‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’च्या निमित्तानं- निहार सप्रे

“बदन के खिलते बगीचे में, रोजी की जवानी उसे काँटों की तरह चुब रही थी”

या एका वाक्यातूनच ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ ची कथा आणि त्याच्यातली पात्रं डोळ्यासमोर येऊ शकतात.

गेल्या अनेक महिन्यांपासून सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडलेला हा चित्रपट गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. ‘बुरख्याखाली दडलेलं सत्य’ असं काहीसं दर्शवणारा हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात येण्याचं मुख्य कारण होतं, ते म्हणजे त्याची बोल्ड पण वास्तविकता दर्शवणारी कथा आणि त्यावर सेन्सॉर बोर्डनं घेतलेला आक्षेप. पण चित्रपट बघितल्यानंतर सेन्सॉर बोर्डनं हा चित्रपट का अडकवला असावा? याचा अंदाज आला.

चित्रपट बघताना मला प्रश्न पडला, की सेन्सॉरनं हा चित्रपट पूर्णपणे बघितलाय का? की चित्रपट न बघताच त्याच्या नावामध्ये फक्त ‘बुरखा’ हा शब्द असल्यानं त्याचं प्रदर्शन थांबवलं? तर्कशास्त्रीय विचार न करणाऱ्या किंवा एका विशिष्ट राजकीय समाजव्यवस्थेच्या जुनाट, प्रचलीत परंपरा मानणाऱ्या एका वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे सेन्सॉर बोर्ड चित्रपटाच्या माध्यमातून समोर येणारं सत्य लपवू इच्छित तर नाही ना ?

तार्किकदृष्ट्या विचार केला, तर या ठिकाणी ‘बुरखा’, हा कुठल्या धर्माला टार्गेट करून वापरलेला शब्द नसून ते स्त्रियांवरच्या नियंत्रणाला सिम्बॉलिकली वापरलेलं एक एक्सप्रेशन आहे. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हे नाव, रीप्रेस्ड समाजामध्ये राहणाऱ्या पण तरीही स्वतःच्या आशा, अपेक्षा, स्वप्नं असणाऱ्या स्त्रीयांना उद्देशून वापरलंय.

सत्यावर कितीही पडदा टाकायचा प्रयत्न केला तरी ते सत्य गायब होत नाही तर फक्त नजरेआड होतं. सध्या आपल्या समाजात एक असा मोठा वर्ग आहे, जो आपल्या अधिकारांचा वापर करून आणि धर्म, जाती, वर्णभेद अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत कोणत्याही सत्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अनेकदा समाजापुढे सत्य येऊ दिले जात नाही. तसं करण्यामागचा त्यांचा उद्देश काय असावा?

विशिष्ट वर्गाला मग तो विशिष्ट जातीचा असो, धर्माचा असो, वर्णाचा असो किंवा जेन्डरचा असो, स्वतःच्या अधीन ठेवण्यासाठी त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवच होऊ नये म्हणूनच ते सत्य अस्तित्वातच नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की काय कोण जाणे? सत्य पुढं आलं की, लोक विचार करू लागतात, प्रश्न विचारू लागतात. लोक प्रश्न विचारू लागले तर व्यवस्थेतील विशिष्ट लोकांच्या स्वतःच्या शक्तींना, अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.

अर्थात जे तार्कीकदृष्ट्या विचार करतात त्यांना हे सगळं समजू शकतं. समाजाच्या बुरसटलेल्या प्रथा, परंपरा आंधळेपणाने स्वीकारणाऱ्या लोकांना हे समजणं शक्यच नाही. आणि बऱ्याचदा त्यांना राजकीय स्वरूप देऊन स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या लोकांना हे समजून घेण्याची इच्छा नाही. असो…

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाची कथा आहे, भोपाळ शहरातील एका जुन्या इमारतीत, ‘हवाई मंजिल’ मध्ये राहणाऱ्या, वेगवेगळ्या वयातल्या चार स्त्रियांची, त्यांच्या fantasies ची, आणि व्यवस्थेच्या बंधनांमुळे त्यांना जगाव्या लागणाऱ्या त्यांच्या दुहेरी आयुष्यांची (duel life).

