणि दरम्यानच्या काळात मुलाच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. ‘त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही लग्न करून दिलंत तर तो सुखी होईल. जर तुम्ही इच्छे विरुध्द लग्न करून दिलंत तर त्यातून अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.’ अशा प्रकारचा संवाद साधल्यानंतर मुलाचे आईवडील या लग्नासाठी तयार झाले. मात्र त्यांनी आग्रह धरला की, ‘तिचा मुस्लीम विवाह पद्धतीनं ‘निकाह’ करा आम्ही लगेच मुलीला घरी घेऊन जातो’.

आम्ही त्या मुलीला ‘मुस्लीम विवाह कायदा’ तसेच ‘विशेष विवाह कायदा’ याविषयी समजावून सांगितलं. ‘आज ते प्रेमात आहेत पण उद्या जर यांच्यामध्ये इतर जोडप्यांमध्ये होतात तसे काही वाद झाले तर मुस्लीम विवाह कायद्यानुसार तो मुलगा हिला ‘ट्रिपल तलाक’ देऊ शकतो किंवा चार लग्न करू शकतो’ याची तिला कल्पना दिली. यांवर त्या मुलीने ‘विशेष विवाह कायद्या’ नुसार तीन आठवड्यांची नोटीस देऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात आम्ही मुलीच्या आईवडीलांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते लग्नासाठी तयार झाले नाहीत. त्यांनतर तीन आठवड्याच्या नोटीसनंतर आम्ही त्या मुलीचे विशेष विवाह कायद्यानुसार लग्न लावून दिले. मी या लग्नामध्ये साक्षीदार होते. या हिंदू-मुस्लीम विवाहाच्या प्रक्रीयेमध्ये आम्ही सहभागी असताना आमच्या असं लक्षात आलं की, मुला-मुलींना हिंदुत्ववादी आणि मुस्लिमवादी शक्ती, कुटुंबियांचा आणि समाजाचा दबाव या सगळ्यालाच सामोरं जावं लागलं. ते दोघंही प्रचंड तणावातून जात होते.

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना समाजामध्ये प्रचंड विरोध असल्यानं, विवाहाचा निर्णय घेणाऱ्या जवळजवळ सर्वच मुला-मुलींना प्रचंड तणावातून जावे लागते. ज्यांनी जातीधर्माच्या पलीकडे जाऊन आपला जोडीदार निवडला आहे, एकमेकांवर प्रेम आहे मात्र जात-धर्म आडवे येत आहेत अशा अनेक तरुण मुला मुलींचा हा प्रश्न आहे. अशा युवक युवतींना कोणीही पाठींबा देत नाही. त्याच काळात कोल्हापूरच्या आजूबाजूच्या भागातील, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन तरुण जोडप्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून आल्या. तेव्हा लक्षात आलं की, अशा मुलांना आधाराची गरज आहे आणि यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.

आमच्याकडे मदतीसाठी आलेल्या जोडप्याचं लग्न लावून दिल्यानंतर आम्ही वर्तमानपत्रात बातमी दिली की, आम्ही आंतरधर्मीय लग्न लावून देत आहोत आणि एक जाहीर रिसेप्शन ठेवलं आहे. यासाठी पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक प्रतिष्ठित लोकांना बोलावलं होतं. याशिवाय ज्यांनी आंतरधर्मीय लग्न केलं आहे, अशा जोडप्यांनी या रिसेप्शनला यावं असं आवाहन केलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या रिसेप्शनला ज्यांना नातवंडं आहेत अशा वृद्ध जोडप्यापासून ते ज्यांनी आत्ता नुकतंच लग्न केलं आहे अशा जोडप्यापर्यंत जवळजवळ २५ आंतरधर्मीय लग्न केलेली जोडपी आली होती.

