Home / लैंगिक आरोग्य / योनीमार्गाचे काही आजार

योनीमार्गाचे काही आजार

योनीमार्गाला वेगवेगळ्या जंतूंमुळे संसर्ग होऊ शकतो. योनमार्गात खाज येणे, आग होणे, अंगावरून जास्त जाणे, अंगावरून जाणाऱ्या म्हणजेच योनीमार्गातून येणाऱ्या स्रावाचा रंग, वास बदलणं, त्या स्रावाचं प्रमाण वाढणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दुखणे अशा अनेक प्रकारे आपल्याला योनीमार्गात जंतुसंसर्ग झाल्याची जाणीव होते. योनीमार्गातील जंतुसंसर्ग केवळ लैंगिक संबंधांमधून होत नाहीत. अंगावरून जाणं, पांढरं जाणं, पांढरा प्रदर, श्वेत प्रदर किंवा व्हाइट डिस्चार्ज अशी अनेक नावं या संसर्गांना किंवा इन्फेक्शन्सना आहेत.

योनीमार्गाला होणाऱ्या काही संसर्गांची माहिती पुढे दिली आहे.

कॅन्डीडीआसिस

कॅन्डीडा अलबीकन्स हा जंतू योनीमार्गातला व पचनमार्गातीला नेहमीचा रहिवासी असतो. शक्यतो हा जंतू कुठलाही त्रास देत नाही मात्र प्रमाणापेक्षा संख्या वाढल्यास त्यातून त्रास निर्माण होतो. कॅन्डीडाला ओलसर, ऊबदार वातावरण आवडते. पाळीच्या वेळेस योनीमार्ग ओलसर व ऊबदार असतो. तसेच रक्तामुळे अन्नाचीही कमतरता नसते. अशा वेळेस त्यांची संख्या वाढते व त्यामुळे पाळीच्या काळात किंवा नंतरच्या दोन दिवसांत योनीमार्गात खाज सुटते, दाह होतो. कॅन्डीडा योनीमार्गातला नेहमीचा रहिवासी असल्यामुळे पुढच्या पाळीनंतर परत हा त्रास होण्याची शक्यता आहे. अशावेळेस परत वरील उपचार करावेत.

लक्षणं

लक्षणं

 • मायांग व योनीला खाज सुटते,
 • पांढरट, दाट, आंबट वास येणारा स्राव
 • नेहमीपेक्षा योनीस्रावाचे प्रमाण जास्त
 • लघवी करताना जळजळ
 • लैंगिक संबंधांच्या वेळी वेदना
 • योनी लालसर दिसते

हे करुन पहा (योनीमार्ग आम्ल करण्याकरिता काही उपाय)

हे करुन पहा (योनीमार्ग आम्ल करण्याकरिता काही उपाय)

 • कापसाचा बोळा आंबट दह्यात भिजवून योनीमार्गात ठेवा. (दर चार तासांनी बोळा बदला.)
 • अर्धा लिंबू एक तांब्याभर पाण्यात पिळा. त्या पाण्याने योनिमार्ग धुवा. (10 दिवस)
 • दही किंवा ताकाने योनिमार्ग धुवा. (10 दिवस)
 • जेनिशियन व्हायलेट (जी व्ही 1%) हे जांभळे औषध योनीच्या भिंतींना लावा. जी व्ही १% पेक्षा जास्त तीव्र असू नये. नाही तर योनिदाह होऊ शकतो. (हे औषध लावल्यावर पॅड किंवा घडी घ्या. नाही तर कपड्याला निळे डाग पडतील.)
 • वरीलपैकी कुठलाही उपाय करीत असताना रोज वाटीभर तरी दही खा.
 • योनीमार्गाला खाज सुटत असल्यास : कोरफडीचा गर पाण्यात विरघळवा. त्या पाण्याने मायांग धुवून काढा.

