लैंगिकतेविषयी र.धों. कर्वेंची विचारधारा

0 270

आज १४ जानेवारी,  र. धों. कर्वे म्हणजेच रघुनाथ कर्वे यांचा जन्मदिवस. संततिनियमनाचा प्रसार- प्रचार आणि समाजाचे लैंगिक शिक्षणाद्वारे प्रबोधन हे त्यांनी आपले जीवनकार्य म्हणून स्वीकारले. र.धों.ची विचारधारा केवळ संततिनियमन आणि लैंगिक आरोग्य किंवा स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याच्या मुद्दय़ापुरतीच मर्यादित नाही. एकंदरीतच समाजाच्या स्त्री-पुरुष नातेसंबंधांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत आणि स्त्रियांच्या मानवीपणाबद्दल एक अतिशय तर्कशुद्ध अशी समानतावादी भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. रघुनाथ कर्वे यांची विचारधारा मांडणारा, त्यांची नात प्रियदर्शिनी कर्वे यांनी लिहिलेल्या लेखातील काही भाग वेबसाईटसाईटच्या वाचकांसाठी देत आहोत.

र. धों. नी  स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा हिरीरीने पुरस्कार केला. संततिनियमनाचा प्रसार- प्रचार आणि समाजाचे लैंगिक शिक्षणाद्वारे प्रबोधन हे त्यांनी आपले जीवनकार्य म्हणून स्वीकारले आणि त्यांच्या पत्नी मालती कर्वे यांनी घर चालवण्यासाठी अर्थार्जनाची जबाबदारी पेलली. खांद्यावर शिवधनुष्य घेतलेले असताना त्यात आणखी आव्हानांची भर नको म्हणून आपल्याला अपत्य होऊ द्यायचे नाही, असे या पती-पत्नीने परस्परसंमतीने ठरवले. र. धों.नी स्वत: नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेऊन त्या निर्णयाची अंमलबजावणीही केली. अतिशय निष्ठेने आणि धैर्याने त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाच्या माध्यमातून आयुष्याच्या अंतापर्यंत आपले विचार लोकांपुढे मांडले. र. धों. आणि मालती कर्वे यांच्या या वेगळय़ा जीवनवाटेवर त्यांना समाजाकडून आणि तात्कालिक सरकारकडून विरोध सहन करावा लागला होता.

र.धों.ची विचारधारा केवळ संततिनियमन आणि लैंगिक आरोग्य किंवा स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याच्या मुद्दय़ापुरतीच मर्यादित नाही. एकंदरीतच समाजाच्या स्त्री-पुरुष नातेसंबंधांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत आणि स्त्रियांच्या मानवीपणाबद्दल एक अतिशय तर्कशुद्ध अशी समानतावादी भूमिका त्यांनी सातत्याने मांडली. पुरुष आणि स्त्री एकसमान आहेत, हे दाखवण्यासाठी स्त्रीत्वाचे उदात्तीकरण करण्याची त्यांना गरज वाटली नाही. जे मानवी गुण-दोष, आशा-अभिलाषा पुरुषांमध्ये दिसून येतात, तशाच त्या स्त्रियांमध्येही आहेत. आणि पुरुषांचे गुण-दोष, आशा-अभिलाषा ज्या सहजतेने स्वीकारार्ह मानल्या जातात, त्याच सहजतेने स्त्रियांमध्येही त्या स्वीकारार्ह मानल्या पाहिजेत, हा त्यांच्या विचारांचा गाभा होता. पण आज सत्तर-पंचाहत्तर वर्षांनंतरही त्यांचे विचार वादग्रस्त वाटतात, कारण अगदी जागतिक पातळीवरसुद्धा र. धों.च्या कल्पनेतल्या स्त्रीच्या माणूसपणाच्या जाणिवेपासून समाज अजून फार लांब आहे असे दिसते.

गर्भनिरोधक साधने आणि कुटुंबाच्या निर्णयप्रक्रियेत वाढलेला सहभाग यामुळे स्त्रियांना आता आपल्याला किती अपत्ये व्हावीत, हे ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे असे आपण समजतो. पण आजही काही पुरुषप्रधान देशांमध्ये स्त्रीला गर्भनिरोधक साधने हवी असतील तर नवऱ्याची परवानगी आणावी लागते. अगदी अमेरिकेसारख्या स्वत:ला व्यक्तिस्वातंत्र्याचे पाईक समजणाऱ्या देशातल्या समाजातही एखादी जननक्षम वयाची अपत्यहीन महिला जर आपल्या डॉक्टरकडे मुले न होण्यासाठीच्या शस्त्रक्रियेची मागणी करू लागली तर तिला नकार दिला जातो आणि तिला मानसोपचाराचा सल्लाही दिला जातो. म्हणजेच अगदी पुरोगामी मानल्या जाणाऱ्या समाजाच्या लेखीसुद्धा मातृत्वाच्या भावनेशिवाय स्त्रीला काही अस्तित्वच नाही. त्यामुळे अशी भावना नसलेली स्त्री अमानुष समजली जाते. अगदी बळजबरीच्या संबंधांतून आलेले मातृत्व नाकारण्याचाही अधिकार कित्येक देशांमधील स्त्रियांना नाही.

आपल्या देशात महिलांनी वेगवेगळय़ा क्षेत्रांत अत्यंत महत्त्वाची पदे भूषवली आहेत म्हणून आपण पाठ थोपटून घेतो, पण मानसिकतेच्या पातळीवर आपल्याकडची परिस्थितीही काही फार वेगळी नाही. जणू काही स्त्रीचे अस्तित्व हे केवळ कुणाची तरी माता, भगिनी, कन्या किंवा पत्नी म्हणूनच आहे; एक व्यक्ती म्हणून तिला काही अस्तित्व, कर्तृत्व तसेच हक्क किंवा जबाबदाऱ्याही नाहीतच!
नवरा बायकोला स्वयंपाकघरात ‘मदत करतो’ म्हणजे त्या घरात स्त्री-पुरुष समानता आहे असा प्रामाणिक समज मध्यमवर्गीयांमध्ये प्रचलित आहे. म्हणजे स्वयंपाक करून कुटुंबाला जेऊखाऊ घालणे हे निसर्गत: घरातल्या बाईचेच काम आहे, हा विचार अजूनही जात नाही! जगातले आणि भारतातलेही सगळे यशस्वी आणि प्रसिद्ध बल्लवाचार्य (शेफ) हे पुरुषच आहेत, हा मुद्दा अलाहिदा! लग्नाच्या बाजारात आजही वधूपेक्षा वर सर्वच बाबतीत वरचढ असणे आवश्यक मानले जाते. आणि तामिळनाडूसारख्या राज्यात एका उच्च जातीच्या मुलीने दलित तरुणाशी विवाह केला असता त्यावरून दंगली उसळतात.

र. धों.नी संततिनियमनाचे महत्त्व सतत अधोरेखित केले. विशेष म्हणजे साधारण १९७० पर्यंत वाढती जागतिक लोकसंख्या हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अजेंड्य़ावरचा महत्त्वाचा चिंतेचा विषय होता. परंतु धार्मिक संघटनांच्या दबावामुळे आता लोकसंख्यावाढीचा मुद्दा आंतरराष्ट्रीय चर्चेतून जवळजवळ गायब झाला आहे. भारतात संततिनियमनाची साधने मिळण्यावर आणि वापरण्यावर कोणतीही बंधने नाहीत. आणि सर्वसामान्यांनाही कुटुंब नियोजनाचे महत्त्व बऱ्यापैकी पटलेले आहे. पण याचा एक परिणाम म्हणून गर्भलिंगनिदानाचे  प्रमाण वाढले आहे.

या अशा साऱ्या आजच्या परिस्थितीत पुन्हा एकदा र. धों.च्या विचारांचा दणका, र. धों.च्याच रोखठोक शैलीत देणे आवश्यक आहे यात शंका नाही. पण तसा दणका दिल्यानंतर होणारे परिणाम पेलण्याचा र. धों.चा ठामपणाही नव्याने ‘समाजस्वास्थ्य’ मासिक सुरू करणाऱ्या संपादकांना अंगी बाणवावा लागेल. कदाचित त्यांचे आव्हान र. धों.पेक्षाही खडतर असेल. कारण आज विरोधी विचारांचा प्रतिवाद विचाराने करण्याचा काळ राहिलेला नाही. हा जमाना गुंडगिरीने विरोधी विचार दडपून टाकण्याचा आणि विरोधकांनाच संपवून टाकण्याचा आहे.

र. धों.चे सर्व क्रांतिकारी विचार अजून समाजात रुजलेले नाहीत. पण कुटुंब नियोजन, लैंगिक शिक्षण हे शब्दही ज्या समाजात वर्ज्य होते, तिथे या संकल्पना स्वीकारार्ह बनवण्यात त्यांच्या जीवनकार्याचे निश्चितच योगदान आहे. र. धों.ची मते सर्वमान्य झाली नसतील; पण त्यावर समाजात चर्चा झाली, विचारमंथन झाले, हीही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनेच ज्ञाननिर्मिती होते आणि नवे विचार मूळ धरू शकतात. शिवाय ‘समाजस्वास्थ्य’च्या त्यावेळच्या नियमित वाचकांच्या सार्वजनिक व्यवहारात नाही, तरी व्यक्तिगत जीवनात या नव्या आणि वेगळय़ा विचारांचे काही ना काही सकारात्मक प्रतिबिंब पडलेच असणार याची मला खात्री आहे.

तेव्हा र. धों.च्या विचारांचा वारसा घेऊन आयुष्य जगणारी त्यांची एक वंशज या नात्याने त्यांचे ‘समाजस्वास्थ्य’मधील विविध विषयांवरील क्रांतिकारी विचार समाजमनात रुजावेत; ज्यामुळे समाजात खऱ्या अर्थाने ‘समानता’ येईल असे मला मनापासून वाटते.

साभार: http://www.loksatta.com/lokrang-news/next-generation-of-r-d-karves-family-148872/lite/

Leave A Reply

Your email address will not be published.