एका हिंदू-मुस्लीम जोडप्यानं सांगितलेला अनुभव आवर्जून सांगावासा वाटतो. त्यांचं लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांचे दोन्ही कुटुंबीय एकमेकांकडे यायला लागले. त्या जोडप्याला एक नुकतंच बोलायला लागलेला मुलगा होता. हिंदू काय किंवा मुस्लीम काय हे कळण्याचं त्याचं वय नव्हतं. त्याला ‘आजोबा कुठे गेलेत?’ असं विचारलं असता तो म्हणाला, ‘आजोबा मंदिरात नमाज पढायला गेले  आहेत.’ अशा प्रकारे कोणताही भेदभाव न करता, दोन्ही धर्मांचा आदर ठेवून ते एकत्र येतात आणि सध्या आनंदात आहेत.

रिसेप्शनसाठी आलेल्या अनेक जोडप्यांनी त्यांना सामोरं जावं लागणाऱ्या अडचणींविषयीही सांगितलं, त्यांची मनोगतं व्यक्त केली. अनेकांना सामाजिक दबावामुळे त्यांची ओळख लपवावी लागली. त्यांच्या मुला-मुलींची जात, धर्म कोणता लावायचा असे प्रश्न निर्माण व्हायचे. बऱ्याचदा मुलींनी लग्नानंतर नवऱ्याचाच धर्म किंवा जात स्वीकारावी असा आग्रह धरला जायचा. हे सगळं जेव्हा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आलं तेव्हा त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि आमच्याकडे लोकांचा ओघ सुरु झाला. दररोज किमान २ ते ३ जोडपी आमच्याकडे यायची. लोक खूप घाबरलेले असायचे. कुटुंबियांकडून किंवा समाजाकडून विरोध होईल, घरचे बरोबर नसतील, पळून जाणार तर कुठे जाणार ? लग्न कसं करायचं? कोणत्या कायद्याखाली करायचं? असे असंख्य प्रश्न त्यांच्या डोक्यात असायचे.

लग्न झाले नसेल तर विवाहपूर्व समुपदेशन, पालकांचे समुपदेशन, लग्न झाले असेल तर विवाह पश्चात समुपदेशन, लग्न लावून देणं अशा स्वरूपात मदत करायला सुरुवात केली. सत्यशोधक विवाह पद्धतीवर आधारित आम्ही एक नवीन पद्धत विकसित केली. यामध्ये समाजसुधारकांचा इतिहास सांगणारी मंगलाष्टका, प्रतिष्ठीत लोकांना आमंत्रित करणं, आई-वडील किंवा नातेवाईक यांचा सत्कार आणि सर्वासाठी स्नॅक्स या गोष्टींचा सामावेश करण्यात आला.

हे करत असताना आम्हाला असं जाणवलं की, एखादी संस्था स्थापन करण्याची गरज आहे म्हणून २००६ मध्ये  ‘भारतीय महिला फेडरेशन’, ‘श्रमिक महिला प्रतिष्टान’  आणि  अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ यांनी मिळून ‘आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र’ स्थापन केलं. या केंद्रामध्ये कोणतेही शुल्क न आकारता मुला-मुलींना मदत केली जाते.

साभार: ‘आयसोच’ आयोजित ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह- प्रश्नांची उकल’  या विषयावरील कार्यशाळेमध्ये मेघा पानसरे यांनी केलेल्या मांडणीतील काही भाग 

You might also like More from author

2 Comments

 1. विनोद कांबळे says

  मला पण लग्न कऱ्याच आहे पण मुलीचं वय पूर्ण नाही त्यामुळं थांबलो आहे आम्ही ? तुमची गरज आम्हाला लागल त्यामुळ तुमच फोन नंबर असलं तर माझा email वर पाठवा ना खूप उपकार होतील तुमचे आमचा दोगांचा प्रेमा वर?

  1. I सोच says

   हॅलो विनोद,
   तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला भावी सहजीवनाच्या खूप खूप शुभेच्छा… तुम्ही मुलीचे वय पूर्ण नाही म्हणून थांबला आहात यावरून तुम्ही तुमचे निर्णय विचारपूर्वक आणि सामंजस्याने घेत आहात असे वाटते. असेच सर्व निर्णय घ्या. तुम्हाला कशा स्वरुपाची मदत हवी आहे आणि कोणत्या शहरात ते कळवा म्हणजे तुम्हाला योग्य त्या संस्थेचा क्रमांक देऊ.

   पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा !!!

Leave A Reply

Your email address will not be published.