बधाई हो!
काही दिवसांपूर्वी बधाई हो नावाचा हिंदी चित्रपट येऊन गेला, अन त्यानंतर चाळिशीनंतरच्या कामजीवनाबाबत चर्चा सुरु झाल्या. लोकांची मते बरीच संमिश्र दिसत होती. याच विषयाबाबत आपल्या वाचकांना माहिती मिळावी या उद्देशाने जेष्ठ लैंगिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या संपूर्ण कामजीवन या पुस्तकातील या विषयावरील लिखाण वाचकांसाठी इथे देत आहोत.
स्वयंपाकघरात आईने झोपायचे आणि बाल्कनीत बाबांनी झोपायचे
वयाच्या चाळिशीनंतर स्त्रीपुरुषांना कामजीवनाचे फारसे आकर्षण नसते असा तरुणांमध्ये एक गैरसमज असतो. घर छोटे असले, वनबेडरूम फ्लॅट असला तर शयनगृह नवविवाहित दांपत्यासाठी असते. स्वयंपाकघरात आईने झोपायचे आणि बाल्कनीत बाबांनी झोपायचे. रात्रभर आई-बाबांची ताटातूट! इतरही अनेक गैरसमज अस्तिवात आहेत. उदा. कामजीवन फक्त पुनरुत्पत्तीसाठी असते, कामजीवन फक्त तरुण-तरुणींसाठी असते, दोन मुले झाली की कामजीवन बंद वगैरे. वस्तुस्थिती अशी की कामजीवन जीवनाच्या अखेरपर्यंत साथ देत असते. वयानुसार व वृत्तीनुसार कामजीवनात फरक पडत जातो. कोणत्याही दोन व्यक्तींचे कामजीवन समान नसते. स्त्री व पुरुष याच्या कामजीवनातही फरक पडतो.
निसर्गाची योजना
कामजीवन ही इतर अनेक सहजप्रवृत्तींप्रमाणे (इन्स्टिंट) एक सहजप्रवृत्ती आहे. या सहजप्रवृत्तीचे वैशिष्ट्य असे की, इतर सहजप्रवृत्तींचा त्याग केला तर माणूस मरतो (उदा. तहान, भूक वगैरे); पण कामजीवनाचा त्याग केला तर माणूस मरत नाही. दुसरे असे की कामजीवन आपल्या अधीन नसते. लोणचे पाहिले की तोंडात लाळ येते, त्याप्रमाणे श्रृंगार, प्रणय अनुभवला की शरीर कामप्रतिसाद देते; म्हणजे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (रिफ्लेक्स) असते. मोक्षप्राप्तीसाठी कामजीवनाचे बलिदान द्यायचे की निसर्गाची योजना समजून घेऊन त्याप्रमाणे वागायचे, हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असतो.
पुरुषाच्या कामजीवनातील बदल
पुरुषाचा कामप्रतिसाद जीवनाच्या अखेरपर्यंत टिकून राहतो. मात्र त्याचा दर्जा बदलतो. कामसंवेदना टिपणा-या पेशींची संख्या कमी होऊ लागते. या पेशी शिश्नमुंडावर असतात. मेसनर व क्रॉस या संशोधकांच्या नावाने या पेशी ओळखल्या जातात. पेशींची संख्या घटल्यामुळे कामउद्दीपित व्हायला पुरुषाला वेळ लागतो. एकदा कामउद्दीपन झाले तर ते बराच काळ टिकते. म्हणजे संभोग दीर्घकाळ चालतो; पण संभोगाची रुची कमी कमी होत जाते. दोन संभोगातील कालमर्यादा वाढते. त्यामुळे एक संभोगानंतर दीर्घकाळ विश्रांती घेतल्याशिवाय पुन्हा कामउद्दीपन होत नाही. शरीरातील टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची पातळी कमी कमी व्हायला लागते. केवळ लैंगिक संबंधातच आनंद सामावला न जाता आता स्त्रीचे सर्वांगीण आकर्षण वाटू लागते.
तसे आता होत नाही
कामपूर्तीचे (ऑरगॅझम) महत्त्व कमी होऊ लागते. वीर्यस्खलनावेळी वीर्याची पिचकारी लांबवर जात नाही. वीर्य थेंब थेंब गळते. वीर्यातील शुक्राणूची संख्या घटते, पण इतके शुक्राणू प्रजोत्पादनासाठी पुरेसे असतात वीर्याचे प्रमाणही कमी होऊ लागते. पूर्वी मनात शृंगारिक विचार आले तरी कामउद्दीपन आपोआप व्हायचे, तसे आता होत नाही. उद्दीपनासाठी स्त्रीचे सहकार्य आवश्यक असते. प्रणय, श्रृंगार, स्पर्शाने पुरुषाला तिने कामउद्दीपित करावे लागते. शिश्न ताठ होण्यास बराच वेळ लागतो. मात्र जीवनाच्या अखेरपर्यंत ही क्षमता टिकून राहते.
‘अॅन्ड्रोपॉज‘
पुरुषाच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण सावकाश कमी होत असल्यामुळे पुरुषाच्या कामजीवनातील बदलही संथ गतीने होत जातात.
स्त्रीला रजोनिवृत्ती (मेनोपॉज) होते तसा पुरुषाला ‘अॅन्ड्रोपॉज’ होऊ शकतो. त्याला लिंगताठरता कमी प्रमाणात येते. शांत झोप लागत नाही. औदासीन्य येते. केस गळायला लागतात. कमरेभोवती चरबीचा थर साठतो. हाडे ठिसूळ होतात. थकवा येतो. स्वभाव चिडचिडा होतो. यावर उपाय म्हणजे जसे स्त्रियांना एच आर टी देतात तसे पुरुषांना टेस्टोस्टेरॉन देतात. (अँड्रियॉल ४० मि.ग्रॅ. एकेक गोळी तीन वेळा याप्रमाणे ६ आठवडे ते ६ महिने) पण तत्पूर्वी रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी, रक्ताची पीएस्ए चाचणी व पुरःस्थ ग्रंथीची तपासणी करणे आवश्यक असते.
या लेखांकाच्या पुढच्या लेखात चाळिशीनंतर स्त्रियांच्या कामजीवनातील बदल काय होतात, कुणाची इच्छा कमी होऊ शकते व ‘आता यापुढे सेक्स बंद’ असंं कोण अन का म्हणू शकते. तसेच याला म्हातारचळ म्हणायचे कि अजून काही? सगळ्यात महत्वाचे म्हणजे तरुणांनी नक्की लक्षात घ्यायला घेणे गरजेचे आहे हे देखील पाहणार आहोत.
चाळिशीनंतर लैंगिक संबंध असावेत की नाहीत? यावर तुमचे मत खाली कमेंट मध्ये लिहा. तसेच तुमचे अनुभव, प्रतिक्रिया, सूचना असतील तर खाली कमेंट करा.
माझे वय ४६ आहे व माझी गर्भाशय पिशवी काढलेली आहे. ऑपरेशन होऊन ४ वर्ष झाले. आता मला बिलकुल मन होत नाही. पण नवऱ्याला मात्र रोज संभोग हवा असतो. मग मला त्याचा त्रास होतो, काय करावे?
ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात ते आम्ही समजू शकतो. खूपदा हार्मोनल बदल झालेले असतात, योनीमार्ग कोरडा पडलेला असतो व त्यामुळे संबंध नकोशे वाटू शकतात. तुम्ही यासाठी स्त्री रोग तज्ञांंचा सल्लाही घेऊ शकता. तुम्ही जर पुण्यात असाल तर केईएम हॉस्पिटलमध्ये उज्ज्वल नेने या लैंगिक आरोग्य क्लिनिक चालवतात, त्यांना वेळ घेऊन भेटू शकता.
खरं तर या बाबतीत संवादाने प्रश्न सुटू शकतात. तुम्हाला तुमच्या पतीशी बोलणं फार गरजेचे आहे. याच विषयावर चाळीशीनंतरचे कामजीवनच्या दुस-या लेखात सविस्तर दिले आहे. त्याची लिंक सोबत जोडली आहे. http://letstalksexuality.com/sex-life-after-40/ त्यांना हा लेख वाचण्याबाबत सूचवु शकाल.
पुढील वेळी इथे प्रश्न न विचारता http://letstalksexuality.com/ask-questions/ या लिंकवर जाऊन प्रश्न विचारा ही विनंती.