पिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का ? – डॉ. किशोर अतनूरकर

गर्भाशयाचं ऑपरेशन हे स्त्रियांच्या बाबतीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वगळता सिझेरियन नंतर सर्वात अधिक प्रमाणात केलं जाणारं ऑपरेशन आहे. बोलीभाषेत याला ‘गर्भपिशवी काढून टाकण्याचं ऑपरेशन’ म्हटलं जातं. अलीकडच्या काही वर्षांत या शस्त्रक्रियेचं प्रमाण खूप वाढत आहे. विशेषत: तरुण वयात, म्हणजे चाळिशीच्या आत किंबहुना 25 ते 30 वर्ष वयोगटातील महिलांवरदेखील ही शस्त्रक्रिया केली जात आहे. साहजिकच या शस्त्रक्रियेच्या  आवश्यकतेबद्दल समाजात संशय निर्माण होत आहे. खरंच ही शस्त्रक्रिया इतक्या मोठय़ा प्रमाणावर करण्याची गरज आहे का? ‘जास्तीचे पैसे मिळतात म्हणून डॉक्टर गरज नसतानादेखील गर्भपिशवीचं ऑपरेशन करतात’, असे आरोपही डॉक्टरांवर होत आहेत. अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जबाबदार कोण? डॉक्टरांवर होणार्‍या या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का?
या प्रश्नांचा उलगडा झाला पाहिजे. अन्यथा याबाबतच्या गैरसमजुतींना मर्यादा राहाणार नाहीत.

कर्करोग किंवा गर्भायशायत गाठ होते तेव्हा.

रुग्णाचा जीव वाचावा यासाठी तिच्या वयाचा फारसा विचार न करता, अजून अपत्यं हवीत का नकोत या बाबींना फारसं महत्त्व न देता, गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया लवकर करून घेतलेली बरं राहील, असा विचारपूर्वक निर्णय गर्भाशयाचा (युट्रस) किंवा गर्भाशयाच्या मुखाचा (सर्व्हिक्स) किंवा स्त्री बीजांडकोशाचा (ओव्हरी) कर्करोग झालेला असेल तर घ्यावा लागतो;  पण यापैकी कोणताही कर्करोग सहसा तरुण वयात होत नाही. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर गर्भाशय काढण्याच्या डॉक्टरांच्या निर्णयाबाबत रुग्ण, नातेवाईक आक्षेप घेत नाहीत. गैरसमज होण्यासाठी तिथं वावच नसतो.
कर्करोगाशिवाय गर्भाशयाची शस्त्रक्रिया गर्भाशयात निर्माण होणा-या गाठींसाठी (फायब्रॉइड) देखील करावी लागते. गर्भाशयात गाठ आहे असं सोनोग्राफी केल्यानंतर लक्षात आल्यावर लगेच गर्भाशय काढून टाकण्याचा निर्णय घेतला पाहिजे असं नाही. गाठ गर्भाशयाच्या कोणत्या भागात आहे, गाठ एक आहे का अनेक, गाठीचं आकारमान किती, रुग्णाला होणारा मासिक पाळीचा त्रास या गाठीमुळेच आहे का, की त्या त्रासाची अन्य काही कारणं आहेत, या सर्व बाबींचा सविस्तर विचार करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो किंबहुना तसा तो घेतला जावा. गर्भाशयात गाठ आहे असं म्हटल्याबरोबर, ती कर्करोगाची तर नाही ना, अशी शंका रुग्ण आणि नातेवाइकांच्या मनात निर्माण होऊ शकते. फायब्रॉइड्सच्या गाठी कर्करोगाच्या नसतात. अगदी क्वचित प्रसंगी त्यांचं रूपांतर कर्करोगात होऊ शकतं हे जरी खरं असलं तरी गाठ म्हटलं की, ती जर छोटी असेल आणि त्यापासून काही त्रास नसेल तर काढण्याची गरज नाही. उगाच कशाला धोका पत्करावा म्हणून डॉक्टरांनी गर्भाशय काढण्याचा सल्ला देऊ नये आणि रुग्णानंदेखील धीर धरावा. गर्भाशयात गाठ आहे म्हणून आता गाठ कर्करोगाशी आहे असं सारखं मनात ठेवून रुग्णानंदेखील डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडू नये.

