परस्परविरोधी विचारांना हिंसा हे उत्तर नाही

0 234

गुरमेहेर कौर हे नाव आता साऱ्या देशाला माहीत झालं आहे. दिल्ली सोडून पंजाबात, जालंदरला जावं लागलं. जिवे मारण्यापासून ‘तुझ्यावर बलात्कार करू’ असा धमक्या तिला दिल्या गेल्या. दिल्ली विद्यापीठातल्या रामजस कॉलेजमध्ये ‘प्रतिरोध की संस्कृती’ हा कार्यक्रम घ्यायला काही विद्यार्थ्यांनी विरोध केला. दंगा केला. मारझोड केली. कॉलेजातलं वातावरण दूषित केलं. त्यावर गुरमेहेरने हातात एक पोस्टर घेतलं. त्यावर लिहिलं – ‘मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. कोणाला घाबरत नाही. मी काही एकटी नाही. भारतातला प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे.’ तिचा या बॅनरसहीतचा फोटो फेसबुकवर पोस्ट झाला आणि तिला ‘तुझ्यावर बलात्कार करू’, अशा धमक्या सुरू झाल्या.

प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्याविरुद्ध बोलणाऱ्या लोकांना मारणे, दहशत पसरविणं , मरायला प्रवृत्त करणं, स्त्रीचा आवाज तिच्यावर बलात्कार करून दाबून टाकणं हे लोकशाही आणि घटनेने दिलेल्या मुलभूत स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. दोन परस्पर विरोधी विचार असू शकतात. विचारांना विचारांनी उत्तर देणं यातच समजूतदारपणा आहे. विचारांना हिंसेने उत्तर देणं हा काही लोकशाही मार्ग नाही. आपले विचार मांडले म्हणून कोणत्याही महिलेला बलात्काराच्या, जीवे मारण्याच्या धमक्या देणं, अश्लील भाषेत तिच्याविषयी बोलणं चूकच आहे. सुरक्षित वातावरण हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे.

फक्त परस्पर विरोधी मत आहे म्हणून किंवा ती आमच्या विरुद्ध बोलली म्हणून जातीय, धार्मिक किंवा राजकीय द्वेषातून स्त्रियांवर अत्याचार करणं हे निषेधार्हच आहे. स्त्रिया आणि मुलींसाठी समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

चित्र साभार :https://en.wikipedia.org/wiki/Cyberbullying

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.