Home / आपली शरीरे / आकार नाही तर आनंद महत्वाचा !

आकार नाही तर आनंद महत्वाचा !

पुरुष म्हणून जी कामगिरी बजावण्याचं दडपण पुरुषांवर असते, त्यात लैंगिक ‘काम’ गिरीचा भागही असतो. असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom. ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर बिंबवल्या जातात. लैंगिकतेविषयीचं अपूर्ण वा अर्धवट ज्ञान, अनेक गैरसमजुती यामुळे अनेक पुरुषांमध्ये न्यूनगंड दडलेला असतो. लिंगाच्या आकाराविषयी पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्येही अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. सर्वसाधारपणे पुरुषाचे लिंग केवढे असावे? लिंग लहान असल्यास गर्भधारणेस काही अडचण येते का? लिंग वाकडे असल्याने काही अडचण येते का? लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखास बाधा येते का? लिंगाचा आकार वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या वेबसाईटवर विचारले गेले. हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन वेबसाईटच्या वाचकांसाठी ही माहिती देत आहे.

सर्वसाधारपणे पुरुषाचे लिंग केवढे असावे?

लिंगाचा आकार केवढा असावा याचा काही विशिष्ट मापदंड नाही. प्रत्येक पुरुषाच्या उत्तेजित लिंगाची लांबी आणि जाडी वेगवेगळी असते. उदा. काहींचं ४ इंच, काहींचं ५ इंच तर काहींचं ६ इंच. साधारणपणे लिंग ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का,  तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. उत्तेजित लिंग जर २ इंचांपेक्षा कमी असेल तर ही समस्या असू शकते यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लिंग वाकडे असल्याने काही अडचण येते का?

लिंग हे पूर्णपणे सरळ असतंच असं नाही. ते उजवीकडे किंवा डावीकडे किंचित झुकलेलं असू शकतं. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं यात काहीही गैर नाही तसेच यामुळे लैंगिक सुखास किंवा गर्भधारणेस काहीही अडचण येत नाही.

लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखास बाधा येते का?

लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. उत्तेजित लिंग जर दोन इंच किंवा त्यापेक्षा मोठे असेल तर लैंगिक सुखामध्ये कसलीही अडचण येत नाही. अनेक पुरुषांमध्ये आपल्या लिंगाची लांबी पुरेशी आहे का? आपण जोडीदाराला पूर्ण लैंगिक सुख देऊ शकतो का? याविषयी असुरक्षितता असते. बहुतेक वेळा मर्दानगी आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात.

लिंग लहान असल्यास गर्भधारणेस काही अडचण येते का?

शास्त्रीयदृष्ट्या सागायचे झाले, तर गर्भधारणेसाठी लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचण्याइतपत पुरेसे लांब असावे. एका वीर्याच्या थेंबामध्ये हजारो शुक्राणू असतात आणि गर्भधारणेसाठी एक शुक्राणू पुरेसा असतो. उत्तेजित लिंग जर  २  इंचापेक्षाही कमी असेल तर मात्र ही समस्या असू शकते यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

लिंगाची जाडी किंवा लांबी वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का?

लिंगाची जाडी आणि  लांबी वाढवण्यासाठी घरगुती उपाय किंवा शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेले एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. कसोटीस न उतरलेले हे उपाय अनेकदा भोंदू वैद्यांकडून किंवा बोगस औषध कंपन्यांकडून सुचविले जाण्याची शक्यता असते. खरंतर हे उपाय उपयुक्त ठरण्याऐवजी उपायकारक ठरू शकतात. या लेखामध्ये दिलेल्या माहितीतून आपल्याला हे समजले आहे, की लिंगाच्या आकाराचा आणि लैंगिक समाधानाचा किंवा गर्भधारणेचा काहीही संबध नाही. याचाच अर्थ जर उत्तेजित म्हणजेच ताठ लिंग जर दोन इंचापेक्षा मोठे असेल तर लिंगाची जाडी किंवा लांबी कशाला वाढवायची ?

थोडक्यात काय तर, ‘आकार नाही तर आनंद महत्त्वाचा !’

चित्र साभार: http://www.gq-magazine.co.uk/article/average-penis-size-facts

About I सोच

I Soch encourages Pune youth to SPEAK OUT on equality, safety, diversity within the discussions of sexuality. It is a platform to learn, argue and clarify.

14 comments

 1. प्रवीण

  माझे वय 22 आहे।
  माझं लहान पण पासून 1 वृषण लहान व 1 मोठे आहे ।
  सद्य काही त्रास नाही ।
  हस्तमैथुन करतो।
  पन लिंगावरची कातडी मागे होत नाही।
  याचा काही परिणाम मला लग्न नंतर होईल का?

