देवरिया बालिकाकांडाची सी.बी.आय चौकशी

52

लखनौ, गोरखपूर : देवरिया येथील बालिकागृहातील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने त्याबाबत सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याच स्वयंसेवी संस्थेकडून गोरखपूर येथे चालवण्यात येणाऱ्या वृद्धाश्रमात काही बेपत्ता मुली सापडल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या महिला व बालकल्याण मंत्री रिटा बहुगुणा जोशी यांनी सांगितले की, जिल्हा पातळीवर बराच गलथानपणा झाला आहे. गोरखपूर येथील वृद्धाश्रम चालवणाऱ्यापैकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. देवरियातील बालिकागृहातून बेपत्ता झालेली मुलगी तेथे सापडली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले की, याबाबत सीबीआय चौकशी करण्यात येईल. चौकशीसाठी विशेष तपास पथकही स्थापन करण्यात आले आहे. मागील सरकारेही याला जबाबदार असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. जिल्हाधिकारी विजयेंद्र पांडियन यांनी सांगितले की, गोरखपूर येथे मा विंध्यवासिनी संस्थेची व्यवस्थापिका गिरिजा देवी तिच्या कनकलता या विधवा मुलीसह राहत होती. त्यांना अटक करण्यात आली आहे. कारकून, महिला स्वयंपाकी, मोलकरीण यांनाही देवरिया पोलिसांनी अटक केली आहे. देवरिया बालिकागृहाची अधीक्षक कनकलता त्रिपाठी हिला अटक करणयात आली आहे.

देवरिया प्रशासन जबाबदार

परवाना रद्द केलेला असतानाही देवरियातील बालिकागृह बंद करण्याची जबाबदारी देवरिया प्रशासनाने पार पाडली नाही, अशी कबुली उत्तर प्रदेशच्या महिला व  बालकल्याण मंत्री रिटा बहुगुणा-जोशी यांनी दिली. येथील बालिकागृहातून २४ मुलींची सुटका करण्यात आली असून १८ मुली बेपत्ता आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हे बालिकागृह बंद करण्याचे आदेश जारी असल्याचे माहिती असतानाही ते वर्षभर चालू दिले त्यामुळे यात जिल्हा प्रशासन दोषी आहे असे त्या म्हणाल्या.

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी असे म्हटले होते की, बालिकागृहांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या आणखी घटना घडत असाव्यात अशी  भीती वाटते. त्यानंतर राज्यातील मंत्री रिटा बहुगुणा-जोशी यांनी देवरिया जिल्हा प्रशासन यात दोषी असल्याचे स्पष्ट केले. देवरियातील बालिकागृहातून २४ मुलींची सुटका रविवारी करण्यात आली होती. त्याआधी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे अशीच घटना सामोरी आली होती.

एकूण १५ नोटिसा दिल्या होत्या

गेल्या वर्षी जून महिन्यात देवरियाच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे बालिकागृह बंद करण्याबाबत आदेश जारी करण्यात आला होता, पण त्याचे पालन झाले नाही. देवरिया जिल्हाधिकाऱ्यांना ते बालिकागृह बंद करून मुलींना दुसरीकडे हलवण्यासाठी १५ नोटिसा जारी केल्या होत्या त्यात संचालनालयाकडून पाच पत्रे पाठवली होती त्यामुळे स्थानिक पातळीवरील अधिकारी याला जबाबदार आहेत, असे रिटा बहुगुणा-जोशी यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य सचिव रेणुका कुमार व अतिरिक्त महासंचालक अंजू गुप्ता या प्रकरणाची आता चौकशी करीत असून त्याबाबत जोशी यांनी सांगितले की, मुलींची जबानी घेण्यात आली असून नोंदी तपासण्यात आल्या. बालिकागृह बंद करण्याचे आदेश दिले तेव्हा २८ मुली होत्या. सध्या तेथे २० मुली व तीन मुले होती. संस्थेच्या नोंदीनुसार तेथे ४२ मुले होती. उर्वरित मुलांचा पत्ता लागलेला नसून २४ ते ४८ तासात त्यांचा शोध घेतला जाईल. देवरियाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, बालिकागृहातून २४ मुलींची सुटका करण्यात आली तरी उर्वरित मुले कुठे आहेत हे अजून गूढ कायम आहे. रिटा बहुगुणा-जोशी यांनी सांगितले की, आम्ही तटस्थपणे चौकशी करीत आहोत, कुणाही दोषी व्यक्तीला सोडले जाणार नाही. मुख्यमंत्री आदित्यनाथ या चौकशीवर लक्ष ठेवून आहेत. चौकशी अहवाल आजच हाती येईल. बसपा सरकारचाही यात दोष आहे कारण मा विंध्यवासिनी विमेन ट्रेनिंग एवम समाज सेवा संस्थान या संस्थेला बालिकागृह चालवण्याचे काम २०१० मध्ये त्यांनीच दिले होते.

बातमी साभार : https://www.loksatta.com/desh-videsh-news/cbi-to-investigate-deoria-shelter-home-case-1728008/

Comments are closed.