लग्नापूर्वीचा प्रणय – भाग १ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव

मी ज्या ठिकाणी राहते त्याला चिकटूनच नगरपालिकेचं एक उद्यान आहे. त्यामुळे उद्यानातून जाता-येता एक दृश्य हमखास नजरेस पडतं (ते आणखी बऱ्याच ठिकाणीही पहायला मिळतं.) अनेक विद्यालयीन तरुणी-तरुण एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव करीत असतात. काही जोडपी चुंबनापुढील पायऱ्या चढतात तर काही कपडे न काढता जेवढा जास्तीत जास्त प्रणयाचा आनंद घेता येईल तेवढा घेत असतात. यातील काही मुले, त्यांचे मित्र अशा अवस्थेचे चक्क मोबाईलवर फोटो काढण्यात आणि व्हीडीओ शुटींग करण्यात गुंग असतात. हे होत असताना घुटमळून त्यांच्या या कार्यात अडथळा आणणाऱ्याकडे ही जोडपी रागाने पाहत असतात. पण कुणीच कुणाला बधत नाही. हे उद्यान सर्वांसाठी खुलं असल्यामुळे इथे येणारे सर्वजण/जणी, बाळगोपाळ-गोपाळी आपल्या आई-बाबांसोबत हे दृश्य पाहत असतात. ‘सुसंस्कारित’ बाया, बापुडे खाली मान घालून, मनातल्या मनात शिव्या घालत, ‘काय होणार आपल्या देशाचे? संस्कृती रसातळाला जाणार. मीच इकडून यायला नको होते,’ असा विचार करत परत परत वळून किती चुकीचं चाललंय ते पाहत असतात.

दुसऱ्यांच्या या गोष्टी पाहताना आपण किती ‘संस्कारित आणि नीतीमान’ आहोत, आपण असं काही केलं नाही, असा विचार करून छाती भरून आल्यासारखं उगीचच वाटायला लागतं काही जणांना-जणींना! लग्न झालेल्यांना ‘पहिला किस’ आपल्या जोडीदाराला सुहागरात्रीत दिला/घेतला ही गोष्ट नोबेल पारितोषिक मिळाल्यासारखी मौल्यवान वाटून आपण आपल्या जोडीदाराशी किती ‘प्रामाणिक’ राहिलो याचा गर्व वाटायला लागत असेल. अगदी राम आणि सीताची किंवा आणखी कोणाची ‘पवित्र’ जोडी वगैरे अशी काहीतरी भावना दिसते म्हणजे ते त्यांच्या हावभावावरून (कपाळावर आट्या, भुवया ताणलेल्या, डोळे मोठे, जोरदार उसासे, दोन्ही ओठ मागे खेचून ‘चक् चक्’ असा आवाज काढीत काहीतरी पुटपुटणं वगैरे, वगैरे) तरी तसं वाटतं.  मात्र आपणालाही या वयात या गोष्टींबद्दल आकर्षण होतं (स्पष्टच बोलायचं म्हटल्यास ‘करावसं’ वाटत होतं.) आणि काही कारणास्तव म्हणजे कदाचित घरच्यांनी ‘संस्कारांचा, विश्वासाचा वास्ता (विशेषतः मुलींना हा दिला जातो.)’ दिल्यामुळेच करता आल्या नसतील वा स्वतःवर ‘ताबा’ ठेवल्यामुळे केल्या नसतील किंवा कधी चोरून अथवा कधी उघडपणे आपणही त्या गोष्टी केल्या होत्या हे आपण सोईस्कर विसरतो. (अरे यार, आमच्यावेळी अशा बागा नव्हत्या रे! नाहीतर किती मज्जा आली असती, असा उगीचच मनातल्या मनात एखादा ‘निराशाजनक’ उसासाही बाहेर पडतो हा भाग आणखी वेगळा.) इथे बसणाऱ्या आणि इथून जाणाऱ्या येणाऱ्यांच्या मनात (‘करणाऱ्यांना काही नाही, तर बघणाऱ्यांनी का बघू नये’ असा विचार करून आपला ‘बघण्याचा’ हक्क गाजवण्यासाठी, बरेचजण मुद्दामहून वैयक्तिक आणि ग्रुपने येवून बसलेले असतात. अगदी गोव्यासारखी संस्कृतीरक्षक ‘रसिक प्रेक्षकांची’ गर्दी नसली तरी अधून मधून झुंड दिसतात.) जे चाललंय ते पाहण्याची उत्सुकता, मजा आणि आनंद लपवीत त्यांच्या आणि बहुतेकांच्या मनात एक प्रश्न हमखास येत असणार, हे काय चाललंय? कदाचित हा प्रश्न मग ‘लग्नाअगोदर शरीरसंबंध’ या मुद्द्याच्या योग्य-अयोग्यतेकडे आपोआप घेऊन जातो.

मुळात आपल्याकडे लग्न आणि सेक्स या गोष्टी एकजीव आहेत असं मानलं जातं. म्हणजे एकीकडे लग्नाशिवाय सेक्स नाही आणि वैवाहिक संबंधात सेक्स असलाच पाहिजे असे मानले जाते. (आपला लग्नाचा जोडीदार आपणास शारीरिक सुख देत नाही, या कारणास्तव घटस्फोटही मिळू शकतो, इतके शरीरसंबंध महत्वाचे मानले जातात.) आणि दुसरीकडे लग्नाअगोदरच्या सेक्सला ‘अनैतिक’ ठरविण्याचा दुटप्पीपणाही आहे. भूक, झोप याप्रमाणे शरीरसुख हीदेखील मानवाची मुलभूत गरज मानली गेली आहे. पण या गरजेकडे फक्त लग्न या परवान्याशी जोडून पाहिले जाते. तसेच तिचे उत्सर्जन नेहमीच ‘लपून–छपून, झाकून’ असेच होत असते. सेक्सबद्दल सविस्तर संवाद तर दूर पण त्याबद्दल ‘ब्र’ पण काढला जात नाही. मला नेहमी प्रश्न पडतो की शरीरसंबंधांसंदर्भात व्यवस्थित माहिती नसेल (कधी कधी तर अगदी पुस्तकीसुद्धा नाही, मग चर्चा, अनुभवातील ज्ञानाची देवाणघेवाण तर अगदी अशक्य) तर लग्नानंतर जोडपी ‘आपोआप’ साऱ्या गोष्टी शिकतील असं कसं गृहीत धरायचं? (‘येतं ते हळूहळू, आम्हांला कुठे काय माहित होतं, पण लेकरं झालीच ना आम्हांला, तुम्हांलाही होतील,’ हे आधीच्या पिढ्यांचं मत. आता बोला!)

खरं तर आजकाल आपल्याकडे लग्नाचे सरासरी वय २५ च्या आसपास (किंवा पुढेच) असावं, निदान शहरी भागातील तरी. बऱ्याचदा शिक्षण, नोकरी, सुयोग्य स्थळ मिळेपर्यंत लग्नाच्या वयाने तिशी पार केलेली असते. तोपर्यंत त्या इच्छेला दाबून ठेवायचे किंवा अन्य मार्गांनी बाहेर टाकायचे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ‘संस्कृतीच्या, नीती-अनीतीच्या’ चौकटीत प्रणय या विषयाला बसविण्याने प्रश्न संपत नाही आणि ज्या क्रियेतून मानव निर्मिती होते त्या क्रियेला ‘अनैतिक’ कसं मानायचं? आपण कितीही भारतीय संस्कृती, परंपरा, खानदान, संस्कार (सगळं काही मानवनिर्मित) यांचा हवाला दिला तरी शरीरसंबंध ही गरज (निसर्गनिर्मित) आहे आणि ती लग्नाअगोदरही जागृत असते, हे सत्य आपण बदलू शकत नाही. त्यामुळे ती गरज पूर्ण करण्यातला सुवर्णमध्य काढलाच पाहिजे. कदाचित मी स्वतः या बाबतीत काय करायचं ते आपण ठरवू शकतो (नकारार्थी निर्णय घेतला तरी मी फक्त ‘पवित्र’ आणि इतर सगळे ‘भानगडीवाले’ असं समजण्याचंही काही कारण नाही.) पण त्यामुळे इतरांनीही तेच करावं असं मत बनविण्यात काही तथ्य नाही. अगदी माझ्या मुलीने/मुलाने ते करू नये, अशी काळजीची भावना किंवा भूमिका घेवूनही काही फायदा नाही; ते काय करतात किंवा काय निर्णय घेतील हे आपणास ठाऊक नाही (कारण या विषयाबाबत एकमेकांचे विचार सांगण्या-ऐकण्याइतपत जवळचे नाते आपण निर्माणच केलेले नसते.)