अधिक आणि अनियमित रक्तस्त्राव 

गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यामागे अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे, मासिक पाळीत होणारा अधिकचा आणि अनियमित रक्तस्त्राव . पाळी जाण्याच्या वयात हा त्रास सहसा संप्रेरकांच्या (हार्मोन्सच्या)  रक्तातील पातळीमुळे होणा-या  चढ-उतारामुळे होतो. अशा प्रत्येक केसमध्ये गर्भाशय काढावंच लागतं असं नाही. हा त्रास किमान सहा महिन्याच्या औषधोपचारानं कमी न झाल्यास आणि थायरॉईड नावाच्या ग्रंथीपासून निर्माण होणा-या  संप्रेरकांचा  चढ-उतार (हायपो किंवा हायपरथायरॉडिझम) नाही, याची खात्री केल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो. चाळिशीच्या आत हा  त्रास झाल्यास शस्त्रक्रियेचा विचार केला जाऊ नये.

आपल्या समाजात अजूनही लहान वयात मुलींची लग्न केली जातात. लग्न झालं की मुलंबाळंदेखील लवकर होतात. साधारणत: वयाच्या पंचविशीत काही स्त्रियांची (की मुलींची?) कुटुंब नियोजन शस्त्रक्रियादेखील झालेली असते. त्यानंतर तिला अनियमित मासिक पाळीचा त्रास सुरू झाला, रक्तस्रावाचं प्रमाण वाढलं तर महिन्या-दोन महिन्यातच, आता मुलंबाळ होण्याची अपेक्षा नाही, मग कशाला हवी ही महिनेवारीची कटकट, म्हणून ऐन तरुण वयात गर्भाशय काढून टाकण्याचे क्लेशदायक प्रकार घडत आहेत. कधी कधी फारसा विचार न करता गर्भाशयासोबत स्त्रीबीजांडकोष (ओव्हरी)देखील काढून टाकलं जातं. भविष्यात स्त्रीबीजांडकोशापासून कर्करोग होऊ शकतो असं कारण दिलं जातं. विनाकारण  स्त्रीबीजांडकोश काढल्यानं त्या  महिलेच्या शारीरिक, मानसिक आणि  लैंगिक जीवनावर दूरगामी परिणाम होऊ शकतात याचा गांभीर्यानं विचार केला जात नाही. रुग्ण आणि नातेवाईक  ‘एकदाची कीड काढून टाका, आम्हाला आता दवाखान्यात पुन: पुन्हा येण्याची वेळ आणू नका’, म्हणून तयारी करतात आणि डॉक्टर काही तात्कालिक फायद्याचा विचार करून चुकीचे निर्णय घेतात.

मासिक पाळीच्या वेळेस होणारा अतिरक्तस्राव, असह्य वेदना गर्भाशयाचं ऑपरेशन करण्यास भाग पाडतात. असा त्रास  ‘अडिनोमायोसीस’ नावाच्या आजारामुळे होतो. वेदनाशामक औषधांनी वेदना तात्पुरत्या कालावधीसाठी कमी होऊन पुन्हा वाढत असतील, काही संप्रेरकांच्या गोळ्यांच्या वापरानं त्रास कमी होत नसेल, सोबत गर्भाशयाचा आकार वाढलेला असेल तर शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो.

जंतुसंसर्ग – श्वेतपदर 

गर्भाशय, गर्भनलिका आणि स्त्रीबीजांडकोश यामध्ये रोगजंतूच्या प्रादुर्भावानं (इन्फेक्शन) देखील मासिक पाळीत अधिकचा रक्तस्त्राव होऊ शकतो, वेदना असह्य होऊ शकतात. योग्य प्रतिजैविकांची (अँन्टिबॉयोटिक्स) निवड ठराविक कालावधीसाठी करून उपचार केल्यास हा त्रास हमखास कमी होऊ शकतो. क्वचित प्रसंगी रोगजंतू प्रतिजैविकांना जुमानत नाहीत, वर्षानुवर्षे प्रजनन संस्थेत घर (क्रॉनिक इनफेक्शन) करून बसतात. त्यामुळे  त्रास म्हणावा तसा कमी होत नाही. या कारणासाठी महिलेच्या चाळीस-पंचेचाळीस वर्षानंतर, गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेचा विचार केला जाऊ शकतो. रोगजंतूंच्या प्रादुर्भावासंबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा. ज्या कारणासाठी अनेकदा गर्भाशय काढलं जातं ते कारण म्हणजे श्वेतपदर किंवा पांढरा कपडा जाण्याचा प्रकार. योनीमार्गात जंतुसंसर्ग होऊन निर्माण होणारा पांढरा कपडा, गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून करून कमी  होणं शक्य नाही. पांढ-या  कपड्याचा त्रास होऊन भविष्यात कर्करोग होऊ शकतो असा गैरसमज अनेक सुशिक्षित स्त्रियांच्या मनातदेखील आहे. या गैरसमजाला काही जनरल प्रॅक्टिशनर अज्ञानापोटी, तर काही तज्ज्ञ डॉक्टर जाणीवपूर्वक खतपाणी घालतात आणि गर्भाशय काढलं जातं.  रुग्णाच्या नातेवाइकांत किंवा शेजारीपाजारी, गावात काही स्त्रियांना पांढर्‍या कपड्याचा त्रास होऊन नंतर कर्करोगामुळे गेल्या, या कारणास्तवदेखील अनेक रुग्णांच्या डोक्यात अशा त्रासात गर्भाशयाची शस्त्रक्रिया हा एकच पर्याय ठाण मांडून बसतो. प्रत्येक पांढ-या  कपड्याच्या रुग्णामध्ये हे असं होत नसतं. हा  त्रास औषध-गोळ्या घेतल्यानं कमी होऊ शकतो असं त्यांना समजावून सांगावं लागतं. तरीही काही स्त्रिया घाबरून या ना त्या डॉक्टरकडे जाऊन शस्त्रक्रिया करून घेतातच.

लघवीची पिशवी खाली सरकल्यास

अंग बाहेर येण्याच्या त्रासासाठी देखील गर्भाशयाची शस्त्रक्रिया केली जाते. गर्भाशयाची पिशवी काढून टाकणं हे खरं पाहिलं तर अंग बाहेर पडण्याच्या त्रासावरचा उपाय नाही; पण हा त्रास वयाच्या चाळिशीनंतरच्या कालावधीत होऊन सोबत लघवीची पिशवी खाली सरकलेली असल्यास गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून घेण्याऐवजी पिशवीच्या बाबतीतील दुरुस्तीची शस्त्रक्रिया करता येते. खरी अडचण अंग बाहेर येण्याचा त्रास तरुण वयात झाला तर येतो. गर्भाशय न काढता खाली सरकलेली पिशवी जागेवर पुन्हा बसवण्याची शस्त्रक्रिया करता येते; पण अशी शस्त्रक्रिया करण्याचं कौशल्य प्राप्त केलेल्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. आपल्या शहरात असे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे आणि अन्य शहरात दुसरीकडे जाण्याची रुग्णांची तयारी नसल्यामुळे ऐन तरुण वयात अंग  बाहेर येण्याच्या त्रासासाठीसुद्धा गर्भाशय काढून टाकण्याचा मोठा निर्णय घेतला जातो.

( लेखक आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील असणारे नांदेड येथील स्त्री रोग अभ्यासक आहेत.   )

atnurkarkishore@gmail.com 

लेखाचा स्त्रोत : दुवा http://www.lokmat.com/sakhi/removed-uterus-not-easy-option-why/

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap