प्रेम आमच्या हक्काचं- अरुंधती गडाळे

0 535

 

‘प्रेम आमच्या हक्काचं…’ अशा घोषणा पुण्यातील एफ. सी. रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर तरुण-तरुणी देत होते. साधारण ३ एक वर्षापूर्वी. जानेवारी २०१५ मधील ही घटना असेल.

लातूरमध्ये एका प्रेमी युगलाला भयानक पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. कारण काय तर त्यांनी प्रेम केले म्हणून. त्यात मारहाण करणाऱ्यांनी या घटनेचे चित्रण केले होते. ते what app च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पुण्यात पोहचले होते. माझ्या एका मित्राने हा व्हिडीओ मला त्याच्या मोबाईलवर दाखवला. व्हिडीओ बघत असताना डोक्यात एक कळ जात होतीच पण त्याचबरोबर खूप हतबल वाटत होते. त्या मुलीचा आवाज तिचे ओरडणे मी आजही विसरू शकले नाही. त्या मुलीला मारणारे गुंड तिची जात विचारत होते. तिच्या पोटात लाथा घालताना पुन्हा पुन्हा म्हणत होते, ‘तू या जातीची असून असं वागतेस. तुला असं करायला शोभतं का? त्यांनी मुलगा आणि मुलगी दोघांनाही खूप मारलं होतं. या व्हिडीओ मधील संवाद आणि चित्र काही केल्या डोळ्यासमोरून जाता जात नव्हतं.

आपण काही करू शकत नाही ही हतबलता खूप जास्त वेदनादायी होती. रात्री ज्या मित्राने तो व्हिडीओ दाखवला त्याच्याशी बोलताना आपण काही तरी करायला हवं अशी चर्चा झाली. पण काय करायचे ते शब्दात मांडता येत नव्हतं. पण गप्प बसण्यात अर्थ नाही. हे असे मॉरल पोलिसिंग सहन करायचे नाही इतकं मात्र डोक्यात होतं. आणखी काही मित्रांना गोळा करून आम्ही या घटनेचे गांभीर्य सांगत होतो. आधी निषेध मोर्चा तर काढू मग पुढे आणखी काय करता येईल हे नंतर बघू असे ठरले. मोर्चा होता प्रेम करण्याच्या हक्कसाठी.

यासाठी “राईट टू लव्ह” नावाचा WhatsApp ग्रुप तयार केला गेला. पुढे जाऊन प्रेम करणाऱ्यांना साथ देणे हे ‘राईट टू लव्ह’चं कार्यक्षेत्रच झालं. घरचे, दारचे, मित्र, समाज असे कोणी सोबत नसताना ‘राईट टू लव्ह’ मध्ये सहभागी मित्र-मैत्रिणी प्रेमी जोडप्यांच्या मागे खंबीरपणे उभे रहात होते.

“राईट टू लव्ह” कडे प्रेमविवाह संबधित बऱ्याच केसेस येत असतात. यामध्ये जात, धर्म, वय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती असे बरेच पेच प्रसंग असतात. यातून मार्ग काढण्यासाठी “राईट टू लव्ह” प्रेमिजीवांचे मित्र बनतो.

“राईट टू लव्ह” कडे ‘लग्न करायचे आहे’ असे म्हणून येणाऱ्या जोडप्याशी संवाद साधला जातो. समुपदेशनाची गरज असल्यास ते देखील केले जाते. लग्नानंतर येणाऱ्या जबाबदारीचे जाणीव करून देण्यात येते. त्यांना त्यांच्या नात्याचा खरेपणा जाणवल्यास पुढे काय मदत करायची हे देखील ठरवले जाते.

अनेकदा तरुण-तरुणी कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असतात. त्यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन नसते. त्यांना आधी त्यातून मार्ग काढण्यासाठी विचार केला जातो. त्यांना कायदेशीर सल्ला देखील दिला जातो. बऱ्याचदा जोडप्यांच्या घरचे प्रेम विवाहासाठी तयार नसतात. त्यांच्या मुलांनी स्वत:चा जोडीदार स्वत: निवडला आहे, हेच सहन होत नसतं. अशावेळी मुला-मुलींच्या घरच्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांना वाटणाऱ्या सामाजिक भीतीमधून बाहेर कढले जाते. असं करूनही गोष्टी सरळ मार्गी लागतील असे होत नाही. मग आम्ही जोडप्यांची लग्नं लावून देतो. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. त्यांना काही महीने लपवून ठेवण्याचा प्रयत्न असतो. त्यांचे एकदा का आयुष्य सुरळीतपणे सुरु झाले, की ‘राईट टू लव्ह’ ची भूमिका संपते. पण मित्र म्हणून ‘राईट टू लव्ह’ नेहमी या जोडप्यांच्या सोबत असते. प्रेम करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. राईट टू लव मध्ये काम करणारे कार्यकर्ते आपली कामे सांभाळून तरुणांना मदत करत असतात.

के अभिजित ९७६६४७९५४७ , सुशांत आशा – ९०११०२९११०

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.