ट्रायकोमोनियासिस किंवा ट्रिक

ट्रायकोमोनास एकपेशीय परजीवी असून योनी, आतडी, गुदमार्गात आढळतात. बऱ्याच पुरूषांच्या मूत्रमार्गातही असतात मात्र पुरुषांमध्ये कुठलाही त्रास उत्पन्न करत नाहीत.

कारणं

कारणं

 • लैंगिक संबंधामुळे
 • गुदद्वारातून योनीमार्गात जंतुसंसर्ग
 • ट्रायकोमोनाज योनीतील स्वाभाविक आम्ल स्थिती जेव्हा कमी होते तेव्हा वाढतात. अशी परिस्थिती पाळीच्या आधी आढळते व तेव्हा यांची वाढ होऊ शकते.

लक्षणं

लक्षणं

 • योनीमार्गात प्रचंड खाज व सूज
 • लघवी करताना जळजळ
 • स्त्राव – हिरवट पिवळ्या रंगाचा, माश्यासारखा उग्र दर्प, फेसकट स्त्राव

हे करून पहा

हे करून पहा

 • कडुलिंबाची ताजी 8-10 पानं बारीक वाटा. हे वाटण मऊ, स्वच्छ कापडाच्या तुकड्यामध्ये घ्या आणि त्याची बोटाच्या आकाराची पुरचुंडी करा व दोऱ्याने बांधा. योनीमधून ही पुरचुंडी आत सरकवा. दहा दिवस रोज सकाळ-संध्याकाळ असं करा.
 • त्याचप्रमाणे ठेचलेल्या कडुलिंबाची पानं टाकून उकळलेल्या पाण्यात थोडा वेळ बसा. योनिमार्गाला पाण्याचा स्पर्श होऊ द्या.
 • पुरुषांनी लिंगाच्या पुढच्या त्वचेखाली कडुलिंबाचे वाटण लावा.
 • नख न लागू देता लसणाची एक मोठी पाकळी सोला. योनिमार्गाच्या वरच्या भागात ही पाकळी सरकवा. दर सहा तासांनी पाकळी बदला. हा उपाय 15 दिवस करा. रोज एक लसूण पाकळी खा.
 • शौचाचे कण आणि त्यातील जंतू जर योनीमार्गात जात असतील तर परत परत ट्रिकची संसर्ग होऊ शकते. हे टाळण्यासाठी शैचानंतर गुदद्वार माकडहाडाच्या दिशेने धुवा. यामुळे गुदद्वारातले शौचाचे कण योनीमार्गात जाणार नाहीत.

बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस

योनीत अनेक प्रकारचे जीवाणू राहतात. त्यातले काही घातक असतात तर काही चांगले किंवा मित्र जीवाणू असतात. घातक जीवाणूंचं प्रमाण वाढल्यामुळे हा आजार होतो. हा खरं तर लैंगिक संबंधातून पसरणारा आजार नाही. मात्र हा आजार झाला असेल तर इतर लिंगसांसर्गिक आजार होण्याचा धोका वाढतो.

कारणं

कारणं

 • योनीतील जंतूंचं संतुलन बिघडल्यामुळे हा आजार होतो. पण त्यासोबत इतरही काही कारणं आहेत.
 • रासायनिक, उग्र साबण वापरल्यामुळे – अंघोळीच्या वेळी योनी किंवा योनीमार्ग साबणाने धुणं टाळा. साबणातील रसायनांमुळे योनी कोरडी पडते.
 • पाळीच्या काळात पॅडप्रमाणेच योनीमार्गात सरकवून ठेवायचं टॅम्पून नावाचं साधन असतं. ते जास्त काळ योनीमार्गात राहिलं तर जंतूंचं प्रमाण वाढू शकतं.
 • डायफ्रामसारखं गर्भनिरोधक वापरत असाल तर

पाश्चात्य पद्धतीच्या कमोडच्या वापरामुळे, पोहण्याच्या तलावातील पाण्यातून किंवा एकमेकांचे बिछाने वापरल्यामुळे या आजाराची संसर्ग होत नाही.

