प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsट्रान्सजेंडर

transgender म्हणजे नेमकं कोण ? ते homosexual नसतात hetrosexual पण नाही मग कोण ते नेमकं ?

त्यांना कोणते sexual parts astat ?

1 उत्तर

ज्या व्यक्तीचं शारीरिक लिंग एक आहे व त्याचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे अशांना ‘ट्रान्सजेंडर’ म्हणतात. बहुतेक वेळा मुलगा मोठा होताना त्याला आपण मुलगा आहोत असं वाटतं व त्याच नजरेनं तो जगाकडे बघतो. तसंच बहुतेक मुलींची वाढ होताना त्यांना आपण मुलगी आहोत असं वाटतं व त्या मुलीच्या नजरेनं जगाकडे बघतात, जग अनुभवतात. काहींच्या बाबतीत मात्र असं नसतं. काही मुलांना लहानाचं मोठं होताना सातत्यानं वाटतं की ते मुलगी आहेत. याचा अर्थ असा, की काही मुलांची नैसर्गिक घडण अशी होते की त्यांचं शरीर मुलांचं असतं (लिंग, वृषण इ.). पण मानसिक घडण (लिंगभाव) मुलीची असते. म्हणजेच ते जग मुलीच्या दृष्टीने बघतात व अनुभवतात.

या गटातील पुरुष शरीरानं पुरुष असतो. म्हणजे त्याला लिंग व वृषण असतात. वयात आल्यावर लैंगिक इच्छा झाली, की लिंगाला उत्तेजना येते. म्हणजे शारीरिकदृष्ट्या तो इतर पुरुषांसारखा असतो पण मानसिकदृष्ट्या त्याचं भावविश्व ‘स्त्री’ सारखं असतं.

काहींना मुलींसारखा पेहराव आवडतो. काहींचं चालणंबोलणं बायकी असतं. पण हे सर्वांच्याच बाबतीत खरं असतं असं नाही. याला अपवादही असतात. म्हणून ‘स्टीरिओटाईप’ म्हणून मानला जाऊ नये. साहजिकच हे अपवाद आपल्या सहजपणे नजरेस येत नाहीत. माझी एक मैत्रीण जन्मानं मुलगा होती. आता लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून ती स्त्री बनली आहे. शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्याच्या शारीरिक ठेवणीवरून, पेहराव, आवाज, वागणुकीवरून त्याचा लिंगभाव ‘स्त्री’ चा आहे असं कोणीच ओळखलं नसतं. शर्ट-पँटमध्ये असायचा. त्याच्या बोलण्यात, वागण्यात तो स्वतःला ‘स्त्री’ मानतो हे कळायला कोणतीही बाह्य लक्षणं नव्हती. त्यांनी जेव्हा त्याचा लिंगभाव माझ्यापाशी व्यक्त केला तेव्हा मला कळलं, नाहीतर मला कळायला काहीही मार्ग नव्हता.

असं वेगळेपण काही मुलींमध्येही दिसतं. एखादी मुलगी लहानाची मोठी होताना स्वतःला मुलगा समजायला लागते. याचा अर्थ असा की काही मुलींची नैसर्गिक घडण अशी होते, की शरीर मुलीचं असतं पण मानसिक घडण (लिंगभाव) मुलाची असते. म्हणजे ती जग मुलाच्या दृष्टीनं बघते व अनुभवते.

ट्रान्सजेंडर स्त्रिया शरीरानं स्त्री असतात. म्हणजे त्यांना भगोष्ठ, शिश्निका, योनी, गर्भाशय, स्त्रीबीजांड, स्त्रीबीजवाहिन्या हे सर्व अवयव असतात. हे सर्व अवयव कार्यशील असतात. वयात आल्यावर अशा स्त्रियांना पाळी येते. म्हणजे शारीरिकदृष्ट्या त्या इतर स्त्रियांसारख्या असतात पण मानसिकदृष्ट्या मात्र त्यांचं भावविश्व पुरुषासारखं असतं.

काहींना मुलांसारखा पेहराव आवडतो, पुरुषी खेळ खेळायला आवडतात इत्यादी. याबाबतीतही दिसण्यावर काही नसतं. काही मुली दिसायला अत्यंत नाजूक असतात आणि दिसण्यावरून त्या स्वतःला पुरुष मानतात हे कळायला काहीही मार्ग नसतो.

प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून- शिकवून घडत नाही. मुलांना/मुलींना तुम्ही लहानपणी कसं वाढवता येतात यावरून तो शिकला जात नाही. उदा. लहानपणी मुलाला मुलीचे कपडे घातले, की त्यामुळे त्याचा लिंगभाव मुलीचा होत नाही. तसंच कुणाचं अनुकरण करूनही तो बदलत नाही. उदा. एखादा मुलगा मुलींमध्ये वाढला तर त्या मुलाचं चालणं, बोलणं बायकी होऊ शकतं. पण म्हणून त्याचा लिंगभाव मुलीचा होत नाही. तो स्वतःला मुलगी समजायला लागत नाही. म्हणजेच लिंगभाव हा शिकून येत नाही. तो पोहऱ्यात यायला आडात असावा लागतो. मारहाण करून किंवा कोणत्याही उपायांनी लिंगभाव बदलता येत नाही. जो लिंगभाव आहे तो स्वीकारणं हेच सर्वांच्या हिताचं असतं.

अधिक माहितीसाठी वेबसाईट वरील ‘सगळं नॉर्मल आहे’ हा सेक्शन वाचा.

https://letstalksexuality.com/category/its-perfectly-normal/

आपले उत्तर प्रविष्ट करा

18 + 3 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी