आता ती आणि तिच्या पिढ्या, होणार नाहीत ‘स्वाsssहा’

2 345

‘शब्दवेडी दिशा’ अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यां-कवयित्री दिशा शेखच्या कविता ‘वेदना आणि हुंकार’ यांनी भरलेले तृतीयपंथीयांचे भावविश्व उलगडत समाजव्यवस्थेवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या असतात. दिशा शेख एका ठिकाणी म्हणते, “आपल्याकडं नातं एका विशिष्ट चौकटीत पाहिलं जातं. मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको, आई-बाप, सासू-सासरे, आजी-आजोबा, यांसारख्या चौकटीत जी नाती बसतात तीच सामाजिक चौकटीमध्ये स्वीकारली जातात. हीच चौकटीतील नाती आपल्या समाजामध्ये मान्य आहेत आणि त्यांचाच आपल्या समाजामध्ये विचार केला जातो. काही जीवांना असं वाटत असेल की, त्यांना कुणाला जन्मालाच घालायचं नाही किंवा ते जे जीवन जगतात त्यात ते खुश आहेत. त्यातलीच मी एक, म्हणजे मी जन्माला घालू शकत नाही. माझं असणं, माझ्या भावना, माझं सहजीवनाचं जे स्वप्न आहे तेही तितकंच सत्य आहे फक्त ते समाजाला मान्य नाही. मी जेव्हा जेव्हा सामाजिक चौकटीत बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझं स्त्री नसणं आडवं आलं.”

काही व्यक्ती किंवा नाती समाजमान्य चौकटीत बसत नाहीत म्हणून त्यांना प्रवाहाच्या बाहेर ठेवलं जातं. यावर बोलणारी तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर आधारित कविता वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.

त्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं,

सहस्त्रावदी वर्षांपासून…  स्वाsssहा…

कुणीतरी अखंड सौभाग्याचं कुंकू लावलं भाळावर,

तिला देवीच्या स्वाधीन करून…स्वाsssहा…

कुणीतरी मग त्या देवपत्नीच्या पायात घुंगरं बांधली  आणि तिला नाचवलं गावाच्या मनोरंजनासाठी

तिला त्या अपमानाचं शल्य बोचू नये,

म्हणून दैवी घोषित केलं… स्वाsssहा…

कधी ती देवळात देवींचे,

तर जनानखान्यात राण्यांची लुगडी धुतली…स्वाsssहा…

तिचा जन्मच लोकांच्या कल्याणासाठी आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी आखला आहे,

असं तीही मानत होती…स्वाsssहा…

ती जन्मालाच यायची पापाची फळं चाखण्यासाठी,

पण ते पाप त्यांचं, स्वतःच्या भाळावर घेऊन जगत होती…स्वाsssहा…

आज मात्र चित्र बदललंय,

तिचं नाही…तिच्या शोषणपद्धतीचे…स्वाsssहा…

कुणीतरी उपभोगून तिचा खून केला,

देह गटारात, खाडीत तर तसाच अंथरुणात सोडून दिला…स्वाsssहा…

परवा ट्रेनमध्ये भीक मागणारी ती चालती ट्रेन सोडताना,

कमरेतून दोन हिश्यात विभागली गेली…स्वाsssहा…

समज आली तिला, शिक्षितही झाली ती, पण शोषण अटळ म्हणून मानसिकरित्या हरली;

आणि कंटाळून फासावर गेली…स्वाsssहा…

उमेदीच्या पहाटेसाठी, स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी, परत ती नव्याने जन्माला आलीये…

पण आता, ती सहस्रावदी वर्षांच्या या शोषणाच्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला नकार देते…

आता ती आणि तिच्या पिढ्या, होणार नाहीत ‘‘स्वाहा’’

कविता साभार :दिशा शेख उर्फ शब्दवेडी दिशा

चित्र साभार- दिशा शेख उर्फ शब्दवेडी दिशाच्या फेसबुकवरून

 

 

 

 

You might also like More from author

2 Comments

  1. sadhana says

    खूप छान आहे कविता….

    1. I सोच says

      हो. खरंच ही कविता तृतीयपंथीयांचे वास्तव अगदी नेमकेपणाने मांडते… तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…

Leave A Reply

Your email address will not be published.