लक्षणं

लक्षणं

 • वारंवार लघवीला होणे
 • लघवी करताना जळजळ होणे
 • कंबरेत दुखणे
 • स्राव पिवळा, करडा असणे
 • योनीमार्गात खाज सुटणे
 • योनीमार्गाला कधी कधी सडलेल्या मासळीसारखा वास येणे

हे करून पहा

हे करून पहा

 • कडुलिंबाची ताजी 8-10 पानं बारीक वाटा. हे वाटण मऊ, स्वच्छ कापडाच्या तुकड्यामध्ये घ्या आणि त्याची बोटाच्या आकाराची पुरचुंडी करा व दोऱ्याने बांधा. योनीमधून ही पुरचुंडी आत सरकवा. दहा दिवस रोज सकाळ-संध्याकाळ असं करा.
 • त्याचप्रमाणे ठेचलेल्या कडुलिंबाची पानं टाकून उकळलेल्या पाण्यात थोडा वेळ बसा. योनिमार्गाला पाण्याचा स्पर्श होऊ द्या.
 • पुरुषांनी लिंगाच्या पुढच्या त्वचेखाली कडुलिंबाचे वाटण लावा.
 • नख न लागू देता लसणाची एक मोठी पाकळी सोला. योनिमार्गाच्या वरच्या भागात ही पाकळी सरकवा. दर सहा तासांनी पाकळी बदला. हा उपाय 15 दिवस करा. रोज एक लसूण पाकळी खा.

या आजारावर काही उपचार केले नाहीत तरी तो काही काळाने बरा होतो. मात्र दरम्यानच्या काळात लैंगिक संबंध आल्यास लिंगसांसर्गिक आजारांचा धोका वाढतो. व्हॅजिनोसिस झाला असताना सिफिलिस, परमा, ब कावीळ किंवा एच आय व्हीचा संसर्ग असेल तर तो संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

About I सोच

I Soch encourages Pune youth to SPEAK OUT on equality, safety, diversity within the discussions of sexuality. It is a platform to learn, argue and clarify.

4 comments

 1. Mansik aajar kiva jast tension mule viryapatan hote ka

  • होय. काही मानसिक व शारीरिक आजारांमुळे व काही औषधांमुळे वीर्यपतन आणि एकूणच लैंगिक अनुभवावर प्रभाव पडू शकतो. बऱ्याचदा पेशंट अशा गोष्टी डॉक्टरजवळ कशा बोलायच्या म्हणून डॉक्टरांशी बोलत नाहीत आणि अनेक वेळा डॉक्टरही, औषधांच्या लैंगिक दुष्परिणामांची कल्पना देत नाहीत. एखादं औषध किंवा एखादा आजार आपल्याला लैंगिक दुष्परिणाम दाखवत असेल तर डॉक्टरांकडे याबद्दल मोकळेपणाने बोलायला शिकले पाहिजे. लाजायचं आजीबात कारण नाही.
   बिंदुमाधव खिरे यांच्या ‘मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख’ या पुस्तकातील ‘आजार आणि औषधं’ या प्रकरणामध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. सदर पुस्तक रसिक साहित्य, साधना ग्रंथ प्रदर्शन, शनिवार पेठ, मॅजीस्टीक बुक स्टोअर, पुणे यासाठी विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 2. पिशविला सुज का येते. अशा वेळी संभोग करावा का . उपाय काय. घयावयाची काळजी

  • पिशविला सूज का आली आहे हे शोधण्यासाठी आणि त्यावर उपचार घेण्यासाठी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला संभोग करताना वेदना होत असतील, त्रास होत असेल तर संभोग टाळणेच उत्तम. डॉक्टरांना भेटल्यावर संबंध ठेवावा की नाही याविषयीही न लाजता डॉक्टरांशी बोला.

Leave a Reply

Your email address will not be published.