या चार स्त्रियांपैकी सर्वात लहान आहे रिहाना (प्लबिता बोर्थाकुर). २० – २२ वयोगटातील रिहाना ही मायली सायरसला स्वतःची आयडॉल समजते, बंद दरवाजामागे म्युजिकचा आनंद घेते आणि दिवसा आई वडिलांच्या समोर स्वतःला बुरख्याआड लपवते. वाढत्या वयात येणाऱ्या रिहानाला रॉक गायक होण्याची इच्छा आहे, ‘त्या’ वयातल्या मुलींच्या ज्या इच्छा असतात, ज्या लैंगिक गरजा असतात त्या तिच्याही आहेत पण घरातल्या बंधनांमुळे तिला स्वतःच्या इच्छा आपल्या आई – वडिलांसमोर मांडता येत नाहीत त्यामुळं ती बुरख्याचा आधार घेत, घरी एक आणि कॉलेजमध्ये दुसरं असं दुहेरी आयुष्य जगते. बुरख्याचाच आधार घेऊन मॉलमध्ये चोरी करून तिची गरज बनलेल्या मेकपच्या सामानाची, कपड्यांची व्यवस्था करते. दुसरी स्त्री आहे लीला (अहाना कुमार). लीला एक ब्युटीशिअन आहे, जिचं लग्न ठरलंय पण तरीही तिच्या बॉयफ्रेंड बरोबर तिचे लैंगिक संबंध आहेत ज्याची तिला किंचितही लाज वाटत नाही. तिसरी आहे शिरीन (कोंकणा सेन शर्मा). शिरीनचा नवरा सौदीमध्ये काम करून परत आलाय आणि त्याच्या दृष्टीनं ती केवळ त्याची लैंगिक भूक भागवणारं  एक मशीन आहे. नको असणारी सततची गर्भधारणा आणि गर्भपातामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होणारी शिरीन. नवऱ्याच्या अपरोक्ष ती सेल्सगर्लचं काम करते, बेस्ट सेल्सगर्लचं बक्षीस मिळवते आणि त्यातून तिला कायम स्वरूपाची नोकरी करण्याची संधीही मिळते. पण तीच शिरीन स्वतःच्या नवऱ्याला मात्र कंडोम वापरण्यासाठी आणि सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पटवू शकत नाही. नवऱ्याची लैंगिक भूक भागवणारं मशीन बनून ती जगत राहते. चौथी आणि सर्वात मोठी स्त्री आहे उषा (रत्ना पाठक शाह). एका मिठाईच्या दुकानाची मालक असणारी उषा, सर्वांसाठी केवळ ‘बुआजी’ बनून राहिलीये, इतकी की बऱ्याचदा तिला स्वतःचं खरं नावही आठवत नाही. बुआजी रहात असणाऱ्या चाळीमध्येच राहणारे ५६ वर्षांचे भैय्याजी, ३५ – ४० वर्षांच्या बाईबरोबर पुन्हा संसार थाटण्याचा विचार करू शकतात पण ५५ वर्षांच्या बुआजीला मात्र तो विचार करण्याचं स्वातंत्र्य नाही. का? तर आता तिच्यामध्ये लैंगिक इच्छा राहिली नसावी म्हणून. पण ती मात्र धार्मिक पुस्तकांच्या आड अश्लील पुस्तकं वाचत स्वतःच्या फॅन्टसीजना जिवंत ठेवते. सत्संगच्या नावाखाली स्विमिंग लेसन घ्यायला जाते ज्यातून तिला ‘त्या’ तरुण कोचचा सहवास मिळतो जो तिच्या सेक्शुअल फॅन्टसीजचा भाग आहे, आणि रोजीच्या नावाखाली ती त्याच कोच बरोबर फोन सेक्स मध्ये गुंतते कारण तो तिची इच्छा बनलाय.

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला विशिष्ट अशी कथा नाही. या चार स्त्रियांची पात्रं, त्यांच्याबरोबर घडणाऱ्या घटना आणि सरतेशेवटी त्यांच्याच समाजाकडून होणारा त्यांचा भ्रमनिरास, त्यांची भंग पावलेली स्वप्नं पण तरीही त्यातून वाट काढत जगण्याची त्यांची जिद्द हाच या चित्रपटाच्या कथेचा गाभा आहे.

या सिनेमाला अनुसरून इथं काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

पहिला मुद्दा म्हणजे आत्तापर्यंत अशा सर्जनशील विषयांवर स्त्री दिग्दर्शकांनी बनवलेले जितके पण सिनेमे मी बघितलेत. त्या सिनेमांमध्ये आणि अशाच विषयांवर पुरुष दिग्दर्शकांनी बनवलेल्या सिनेमांमध्ये मुख्य फरक जाणवतो, तो म्हणजे स्त्री दिग्दर्शक कुठल्याही पात्राला किंवा घटनेला ग्लॉसी, प्लास्टिक स्वरूपात दाखवत नाहीत. त्यांनी दाखवलेली पात्रं, मग ती पुरुषांची असोत किंवा स्त्रियांची आणि त्यांच्या चित्रपटातील घटना या खूपच नैसर्गिक वाटतात. त्यात कुठेही, कसल्याही प्रकारचा सामाजिक किंवा राजकीय प्रपोगंडा नसतो. त्या जे दाखवतात ते फक्त मनापासून दाखवतात. एवढंच नाही तर कुठेतरी ते त्यांच्या जगण्यातून, त्यांच्या अनुभवातून येत असावं असं जाणवतं. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ मध्ये देखील जी पात्रं आपल्या समोर येतात ती अत्यंत नैसर्गिक आहेत. ती कुठेतरी आपल्या जगण्याचा भाग आहेत असं वाटतं.

चित्रपटातली सर्वच पात्रं खुलवण्यामध्ये चित्रपटाची लेखक आणि दिग्दर्शिका ‘अलंक्रिता श्रीवास्तवला’ शंभर टक्के यश आलंय आणि आपल्या समाजाची जी समजूत असते की फक्त वयात येणाऱ्या मुला– मुलींनाच सेक्शुअल फॅन्टसीज असतात त्या समजुतीवर दिग्दर्शिकेनं, वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रियांची फॅन्टसी दाखवून, घणाघाती घाव घातलेत. त्यासाठी तिला शंभर पैकी शंभर मार्क्स द्यावेसे वाटतात.

अशा प्रकारच्या चित्रपटात दाखवण्यात येणारे सो कॉल्ड एक्सपोजीव सीन्सबद्दल थोडक्यात लिहावेसे वाटते. एक तर सेक्स किंवा लैंगिक गोष्टींकडं आपण नैसर्गिक गोष्ट म्हणून बघत नाही. आजही आपल्याकडे स्वतःच्या लैंगिक इच्छांबद्दल उघडपणे बोलणं तर सोडाच पण पार्टनर म्हणून एकमेकांमध्ये बोलणं म्हणजे देखील काहीतरी भयंकर आहे असा समज आहे. आणि दुसरं म्हणजे मुळातच आपल्याकडे सिनेमाला एक सर्जनशील कलाप्रकार म्हणून न बघता फक्त व्यावसायिक, मनोरंजनात्मक दृष्टीकोनातूनच बघण्याची सवय आहे. त्यामुळं एखादं किसिंगचं दृश्य किंवा सेक्स सीन हा चित्रपटाच्या कथेचा केवळ एक भाग आहे हे न बघता त्याकडे देखील मनोरंजनात्मक दृष्टीकोनातून बघायचं हीच आपली मानसिकता बनलीये. सद्य परिस्थितीमध्ये ही मानसिकता बदलणं अवघड आहे असं जरी वाटत असलं तरी भविष्यात ही परिस्थिती बदलेल असा विश्वास ठेवणं एवढंच काय ते आपण करू शकतो.

चित्रपट बघताना आणि आजूबाजूच्या मुला – मुलींच्या कमेंट्स ऐकताना असं जाणवतं की ज्या सामाजिक – राजकीय परिस्थितीमधून सध्या आपण जात आहोत त्या परिस्थिती मध्ये डेवलपमेंट, संस्कृती रक्षण, स्त्रिया, नातेसंबंध, मानवी लैंगिकता याबद्दलचे आपले विचार खरंच इतके बुरसट झालेत, की खरंतर चित्रपटातल्या चारही स्त्रियांबरोबर जे घडतं ते बघताना कोणतीही संवेदनशील व्यक्ती विचार करायला भाग पडायला हवी. पण तसं होत नाही. त्याउलट, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सारखे सिनेमे बघायला येणाऱ्या लोकांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांना त्या सिनेमाच्या स्टोरी ऐवजी त्यातल्या सेक्शुअल कंटेंट मध्येच जास्त इंटरेस्ट असतो. म्हणूनच थीएटर मध्ये आलेली सो कॉल्ड “सर्जनशील” तरुण पिढी, ज्यांच्या हातात आपल्या देशाचं भवितव्य आहे असं आपण मानतो, ती या सिनेमातले सेक्स सीन्स किंवा त्या पात्रांना रिडीक्युल करायलाच उत्सुक आहेत असं जाणवतं. ही मानसिकता इतकी घातक आहे की कुठेतरी आपण माणूस म्हणून सेन्सिबल राहिलो आहोत की नाही? असा प्रश्न चित्रपट बघताना पडल्याशिवाय रहात नाही. आणि जर का आपल्याला खरंच एक सर्जनशील समाज बनवायची इच्छा असेल तर नुसतं ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ सारखे चित्रपट बनत रहाणं गरजेचं नाहीये तर त्या चित्रपटांचं कौतुक करण्याची मानसिकताही येणंही तितकंच गरजेचं आहे.

चित्र साभार: http://topyaps.com/lipstick-under-my-burkha-campaign

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap