पुरुषाची मानसिक कोंडी कशी फुटेल ???

0 763
  • उल्हासनगर येथे शाळेत शिकणाऱ्या रिंकू पाटीलने लग्नास नकार दिल्यामुळे भर वर्गात हरेश पटेलने तिला जिवंत जाळले. दुसऱ्या दिवशी रेल्वे ट्रॅकपुढे जाऊन त्याने जीव दिला.
  • आय.आय.टी., मुंबई येथे केमिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या जितेश शर्मा या तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आय.आय.टी. प्रवेश- परीक्षेत पास झाल्याची खंत व आय.आय.टी. मध्ये आल्यानंतर नापस झालेल्या विषयाबद्दलचा ताण व्यक्त केला होता.
  • मुंबईच्या वाकोला पोलीस स्टेशनात रजेच्या चौकशीमुळे नाराज असलेल्या असिस्टंट पोलिस सबइन्स्पेक्टर दिलीप शिर्के यांनी त्यांच्या वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर विलास जोशी यांच्यावर गोळ्या झाडून स्वतःलाही संपवले.
  • जानेवारी ते जून २०१५ या सहा महिन्यात विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात १३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद एका वृत्तपत्रात ठळकपणे दिसून आली.

वरील सर्व घटनांचा ऊहापोह करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की आयुष्याच्या विविध टप्प्यांवर असणाऱ्या घटनांतील पुरुषांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यामागची परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी असली तरी त्यातील एक समान बाब आहे. ती म्हणजे पुरुष म्हणून त्यांची होणारी मानसिक कोंडी.

आपल्या समाजात वयात आलेला मुलगा जसजसा मोठा होत जातो, तसतसा त्याने पुरुष म्हणून अधिकाधिक कमावणारा, सांभाळकर्ता, रक्षणकर्ता असलं पाहिजे, सतत जिंकत- यशस्वी होत राहिलं पाहिजे हे सतत बिंबवलं जातं. एक ‘चांगला पुरुष’ म्हणून कर्तबगारी बजावताना त्याला वा समोरच्याला ‘काय वाटतं’ ते गौण, हेदेखील त्यांच्या अंतर्मनावर बिंबवलं जातं.

शालेय जीवनात विविध तऱ्हेच्या स्पर्धांना सामोरे जाण्याच्या तयारीत इतर मुलग्यांशी तुलना होणं, आपल्याला हव्या त्या सर्व गोष्टी पालकांकडून मिळणं याची सवय होण्याबरोबरच नकाराचा व नकाराला कसे सामोरे जावे याचा अनुभव न मिळणंही बऱ्याच मुलग्यांच्या वाट्याला येतं. आणि मग पुढे आपल्याला आवडणाऱ्या मुलीने प्रेमाला वा लग्नाला नकार दिला, की त्यांच्यातील काहींचा अहंकार दुखावला जातो. त्यातूनच एकतर्फी आकर्षणातून क्रौर्याच्या घटना रिंकू पाटील व इतर मुलींच्या आयुष्यात आल्याचे आपण बघतो.  नकाराचा स्वीकार करू न शकणाऱ्या मुलाग्यांकडून जसे मुलींबाबत क्रौर्य दिसून येतं, तसंच मनगटाला ब्लेडने वार करून स्वतःला इजा केल्याच्या घटनाही मुलग्यांच्या बाबतीत घडलेल्या दिसतात.

पुरुष म्हणून जी कामगिरी बजावण्याचं दडपण पुरुषांवर असते, त्यात लैंगिक ‘काम’ गिरीचा भागही असतो. असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from bedroom to bedroom. १९- २० वर्षाचे नवविवाहित ते अगदी ७० वर्षापर्यंतचे पुरुष आपले लैंगिक सामर्थ्य वाढवण्याच्या चिंतेने ग्रस्त असतात. लैंगिकतेविषयीचं अपूर्ण वा अर्धवट ज्ञान, अनेक गैरसमजुती यामुळे अनेक पुरुषांमध्ये न्यूनगंड दडलेला असतो. ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना (समागम कालावधी ते लिंगाच्या आकाराविषयी) पद्धतशीरपणे पुरुषावर बिंबवल्या जातात. पौरुष सिद्ध करण्याच्या धडपडीत तो अनेक सेक्स टॉनिकसच्या जाहिरातबाजीला बळी पडतो. ‘कामसंबंधात रस घेणारा जोडीदार असणं’ हेच खरं सेक्स टॉनिक असतं, हे त्याला उमजतच नाही.

बदलेल्या जीवनशैलीचा प्रभावही पुरुषांच्या मानसिकतेवर होत असतो, विशेषतः १८ ते ३५ वयोगटातील पुरुषांच्या बाबतीत. कमीत कमी वेळात जास्तीत जात मिळवण्याची इच्छा (वा ताण) या पुरुषांमध्ये दिसून येते. स्मार्टफोन, फेसबुक, व्हाट्सअप या सर्वांचा प्रभाव त्यांच्यावर इतका असतो, की गतिमान, आभासी वास्तवाच्या दुनियेत मश्गुल तरुणांना (सोशल मिडिया) यांच्या दैनादिनीवर नियंत्रण करीत असते याचं भान राहत नाही. तत्काळ येणारं वैफल्य, नैराश्य व त्यातून उद्भवणारे निद्रानाश, हापरटेन्शन (अतिरक्तदाब) यांसारखे विकार (जे पूर्वी चाळीशीनंतरच्या पुरुषांत अधिक दिसत असत) आता विशी पस्तीशीच्या पुरुषांमध्ये दिसतात. मोबाईल फोनवरील हिंसक गेम्स व गुन्हेगारीचे उदात्तीकरण याचेही पडसाद त्यांच्या आक्रमकतेवर उमटताना आपण पाहतो.

कर्तेपण, मिळवतेपण आणि कर्तबगारी, सतत सिद्ध करण्याचं ओझं पुरुषांवर लादताना, पुरुषप्रधान व्यवस्था पुरुषांच्या भावनिक आविष्काराचं स्वातंत्र्य हिरावून घेत असते. भावना व्यक्त करणं हे नेभळटपणाचं, बायकीपणाचं, कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर, खाजगी संवादासाठी पुरुषाला मित्र मिळणं कठीण जातं. (फेसबुकवर त्याचे हजारांवर मित्र असले तरी !) दोन अनोळखी महिला प्रवासात भेटल्या तरी काही क्षणात त्या एकमेकींशी ओळख करून घेतात. दोन अनोळखी पुरुषांच्या बाबतीत तर हे दिसत नाहीच. पण जवळच्या जीवश्चकंठश्च मित्र म्हणवणाऱ्या पुरुषांमध्येही साधारणपणे दिसत नाही. गट म्हणून खेळण्यासाठी, दारू पिण्यासाठी, लैंगिक अनुभवाच्या फुशारक्या सांगण्यासाठी पुरुष एकत्र येऊ शकतात. व्यक्ती-व्यक्ती म्हणून संवाद साधण्यासाठी नाही.

बालपणापासून मुलाग्यांमध्ये भावनिक बुद्ध्यांक विकसित होताना आपणांस दिसत नाही. ऋजुता, हळुवारपणा, असुरक्षितता, घुसमट, गोंधळ, द्विधा- अवस्था पुरुष मोकळेपणाने दुसऱ्या पुरुषाची शेअर करताना खूप कमी दिसतात. पुरुषाची मानसिक कोंडी कुठे व कशी होते हे समजल्यावर ती कोंडी फोडण्यासाठी पुरुषा- पुरुषांमध्ये सशक्त, भावनिक संवाद आणि परस्परांमध्ये निकोप मैत्रभाव जागविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. आपल्या मनातील राग, संताप, अस्वस्थता व्यक्त करावी, साचलेला तुंबारा ओकावा. पुरुषा- पुरुषांमधील व्यक्तीबंध वाढवण्याबरोबरच गरजू पुरुषांनी मानसोपचारतज्ज्ञ किंवा प्रशिक्षित समुपदेशक यांचे वेळीच मार्गदर्शन घ्यायला हवे. आपल्याला मानसिक समस्या आहे म्हणजे काहीतरी लांच्छनास्पद बाब आहे व त्याकरता दुसऱ्या कुणाकडे जाऊन मार्गदर्शन घेणं हे आपण कमकुवत असण्याचं लक्षण, ही भावना बहुतांश पुरुषांची असते. ती दूर व्हायला हवी. स्वतःच्या कुटुंबात जगण्याचे क्षण, स्वतःसाठी अवकाश असणे महत्वाचे आहे.

पुरुष व पुरुषत्वाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अभिनेत्री जेन फोंडा म्हणाल्या, “आजच्या घडीचे पुरुषत्व (मर्दानगी) हे crisis मध्ये आहे, हे आपण सर्वांनी जाणले पाहिजे. पितृसत्तेच्या जखमांनी पुरुषाला दुभंगून त्याच्यातलं माणूसपण हिरावलं आहे. प्रचलित पुरुषत्वाच्या संकल्पनांना छेद देण्यासाठी पुरुषांनीच पुढे यायला हवे.” खरंच आहे ते, ‘पुरुषपणा’ची कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पुरुषाने स्वतःपासून सुरुवात करायला हवी.

लेखन: हरीश  सदानी

संदर्भ: मनोपानिषद- विश्रांती (दिवाळी अंक २०१५) मधील हरीश सदानी लिखित लेखातील काही भाग.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.