स्वप्नदोष नव्हे स्वप्नावस्था

0 1,307

स्वप्नावस्था, नाईट फॉल, स्वप्नदोष, रात्रीचे वीर्य गळणे, झोपेत वीर्यपतन होणे याविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. बोलीभाषेमध्ये याला जरी स्वप्नदोष म्हणत असले तरीही यात काहीही दोष नाही.  स्वप्नावस्थेबद्दलचे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर विचारले गेले. तसेच समाजामध्ये आढळणाऱ्या स्वप्नावस्थेबद्दलच्या समाजुतींवर प्रकाश टाकणारा हा लेख वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे.  याविषयी तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा.

स्वप्नावस्था म्हणजे काय ?

एखादी व्यक्ती गाढ झोपेत असताना त्यांस कामोत्तेजक स्वप्न पडतात. अशा स्वप्नांमुळे लैंगिक उत्तेजना तयार होते आणि झोपेतच वीर्यपतन होते. याला स्वप्नावस्था असे म्हणतात. याला नाईट फॉल असंही म्हणतात. वैद्यकीय भाषेत यास ‘नॉक्टर्नल इमिशन’ असं म्हणतात.

स्वप्नावस्था कधी सुरु होते व कधीपर्यंत टिकते?

मुलगा वयात आला की स्वप्नावस्था सुरु होते आणि संभोग सुरु केल्यानंतर ती थांबते. लैंगिक संबंध न ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये ही अवस्था दिसून येते. संभोगामुळे व्यक्तीची लैंगिक इच्छा पूर्ण होते त्यामुळे स्वप्नावस्था सहसा आढळत नाही. तथापि, स्वप्नावस्था वयाच्या कोणत्याही वर्षी येऊ शकते. विशेषतः लैंगिक संबंध ठेवत नसेल तर स्वप्नावस्था परत येऊ शकते.

स्वप्नावस्थेमध्ये वीर्यपतन झाल्याने वीर्यनाश होतो का?  

वीर्याची निर्मिती ही वयात आल्यानंतर सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. लैंगिक संबंध असो, हस्तमैथुन असो वा स्वप्नावस्था यामुळे होणारे वीर्यपतन ही मानवाच्या लैंगिकतेशी निगडीत अगदी सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. म्हणूनच स्वप्नावस्थेमुळे वीर्यनाश होत नाही.

स्वप्नावस्थेवर काही औषधोपचार आहे काय?

स्वप्नावस्था आणि त्यामुळे होणारे वीर्यपतन ही मानवाच्या लैंगिकतेशी निगडीत अगदी सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे त्यामुळे ते का बंद करायचे इथून सुरुवात आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास हे बंद करण्याची काहीही गरज नाही. स्वप्नावस्थेच्या उपचारासाठी औषधांची गरज नसल्याने त्यावर वैद्यकीय निकषांवर तपासले गेलेले कुठलेही औषध उपलब्ध नाही. जर कुणी यावर उपचार अथवा औषध उपलब्ध आहे असा दावा करत असेल तर त्याला बळी पडू नका.

स्वप्नामध्ये वीर्यपतन झाल्यावर मला अपराधी वाटतं

काही वेळी स्वप्नावस्थेमध्ये कामोत्तक स्वप्न पडतात आणि त्यावेळी ओळखीची व्यक्ती किंवा नातेवाईक लैंगिक जोडीदार म्हणून दिसते. यामुळे मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. स्वप्नावस्थेविषयी आपल्या समाजात असलेले गैरसमज आणि अज्ञान यामुळे ती अधिकच पक्की होते. आपल्या लैंगिक भावनांवर आपले नियंत्रण नाही, संयम नाही असे वाटून नैराश्य देखील येऊ शकते. मात्र यामुळे तुमच्या मनात तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात असे वाटत असेल, भीती वाटत असेल, अपराधी वाटत असेल तर या नकारात्मक भावना मात्र दूर केल्या पाहिजेत. आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाची मदत घेतली पाहिजे.

Image Courtesy: http://reezi.deviantart.com

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.