  • सर्वप्रथम तुमच्या पहिल्या प्रश्नाविषयी बोलूया. वृषणाच्या किंवा बीजकोषाच्या आकारावरुन शुक्राणूंच्या निर्मितीवर काहीही परिणाम होत नाही. शरीराचं तापमान आणि वृषणांचं तापमान यामध्ये फरक असतो. वृषणांमध्ये शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठी ठराविक तापमानाची गरज असते. शरीराच्या रचनेमध्ये वृषणांची पिशवी शरीराबाहेर असते ज्यामुळं वृषणांची पिशवी आंकुचन आणि प्रसरण पावून तापमान राखता येतं. जर ठराविक तापमान निर्मितीसाठी वृषणांना अडथळा निर्माण होत असेल तर तर शुक्राणूंच्या कमी-जास्त निर्मितीवर परिणाम होवू शकतो. उदा. जास्त तंग किंवा उष्ण प्रदेशात जाडसर कपडे घालणं. जर लिंगाला संभोगादरम्यान ताठरता येत असेल आणि वीर्यामध्ये पुरेसे शुक्राणू असतील तर अंडकोष किंवा वृषण लहान असल्याने काहीही अडचण येत नाही. सेक्स किंवा संभोग करताना जर लिंगाला ताठरता येत असेल तर संभोग करताना अथवा लैंगिक सुखामध्ये बाधा येत नाही आणि तुमच्या वीर्यामध्ये सशक्त शुक्राणू असतील तर गर्भाधारनेस अडचण येत नाही. यामध्ये जर काही अडचण येत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे काहीही कारण नाही.

   आता वळूयात तुमच्या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराकडे. लिंगाच्या टोकाला एक फुगीर भाग असतो ज्याला शिस्नमुंड म्हणतात. शिस्नमुन्डावर एक त्वचा असते. मुलगा तारुण्यात आल्यावर ही त्वचा हळूहळू मागे नेता येते. काही मुलांची शिस्नमुंडावरची त्वचा खूप आवळलेली/टाईट असते व मागे सरकवता येत नाही. याला ‘फायमॉसिस’ म्हणतात. फायमॉसिस असलेले पुरुष आपल्या जोडीदारासोबत जेव्हा सेक्स करायला जातात तेव्हा त्वचा मागे सरकायला त्रास होतो व खूप दुखतं. त्यामुळे संभोग करताना खूप त्रास होतो. आपल्याला अशी अडचण आहे का हे डॉक्टरांकडून तपासून घ्या. डॉक्टरांनी फायमॉसिसचं निदान केलं तर छोटीशी शस्त्रक्रिया करून शिस्नमुंडावरचं कातडं काढून टाकलं जातं. याला सुंता करणं म्हणतात. सुंता केल्यानंतर शिस्नमुंड उघडं राहतं. सुंता केल्यानं लैंगिक सुखास बाधा येत नाही.

  • तुम्ही हा प्रश्न वेबसाईटवरील ‘प्रश्नोत्तरे’ या सेक्शन मध्ये देखील विचारला होता, तिथे याचे उत्तर दिले आहे. तुम्हाला उत्तर शोधणे सोपे जावे म्हणून खाली लिंक देत आहे.
   http://letstalksexuality.com/question/my_questions/
   वेबसाईटवर याविषयीचे इतरही प्रश्न आणि उत्तरे चर्चिली आहेत ती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
   http://letstalksexuality.com/question/

 2. Ling made tath pana kami ahe, te kase tath karu, maje vay 20 ahe. Upay sanga

 3. तथापि आणि i सोच let’s talk about sexuality हा जो उपक्रम आहे तो मला वाटतोय आजची खरी गरज ओळखून चालवला जातोय. माजे वय आता 20 वर्ष आहे. आणि पौउगंडा अवस्थेत मुलाना सेक्स बद्दल जे प्रश्न पडतात तसे मलाही पडायची पण माज वाचन चौउफेर व खूप असल्याने मला त्याची उत्तर मिळवणं सोप गेल. पण आता या उपक्रममामुळे लैंगिक जागृतीस चालना मिळणार आहे. तुमच्या या कालसुसंगत उपक्रमास शुभेच्छा ! गरज असेल तर मी ही विषयानुरुप लेख लिहून तुम्हाला मदत करेन. तुम्ही माज़ नाव किंवा मैल आय डी सूद्धा प्रसिद्ध करू शकता

  • धन्यवाद.. तुम्ही वेबसाईटसाठी लिहिलेलं आम्हाला नक्कीच आवडेल… आपण ईमेल किंवा फोनवर याविषयी सविस्तर बोलू शकतो…

 4. Give me your contact number

  • नमस्ते. माफ करा पण आम्ही हेल्पलाईन/ फोनवर मार्गदर्शन करण्याची सुविधा देत नसल्याने तुम्हाला आमचा संपर्क क्रमांक देता येणार नाही. वेबसाईटवर काही हेल्पलाईनची माहिती दिलेली आहे ती नक्की वाचा.

