गुज एकच सांगेन कानी, प्रिती परी तुझ्यावरती…

माझा जन्म मुंबईचा. आमची एकूण पाच जणांची फॅमिली. घरचं वातावरण थोडं ओर्थोडॉक्स पद्धतीचं. आमची मध्यमवर्गीय फॅमिली.

मी ‘रहेजा’ ला जाऊ लागल्यावर एका आठवड्याने सपनाने प्रवेश घेतला. तीही माझ्या वर्गात आली. मी मराठी मिडीयमची असल्यामुळे इंग्रजीचे जरा वांदे होते. सरांनी काहीतरी विचारलं आणि सपनानं इंग्रजीमध्ये उत्तर दिलं. त्यामुळे मला अजूनच बुजायला झालं. सपना सर्वात आधी असाइनमेंट्स सबमिट करायची. आमच्यात यावरून कुजबूज व्हायची.

सपनाचं माझ्याकडे कधी लक्ष गेलं मला माहित नाही, पण माझ्या बाजूनी मला आठवतं, की आम्ही मनोरीला सहलीला गेलो होतो. तेव्हापासून आमच्या नात्याला रूप यायला लागलं. मनोरीला पाऊस सुरु होता. सर्वजण पावसात खेळत होते. सपनाला आणि मला पावसात खेळायला आवडायचं नाही म्हणून आम्ही दोघी छत्रीखाली बसलो होतो. सपनाने नेहमीप्रमाणे शर्ट- पॅन्ट घातलेली होती. आम्हाला सरांनी मागून पाहिलं तर त्यांना वाटलं की, मुलगा-मुलगी आहेत म्हणून त्यांनी पुन्हा जवळ येऊन पाहिलं. तेव्हापासून आमचा ग्रुप आम्हाला ‘आले हे नवरा बायको’ असं म्हणून चिडवायचे. मला वाटतं, त्यावेळेपासून मला तिच्याबद्दल काहीतरी वाटतंय याचा अर्थ कळायची सुरुवात झाली. पूर्ण अर्थ समजायला दोन वर्ष लागली. मला हळूहळू कळू लागलं होतं, की हे मैत्रीपालीकडचं नातं आहे. पण नक्की काय हे कळलं नव्हतं. तिला सोडून कोणत्याही मुलामुलींवर माझं लक्ष गेलं नाही.

मला माझ्या भावना बोलून दाखवता यायच्या नाहीत. ती मला म्हणायची, “ तुला भावना बोलून नाही नं दाखवता येत तर मग मला लिहून सांग. एकदा मी तिच्यासमोरच तिला पत्र लिहिलं. लिहिता लिहिता माझं मला क्लिअर झालं, की ती मला खूप आवडते. माझ्या आयुष्यात तिचं विशेष स्थान आहे हे स्पष्टपणे दिसलं. तेव्हा कळलं, की मी तिच्या प्रेमात आहे आणि तिचा सोडून दुसऱ्या कुणाशीही लग्न करायचा मी विचारही करू शकत नाही. तिला ते पत्र दिलं तिनं ते वाचलं तिला हे नातं क्लिअर होतं आणि तिला हेच ऐकायचं होतं. साहजिकच तिला खूप आनंद झाला.

तेव्हा आमचे लैंगिक संबंध नव्हते. पुढचं वर्ष आम्ही फक्त किस करायचो. त्यानंतर खूप दिवसांनी संबंध आले कारण एकांत मिळणं अवघड होतं.

कॉलेज संपल्यावर घरच्यांची चर्चा सुरु झाली, की आता हिचं लग्न लावायचं. त्यावेळी मी काहीही बोलायची नाही, पण हे ठाम होतं, की मी लग्न करणार नाही. आई खूप आक्रमक, शिस्तबद्ध असल्यामुळे मी कोणत्याच बाबतीत तिच्याशी मोकळेपणाने बोलू शकले नाही. तिची भीती होती म्हणून तिला काही सांगू शकले नाही. वडील इतके व्यस्त असायचे, की त्यांना बोलायला वेळच नसायचा.

माझ्या प्रेमाची गोष्ट सोडून मी माझ्या आजीशी मात्र मी सर्वकाही बोलायचे. मला वाटतं, की तिला याचीही कल्पना असावी कारण एकदा सपना व मी किसिंग करताना ती अकस्मात खोलीत आली होती. तिला हे विचित्र वाटलं, पण ती काहीच बोलली नाही. अधूनमधून मात्र ती म्हणायची “तुम्ही बहिणीसारख्या दिसता.” मी लग्न करावं असा आग्रह आजीने कधीही केला नाही.

ग्रॅज्यूएशनच्या वेळी आमच्या ग्रुपमधल्या एकीचं लग्न ठरलं, पण ते वर्षातच मोडलं. मला आईला सांगायला कारण मिळालं, की ‘ बघ हा सगळा जुगार आहे. मला यात पडायचं नाही.’ आईनी अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मी गोडीगुलाबीनं ऐकत नाही हे बघितल्यावर आई मला म्हणाली, “ लग्न कर, नाहीतर एक तू तरी या घरात रहा, नाहीतर मी या घरात राहते. दोघांपैकी एकाच जण इथे राहील. बाबांनी मध्यस्थी केली, म्हणाले, “जाऊ दे, तिला नाही ना करायचं मग जबरदस्ती करू नकोस”

अध्या आर्थिकदृष्ट्या मी स्वतंत्र आहे. घरावर विसंबून नाही, पण एवढी मिळकत नाही, की स्वतःची खोली घेऊन आम्ही दोघी राहू.

या प्रवासात आमची भांडणं झाली, पण एकमेकांना सोडायचा विचार मनातही कधी आला नाही. एक बिकट प्रसंग आला. नाही असं नाही. मी नोकरी करत होते तेव्हा सपनानं अॅनिमेशन कोर्सला प्रवेश घेतला. तिथे तिला एक शिक्षिका आवडली. तिच्यासोबत ती जास्त वेळ घालवू लागली. ती म्हणायची, की ‘ ते फक्त इनफॅक्च्युएशन आहे, प्रेम नाही.’ पण मला खूप त्रास व्हायचा. खूप असुरक्षित वाटायला लागलं. आम्ही बाकी कोणा लेस्बियनना ओळखत नव्हतो. वाटायचं, आम्हीच असं जगातलं एकमेव जोडपं आहोत- ‘मेड फॉर इच अदर’.  या काळात खूप भांडणं झाली. एकदा रागाच्या भरात तिने मला लिहिलेली सर्व पत्र मी रागात एका तळ्यात फेकून दिली. मनात आत्महत्येचा विचार आला. मी तिला फोन केला तिला गांभीर्य कळलं आणि ताबडतोब मला भेटायला आली. हे तिचं  ‘इनफॅक्च्युएशन’ साधारण एक वर्ष चाललं. मग ; . परत सर्व सुरळीत झालं. मला इतर जोडप्याचं कळत नाही. आज एकत्र असतात तर उद्या नसतात. हे कसं काय? आम्ही गेली अठरा वर्ष एकत्र आहोत भांडणं झाली, पण एक दुसऱ्याला सोडून द्यायचा विचार कधीही आला नाही.

मला अनेक खास जीवाभावाचे मित्रमैत्रिणी मिळत गेले. त्यांची मैत्री माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग होऊन गेली. इतके जीवाभावाचे मित्र मैत्रिणी असूनही मी माझी खरी ओळख त्यांना सांगू शकले नाही, कारण ते मला स्वींकारातील का? ही भीती आहेच. शिवाय त्यांना गमावण्याची मैत्री तुटण्याची कल्पनाही दु:खदायक आहे.

पूर्वी खूप भीती वाटायची आता विचारात बदल होऊ लागला आहे. भीती कमी झालीय. मुख्य म्हणजे मानसिक कुतरओढ संपली आहे. मला पहिल्यांदा माझ्या आईवडिलांना सांगायचंय पण ते मला अवघड वाटतंय. सांगितलं तरी ते समजून घेतील की नाही याची शंका आहे.

जीवनाच्या या वळणावर मागे वळून पाहता, मी निवडलेल्या जोडीदाराची मला पुरेपूर साथ मिळाली… मिळते आहे… सुखातही आणि दु:खातही. भले या टप्प्यावर आम्ही लौकिकार्थाने एकत्र राहत नसू, पण माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मी, हे पक्क आहे आणि त्याच्याइतकं दुसरं वैभव नाही. जे सर्वसामान्य जोडप्यात असतं ते … प्रेम, जिव्हाळा, कधी भांडण, कधी अबोला… हे सर्व सर्व आमच्यात आहे तरीही या नात्याचा उत्सव मात्र आमच्यासाठी नाही कारण ही लैंगिक ओळख अजूनतरी समाजमान्य नाही. स्वतःच्या अस्तित्वाची ओळख अशी लपवून जगावं लागणं तेही आप्तस्वकीयांपासून यासारखी अत्यंत क्लेशदायक गोष्ट नाही. ती एक प्रकारची घुसमटच आहे. मला आताशा असं वाटू लागलंय, की हे लपवणं म्हणजे प्रतारणा आहे… माझी माझ्याशी आणि जे माझे स्वकीय आहेत त्यांच्याशीही. हे आता थांबवावं. सांगून टाकावं सगळं. जे माझे खरे स्वकीय आहेत ते मला माझ्या या ओळखीसह नक्कीच स्वीकारतील. हे समजल्यावर जे भविष्यात सोबत नसतील ते मला अनोळखी होते आणि अनोळखीच राहतील असं समजेन. शेवटी या माझ्या ‘ओळखी’ च्या आवरणाखाली मी तर तीच आहे, पूर्वीची नलिनी !

कॉलेजमध्ये असताना सपनाला लिहिलेली एक कविता –

शब्दाविन सांग सारे

आहे जे जे मनी

भास की  स्वप्न हे

वदशील का सत्वरी

भ्रम निवारून कधी

बघ माझ्या सखी

गुज एकच सांगेन कानी

प्रिती परी तुझ्यावरती

 

 

साभार: बिंदुमाधव खिरे यांनी संकलन केलेल्या अंतरंग- समलिंगी मुलामुलींच्या आत्मकथा या पुस्तकातील

‘नलिनी’ यांनी लिहिलेली कथा. सदर पुस्तक रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे यासाठी विक्रीसाठी उपलब्ध.

चित्र साभार: http://pad3.whstatic.com

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

 

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap