No Fear No Shame – ‘I सोच’चे नवे अभियान

0 391

“ती मुलं सतत माझ्याकडे टक लावून बघतात आणि माझ्यावर शेरेबाजी करत असतात, मला खूप लाजिरवाणं वाटतं आणि टेंशन येतं.” , “ती मुलं माझी छेड काढत होती म्हणून मला कॉलेज सोडायला लागलं.” “बसमध्ये खूप गर्दी होती आणि एका माणसाने माझ्या छातीला हात लावण्याचा प्रयत्न केला.” “ते मला सतत बायल्या म्हणून हिणवतात?” अशा प्रकारचे अनुभव आपण नेहमीच ऐकत असतो.

अशा छळवणूकीच्या, अत्याचाराच्या अनेक घटना सर्वत्र होताना दिसतात. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते. मात्र “मस्करी कळत नाही का” किंवा “मी फक्त गंमत करत होतो” असे सांगून सहसा असे प्रकार जास्त गांभीर्याने घेतले जात नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही कारणावरून दुसऱ्यावर हसते किंवा त्याला सहज चिडवते तेव्हा त्याच्यामागचे कारण व आपण सहज केलेल्या मजेचा, विनोदाचा, मस्तीचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो हे समजून घेण्याची गरज आहे.

आजकाल स्त्रिया आणि इतर दुर्बल गटांबरोबर अशा हिंसक घटना सर्रासपणे होताना दिसतात. दुर्बलांपुढे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी, त्यांना नियंत्रणात किंवा त्यांना त्रास देण्यासाठी गुंडगिरी/ दादागिरी/छळवणूक अशा पर्यायांचा वापर होताना दिसतो. एखाद्या व्यक्तीला, चिडवून, दुर्लक्षित करून, अपमान करून, शारीरिक हल्ले व इतर प्रकारचे धोके पोहचवून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो किंवा दुखावले जाते. आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात तर छळवणूकीच्या नेहमीच्या प्रकारांबरोबरच “सायबर बुलिंग” म्हणजेच इंटरनेट किंवा फोन इत्यादींचा वापर करून केली जाणारी छळवणूक असे अनेक नवनवीन प्रकार समोर येताना दिसतात.

अशा प्रकारच्या छळवणूकीविरुद्ध “ तथापि” च्या “ आय सोच’ या प्रकल्पा अंतर्गत “ नो फियर , नो शेम” हे अभियान पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या कॉलेजमध्ये राबवले जाणार आहे. या अभियानामध्ये लैंगिक छळ, छेडछाड, विविध प्रकारे इंटरनेटवरून होणारा छळ, एखाद्याला स्वतःच्या शरीराबद्दल लाज वाटावी असे वागणे, किंवा इतरांनी चिडवणे, तसेच विशेषतः, जात, लिंग, पुरुषत्व व स्त्रीत्व यावरील गैरसमज यांवर आधारित छळ, यांसारख्या मुद्द्यांवर विविध माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांसोबत चर्चा होईल. कॉलेज आणि सार्वजनिक परिसर सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कॉलेज व्यवस्थापन व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाईल. हे अभियान कॉलेज कॅम्पस, ऑनलाईन स्पेस (फेसबुक, मोबाईल फोन किंवा इतर सोशल नेट्वर्किंग साईट्स) व सार्वजनिक ठिकाणे या तीन पातळ्यांवर राबवले जाईल.

या अभियानामध्ये मुख्यतः महाविद्यालयीन युवक-युवतींसोबत, कॉलेजमध्ये तसेच कॉलेजच्या बाहेर विविध कार्यक्रम राबवले जातील. यामध्ये सडक नाटक, फेसबुक, फिल्म मेकिंग आणि मोबाईल च्या माध्यमातून कॉलेज, सार्वजनिक जागा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व इतर सार्वजनिक ठिकाणीही जनजागृती केली जाईल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या महाविद्यालयात आणि आजूबाजूच्या परिसरात छळवणूकी विरुद्ध लढण्यासाठी सकारात्मक पावलं उचलावीत यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल.

तुम्हीही यात अवश्य सामील व्हा. तुमच्या कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, संस्थेमध्ये या विषयावर कार्यक्रम घ्यायचा असेल तर आम्हाला आवर्जून कळवा. छळाच्या, अत्याचाराच्या विरोधात तुम्हीही संदेश तयार करा, फोटो, फिल्म, पोस्टर तयार करून आम्हाला जरूर पाठवा. आमच्या वेबसाइट आणि फेसबुक पेजवर आम्ही ते जरूर पोस्ट करू.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.