 5. तुमचा लेख आवडला मला पण मी आतापर्यंत ज्या ज्या स्त्रियांशी संभोग केला त्यांना हाच प्रश्न विचारला तर 80 टक्के स्त्रिया म्हणाल्या की लांब आणि जाड लिंग हे आम्हाला (स्त्रियांना) आतपर्यंत सुखाचा जाणीव करून देते

  • लिंगाच्या जाडीवर आणि लांबीवर स्त्रीचे लैंगिक सुख अवलंबून असते हा जसा पुरुषांमध्ये आढळणारा गैरसमज आहे तसाच तो स्त्रियांमध्ये देखील आहे. स्त्री उत्तेजित झाल्यावर स्त्रीच्या योनिमुखापासून पहिला २ इंच योनीचा भाग फुगून ‘ऑर्गगॅझमिक प्लॅटफॉर्म’ तयार होतो. या भागाला लिंगाचं जास्त घर्षण होतं. योनीच्या आतल्या भागात संवेदनशीलता कमी असते.
   स्त्रियांमधील ऑरगॅझम (लैंगिक पूर्ती)
   स्त्रियांना अशा प्रकारची संवेदना किंवा जाणीव असते हेच अनेक स्त्री पुरुषांना माहित नसतं. त्यामुळे अनेक स्त्रियांना ऑरगॅझमचा अनुभवच आलेला नसतो. स्त्रियांच्या योनिमध्ये क्लिटोरिस नावाचा एक पूर्णपणे लैंगिक अवयव असतो. क्लिटोरिस अतिशय संवेदनशील अशा स्नायूंनी बनलेला असतो. त्याचं टोक मूत्रद्वाराच्या किंवा लघवीच्या जागेच्या वरच्या बाजूला असतं पण त्याची आतली रचना संपूर्ण योनिमध्ये असते. क्लिटोरिसला स्पर्श झाला, ते घासलं गेलं की ते उत्तेजित होऊन थोडं ताठर होतं. हळूहळू त्यातील संवेदना वाढतात. स्त्रीच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि लैंगिक सुखाचा बिंदू गाठला की योनि व योनिमार्गातील, गुदद्वाराचे स्नायू प्रसरण आकुंचन पावतात आणि स्त्रीला लैंगिक सुखाचा अनुभव येतो. अनेकदा स्तनाग्रं किंवा शरीरातील इतर अवयवांना कुरवाळल्याने किंवा स्पर्श केल्यानेही ऑरगॅझम यायला मदत होते.
   प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकीला कशाने चांगला वाटेल, कशाने उत्तेजना निर्माण होईल हे सांगता येणं अवघड आहे. तरीही तुमचा तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला संवाद असेल तर तिला कशाने चांगलं वाटतं हे तुम्हाला एकमेकांशी बोलून कळू शकेल. त्यासाठी संवाद वाढवणं, घाई न करणं आणि एकमेकांना आवडेल अशा गोष्टी करणं हेही खूप महत्त्वाचं आहे.
   अजून एक गोष्ट लक्षात घ्या. लैंगिक उत्तेजना केवळ लैंगिक संबंधांच्या वेळीच निर्माण होते असं नाही. एरवी दिवसभरात तुम्ही काय काय गोष्टी एकत्र करता, एकमेकांचा सहवास तुम्हाला मिळतो का, तुम्ही इतर काय काय शेअर करता त्या सगळ्याचा परिणाम लैंगिक इच्छेवर आणि लैंगिक उत्तेजनेवर होत असतो. त्यामुळे एरवीही एकमेकांना आनंद वाटेल अशा गोष्टी करत रहा.
   एक गोष्ट मात्र नक्की. आपण केवळ सेक्स करण्यासाठी वापरलं जाणारं, जोडीदाराची शारीरिक गरज भागवणारं शरीर आहोत, आपल्या भावभावनांचा, सुखाचा विचार सेक्समध्ये नाही अशी भावना मुलींच्या मनात येत असेल तर ते त्यांना नक्कीच आवडणार नाही. मर्जीविरुद्ध, जोडीदाराला इच्छा झाली म्हणून सेक्सची जबरदस्ती मुलींना आवडणार नाही. किंवा एखाद्या फिल्ममध्ये पाहिलेली क्रिया मर्जीविरुद्ध करायला मुलींना आवडेल असंही वाटत नाही. आणि हेच सगळं पुरुषाच्या बाबतीतही तितकंच खरं आहे. अनेक मुलांना असं वाटतं की जोपर्यंत मुलीच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत तिला आनंद मिळत नाही. असले समज डोक्यातून काढून टाका. अधिक माहितीसाठी खालील लिंक्सवरील लेख वाचा.
   http://letstalksexuality.com/orgasm/
   http://letstalksexuality.com/clitoris/
   याशिवाय वेबसाईटवर यासंदर्भातील अनेक प्रश्नोत्तरे चर्चिली आहेत तीही नक्की वाचा. खाली प्रश्नोत्तरांची लिंक देत आहे.
   http://letstalksexuality.com/question/

 6. six month pasun majha right side cha vrushan madhe khup pain hot, semen eject jhalyvr tr khupch pain hot…plzz…upay sanga.

  • यासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयवासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बरं होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

 7. six month pasun majha right side cha vrushan madhe khup pain hot, semen eject jhalyvr tr khupch pain hot…plzz…upay sanga.

  • यासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. लैंगिक अवयवासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बरं होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published.