लग्नाअगोदरही शरीरसंबंधांची गरज मान्य केली तरी, त्याचा आनंद घेण्यापूर्वी काही गोष्टी नक्कीच विचारात घेतल्या पाहिजेत. आपण ज्या व्यक्तीशी आपली भावना वाटत आहोत ती ‘विश्वासार्ह’ असणे गरजेचे आहे. मी जेव्हा मुले-मुली आपले चुंबन दृश्य किंवा अनेक जवळचे क्षण मोबाईलमध्ये कैद करीत असताना पाहते, तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न आल्याशिवाय राहत नाही की त्या क्लिपचा गैरवापर होणार नाही याची खात्री काय? शिवाय असे एमएमएस बनवून मुलींना नंतर ब्ल्याकमेल करून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या, तिचे वैवाहिक आयुष्य उध्वस्त केल्याच्या घटना सर्वांच्याच ऐकण्यात, पाहण्यात आहेत. अनेक उदाहरणात अशा क्लिप्स मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकात पसरवल्या गेल्या आहेत. बदनामीच्या भीतीने मुली, तिचे नातेवाईक केस करायलाही पुढे येत नाहीत (‘स्त्रीचं चारित्र्य म्हणजे काचेचं भांडं’ असं फालतू विधान लिहिणाऱ्याचा शोध घ्यायला हवा, नक्कीच कुणीतरी पुरुषच असणार.). त्यामुळे नात्यातील विश्वासार्हता महत्वाची. दुसरी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आपल्याकडे सेक्स या विषयासंदर्भात असलेली अपुरी आणि चुकीची माहिती. व्यवस्थित माहितीच्या अभावाने मुलींचे अल्पवयातील तसेच अनैच्छिक गर्भारपण ही गंभीर समस्या उद्भवते. आपल्याकडे कुमारीमातेचा सामाजिक तथा मुलीच्या आणि तिच्या जोडीदाराच्या वैयक्तिक पातळीवरील अस्वीकार यामुळे बदनामी तर होतेच शिवाय ‘गुप्त आणि बेकायदेशीररित्या’ केलेल्या गर्भापातामुळे मुलीचा मृत्युही ओढविल्याचे उदाहरण माझ्या माहितीत आहे. मुलीचे शिक्षण अर्ध्यावरच ठेवून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले जाते. तिच्यावर भरून न येणारा शारीरिक, मानसिक आघातही होवू शकतो. शिवाय असुरक्षित संबंधांमुळे मुला-मुलींना गुप्त रोग, एचआयव्ही एड्ससारखे लैंगिक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरीर संबंधातील योग्य माहितीचा अभाव कुमारवयीन तरुण-तरुणींमध्येच असू शकेल आणि त्यापुढील तरुण वर्गाला त्याची पूर्ण माहिती असेल असा ‘अघोषित (गैर)समज’ आपल्याकडे आहे. मात्र परिस्थिती वेगळी आहे. बऱ्याचदा पंचविशी गाठली (किंवा लग्न झाले) तरी ब्ल्यू फिल्म (शारीरिक संबंधांचे आभासी व अवास्तव चित्रण असणारी फिल्म) आणि बाजारातील अतिरंजित साहित्य (आजकाल मोबाईलवरील व्हीडीओ क्लिप्सची देवाण-घेवाण सर्रास होते.) याभोवतीच शहरी आणि ग्रामीण तरुण वर्गाचे ‘ज्ञान’ सीमित असते. पण पक्का व भक्कम पाया तयार झाल्यावरच मजबूत आणि टिकाऊ इमारत उभी राहते. कच्चा पाया असल्यास ती मुदतीपूर्वी ढासळते आणि नुकसान करते. त्याप्रमाणे सुदृढ आणि निकोप (कदाचित टिकाऊ) शरीर संबंधासाठी त्याविषयीची शास्त्रीय माहिती असणे गरजेचे आहे.

क्रमशः

(या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी १२ जुलै २०१६ ला वेबसाईटला अवश्य भेट द्या. )

(साभार: सदर लेख ‘मिळून साऱ्याजणी’ मध्ये प्रकाशित झाला होता)

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. अमित प्रभा वसंत says:

    खुपच वास्तववादी विवेचन . असं धिटपने लिहिनारयाच्या वाट्याला नजरेच्या कोपर्यातली प्रतिक्रिया येते . तरीही असंच लिही .

    • I सोच says:

      खरं आहे. लक्ष्मीनं अगदी मोकळेपणाने वास्तविकता मांडली आहे… खूप कमी लेखक याविषयावर लिहिताना दिसतात.. पुन्हा एकदा धन्यवाद लक्ष्मी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap