माझी मुलगी… सीमा गरुड

जान्हवी जन्मतःच अशी आहे. पण हे वेळीच आमच्या लक्षात आले नाही. तिच्या पाठीवर तिला एक भाऊ झाला. पण तो सामान्य आहे. चार-साडेचार वर्षांची झाली तेव्हा तिची चुलत बहिण, जी तिच्याच वयाची होती आणि जान्हवीत नेहमी तुलना व्हायची. ती सगळ्या गोष्टी उशिरा करायची. चालायला, बोलायला उशिरा शिकली. बालक मंदिरात घातले तेव्हा सगळ्या गोष्टी करायची पण नीटपणे नाही जमायचं.

अगोदर ती कन्या शाळेत होती दुसरीपर्यंत. पण तिला कोणी मुली सांभाळून घेत नव्हत्या. ती मोडतोड करायची. नेहमी तोंडातून विशिष्ट आवाज काढायची. एकदा तिचे पप्पा दाढी करत असताना चुकून तिने ब्लेड हातात घेतले, तिचे तुकडे केले आणि तिच्या हाताला इजा झाली. हातातून रक्त यायला लागले. तरीही ती काही रडत नव्हती. आम्हाला खूप भीती वाटली आणि गोंधळलोही, की ती रडली का नाही. मग ती एकदा जिन्यातून पडण्याची घटना झाली. मग अनेक डॉक्टर करून झाले, टेस्ट्स झाल्या. तेव्हा डॉक्टरांकडून कळले की जान्हवी विशेष आहे. तेव्हा ती साडेचार वर्षाची होती.

 मग अनेक डॉक्टर करून झाले, टेस्ट्स झाल्या. थेरपी घेतल्या. बोलण्यासाठी स्पीच थेरपी घेतली. तिचा बुध्यंक ८० होता तेव्हा. तेव्हा मी नोकरी करायचे, सुगावा प्रकाशनात. त्यांनीही मला खूप सहकार्य केले. पण आम्हाला थोडा उशीरच झाला ह्या सगळ्या गोष्टी करायला. मुलांचा विकास, मतिमंदत्व याविषयी मला फारशी कल्पना नव्हती. ती विशेष आहे म्हणजे काय हे समजायलाही वेळ लागला. अंध, हाताने किंवा पायाने अपंग मुलं असतात, परंतु बुद्धीचं अपंगत्व माहित नव्हतं. आपल्याला असं मूल कसं होऊ शकतं हेच समजत नव्हतं. पण आम्ही तिला स्वीकारले होते. मनापासून. पुढील वर्ष दोन वर्षात जेवढे म्हणून उपाय करता येतील ते केले. आम्हाला तिच्याबद्दल जन्माच्या वेळेसच कळले असते तर अगोदरच काही उपाय केले असते. ती सामान्य झाली असती किंवा आम्ही दुसर्‍या मुलाचा विचारच केला नसता. पण आम्हाला तिच्याबद्दल उशिरा कळले, ही एक खंत आहे. तिचं खूप करावं लागायचं, कधी कधी आमचेही पेशन्स संपायचे, मग कधी कधी ती आमचा मारही खायची. पण शून्यातून आम्ही तिला वर आणले.

जान्हवीला वयाच्या १३ व्या वर्षी पाळी सुरू झाली. पहिल्यांदा तिच्या आजीच्या ते लक्षात आलं. जान्हवीला ते समजत नव्हतं. तिला हे समजण्यास सात-आठ वर्षे गेली. त्या दिवसांतली जबाबदारी माझ्यावर होती. तिची आजी आणि मी तिला मदत करायचो त्या दिवसांत. तिला पॅड देणे, बदलायला सांगणे हे सर्व करायचो. स्वच्छतेबद्दल तर तिला अनेकदा सांगावं लागायचं, ती ऐकायची नाही. उलट उत्तरं द्यायची. लक्ष द्यायची नाही. मग कधी रागावून, कधी प्रेमाने हे करून घ्यावं लागायचं. वडील रागावले की ऐकायची. आम्ही तिची पाळीची तारीख कॅलेंडरवर लिहून ठेवायचो, चुकली तर लक्ष ठेवायचो. शाळेतल्या बाईसुध्दा तिला या दिवसांत खूप मदत करायच्या. शाळेत कधी पाळी आली तर पॅड द्यायच्या. आता मात्र तिला या गोष्टी समजतात, लक्षात येतात. पाळी येण्याअगोदर पोट, कंबर दुखते, मग तिला कळते की, पाळी येणार आहे ते.

तिचं विशेष असणं लवकर लक्षात आलं नाही. पण जेव्हा लक्षात आलं, तेव्हा तिच्या वडिलांनी खूप मनाला लावून घेतलं होतं. आम्ही तेव्हा तिरुपतीला गेलो होतो, दर्शनासाठी रांगेत उभे असताना ते मला म्हणाले, मी कधीतरी मित्रांमध्ये बोलून गेलो, की मुलगी काय दुसर्‍या घरी जाते, मला चांगला मुलगाच व्हावा. देवाने माझं काय ऐकलं आणि जान्हवीला त्याची शिक्षा मिळाली. ते त्या रांगेतच खूप रडले. त्यांनी माझी माफी मागितली. जान्हवीसाठी त्यांना खूप अपराधी वाटत होतं. पण त्यांनी तिला स्वीकारलं आणि नुसतं स्वीकारलं नाही तर तिच्यासाठी एकूण एक गोष्टी त्यांनी केल्या. जान्हवीसाठीची दैनंदिन कामंही ते करायचे. बरीच मोठी होईपर्यंत तेच तिला अंघोळ घालायचे. डोळ्याला पट्टी बांधून. आपलं मूल आहे मग त्यात लाज, संकोच खूप वाटायचा नाही. तीही वडिलांच्याच अधिक जवळ होती. पाळणाघरात सोडणे-आणणे, तिला भाजी आणायला घेवून जाणे हे तेच करायचे आणि आनंदाने. तिला वाचायला, बँकेची स्लीप भरायला त्यांनीच शिकवले. तिचं वाचन कौशल्य खूपच चांगलं आहे. घरी एकत्र कुटुंबपद्धती होती. मी जॉब करायचे, मुलाला सांभाळायचे. ते लवकर गेले. ते गेले त्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी जान्हवीसाठी पेन्शन योजना घेतली होती. तिच्या सुरक्षित भविष्याची सर्व तयारी केली होती.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap