Home / लैंगिकता म्हणजे? / काम आणि क्षुधा

काम आणि क्षुधा

कामविषयक भावना आणि क्षुधा (भूक) यांची तुलना केली तर त्याचा काय परिणाम होईल, याचे विश्लेषण करत लैंगिकतेबद्दलचे गूढ किंवा गुप्तपणा आड आल्यामुळे काय अडचणी तयार होतात, हे र. धों. कर्वे या लेखामध्ये लिहितात.

कामविषयक गोष्टी गुप्तच राखल्या पाहिजेत, असे पुष्कळ लोकांचे मत असते. ते म्हणतात, की कामवासनेचा विकास आपोआप होत असतो, तसा तो होऊ द्यावा. त्यासंबंधी आपल्याला काही करण्याचे कारण नाही. पण वस्तुस्थिती पाहिली तर कामवासनेच्या नैसर्गिक विकासाच्या मार्गात समाजाकडून इतक्या अडचणी येतात, की आपल्या वासनेचा नैसर्गिक विकास झाला असे हजारांत एखाद्यादेखील स्त्रीला किंवा पुरुषाला प्रामाणिकपणे म्हणता येणार नाही. हॅवलॉक एलिसचे म्हणणे असे, की आपल्या जीवनात महत्वाच्या दृष्टीने कामवासनेची फक्त क्षुधेशीच तुलना करता येईल. खाण्यापिण्याविषयी कधीही कोणीही उघडपणे बोलायचे नाही, किंवा बोलले तर ते काव्याच्या भाषेत बोलायचे; या नैसर्गिक शारीरिक क्रियांना अश्लील आणि अनीतीमूलक समजून कोणीही उघडपणे खायचे प्यायचे नाही. इतकेच नव्हे तर तोंड हे खाण्याचे इंद्रिय म्हणून तेदेखील कोणाला दिसू द्यायचे नाही. क्षुधेच्या बाबतीत आपण जर असे करू लागलो तर त्याचा परिणाम काय होईल?

अर्थातच, या न्याय्य आणि नैसर्गिक गोष्टीवरच सर्वांचे लक्ष लागून राहील आणि कोणाला दुसरे काही सुचणारच नाही. आणि कामवासनेसारखेच क्षुधेबद्दलही विविध प्रश्न उपस्थित होतील. काय खावे, किती खावे, किती वेळा खावे, अमुक फळ आवडते ते खाणे पाप आहे काय? किंवा गावात आपल्याला आवडते ते खाणे पाप आहे काय? सारांश, क्षुधा ही जरी कितीही नैसर्गिक असली, तरी अशा विचारामुळे तिला विकृत स्वरूप आल्यामुळे फारच थोड्या लोकांना आपली क्षुधा समंजसणे शमवता येईल.

कामवासनेसंबंधी अशीच स्थिती झालेली आहे. क्षुधेच्या बाबतीत निदान इतके तरी झाले असते की, ती जन्मापासून अस्तित्वात असल्यामुळे काहीतरी नैसर्गिक सवयी जन्मापासून लागल्या असत्या. पण कामवासना जन्मापासून अस्तित्वात नसल्यामुळे (याबद्दल फ्रॉईडचा मतभेद आहे) तीसंबंधी नैसर्गिक सवयी लागणेच अशक्य होते. कामावासनेबाबतीत ज्यांना स्वतःलाच काही समाजात नाही असे लोक दुसऱ्यांना उपदेश करायला नेहमी तयार असतात. दोन दिवसांतून एकदा जेवावे, किंवा दिवसांतून बरा वेळा जेवावे, फळे कधीही खाऊ नयेत नेहमी गवतच खावे, अशा प्रकारचा उपदेश कोणी करू लागल्यास आपण त्याला हसू; पण कामवासनेच्या बाबतीत लोक जो उपदेश करीत असतात, तोही पुष्कळ वेळा इतकाच हास्यास्पद असतो.

खाण्याच्या बाबतीत काही गूढ किंवा गुप्तपणा न राहिल्यामुळे सर्वांनाच शास्त्रीय ज्ञान नसले, तरीही स्वतःच्या व इतरांच्या अनुभवावरून मनुष्य आपला मार्ग आखू शकतो. कामवासनेचे बाबतीत जर गुप्तपणा आड आला नसता, तर येथेही ज्याचा त्याने योग्य मार्ग ठरवणे कठीण झाले नसते.

साभार: सदर लेख डॉ. अनंत देशमुख यांच्या ‘असंग्रहित र. धों. कर्वे’ या पुस्तकातून घेतला आहे. हा लेख धनुर्धारी, दिवाळी १९३६ मध्ये प्रकाशित झाला होता.   

 

चित्र साभार: https://thedreamwell.files.wordpress.com/2008/09/130224_love.jpg

About I सोच

I Soch encourages Pune youth to SPEAK OUT on equality, safety, diversity within the discussions of sexuality. It is a platform to learn, argue and clarify.

2 comments

 1. मी जॉब होतो पुण्यात
  एका हॉटेल वर तेव्हा
  कोणी जर जेवणाबरोबर कांदा
  खात असेल तर पोरं लागेच
  चिढवायचे
  खा उ नको मग सेक्स कंट्रोल होत नाही मग
  फेल होते रात्री

  • कांदा आणि लैंगिक इच्छा, शरीर संबंधांचा वेळ, शीघ्रपतन यांचा बऱ्याचदा संबध लावला जातो.पण त्यात काहीही तथ्य नाही. हे सर्व गैरसमज आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.