लैंगिक शिक्षण – र. धों. कर्वे

0 839

लैंगिक शिक्षण – र. धों. कर्वे

प्रत्येक गोष्टीला कट्टर विरोध करणारे लोक प्रत्येक क्षेत्रात असतातच आणि ज्यांना लैंगिक शिक्षणच  मिळालेले नसते, त्यांना लैंगिक गोष्टी गलिच्छ वाटणारच. हे विचारात घेतले, तर अशा लोकांना मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची कल्पना पचणेच शक्य नाही, याचे आश्चर्य वाटायला नको. या बाबतीत काही वर्षापूर्वी शिक्षकांच्या एका गटाशी बोलण्याचा योग आम्हांस आला. त्या वेळी आम्ही त्यांस सांगितले की, मुळे तीन वर्षाची झाली की, आपल्या जन्माविषयी प्रश्न विचारू लागतात. एक शिक्षक आमच्या विधानाला विरोध करत म्हणाला, “माझा मुलगा मला असले प्रश्न कधीच विचारीत नाही.” आम्ही त्यावर असे सुचविले की, “ठीक आहे,तुम्हास विचारीत नसेल तुमच्या आईस विचारीत असेल.” यावर तो शिक्षक कडाडला, “त्याच्या आईला असले प्रश्न विचारण्याची छातीच होणार नाही..” असं खाक्या असल्यानंतर कोण मुलगा तोंड उघडण्याचे धाडस करील?

आपल्या तोंडाला लगेच कुलूप ठोकले जाईल आणि पाठीवर रट्टे बसतील ही कल्पना असल्याने तो माहिती मिळवण्याचे अन्य मार्ग शोधायला लागतो.

पालकांना आपल्या मुलांना लैंगिक विषयांचे मुळीच ज्ञान नाही, असे नेहमी वाटत असते. पण त्यांची मुलेच काय पण मुलीसुद्धा लैंगिक बाबतीत फारच रस घेत असतात, हे त्यांना माहित नसते. लैंगिक बाबतीतले मुलांचे कुतूहल दडपून टाकणे किंवा खोटेनाटे सांगून चुकीचे ग्रह करून देणे यापासून वाईट परिणाम तर होतातच; पण शरीराच्या आरोग्याबद्दलचे शिक्षण लैंगिक अवयवांचे ज्ञान दिल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की शरीराचे आरोग्य, नैतिकता आणि धार्मिकता यांच्यात सरभेसळ करता कामा नये. माणसाच्या देहाला देवाचे मंदिर समाजणे जितके घटक आहे तितकेच देहाच्या काही इंद्रियांना गलिच्छ समाजाने घातक आहे. लैंगिक ज्ञानाला गलिच्छ म्हणून किंवा धार्मिक कारणासाठी निषिद्ध मानणे, या एकाच मनोवृत्तीच्या दोन बाजू आहेत. शरीराच्या अन्य इंद्रियांबद्दल आपण जशी वागणूक ठेवतो, तशीच वागणूक लैंगिक इंद्रियांबद्दल ठेवली पाहिजे. शिष्टाचार म्हणून चारचौघांसमोर असे मोकळेपणाने बोलणे सहसा टाळले जाते, हेही येथे नमूद करून ठेवायला पाहिजे.

प्रौढांना देखील लैंगिक शिक्षण दिले गेले पाहिजे. त्यांनाच त्याची जास्त गरज आहे. प्रौढ लोक आपले चुकीचे ज्ञान मुलांवर लादतात आणि त्यांच्या मनात लैंगिक अवयवांविषयी घृणा निर्माण करतात. मुलांना वय वाढत जाऊन प्रौढत्व प्राप्त होईपर्यंत आपल्या शरीरात कसेकसे बदल होत जाणार आहेत, याची पूर्वकल्पना आधीपासूनच यायला हवी. नैसर्गिक सत्याचे ज्ञान हे निसर्ग नियमाप्रमाणे मिळत गेल्यास लैगिक जीवनात विष कालवणारी सोंगेढोंगे आपोआपच नष्ट होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.