सेक्स बिक्स… नंदू गुरव

0 1,080

साधा सर्दीखोकला झाला तरी माणूस डॉक्टरांकडं जातो. ठेच लागली की हळद का होईना टाकतो. ताप आला की औषध घेतो. मग सेक्सचं काय झालं तर माणूस काहीच का बोलत नाही? कुणालाच का नाही काही विचारत? का सोसत बसतो? का गप्प बसतो? आपल्या पुरुषप्रधान समाजात पुरुषांची ही अवस्था मग स्त्रियांचं काय होत असंल ?

बारक्यापणी काय कळतंय कुणाला सेक्सातलं ?

कुणी कायबी सांगितलं का की खरंच वाटायचं समदं. पोपट्या म्हणायचा..  हातानं हलवू नै.. नाय तर पाण्याचा समदा स्टाक संपतू… तवापासनं कळाय लागोस्तोर हत्याराला हातबी लावला नाय आपुन पण निसर्ग थांबतू का? रातच्याला कवा आपूआप व्हायचं समजायचंबी नाय. परत भ्या वाटायचं. न्हाणीत जाऊन समदं चेक करायचं का की हात न लावताबी समदं कसं काय झालं? मंग घाम याचा जाम. पोपट्या दिसायचा. टाकीला भ्वाक पडल्याव पाणी कसं आपसूक जातं आन् काय टायमानं टाकी पार रिती व्हती कसं आपसूक जातं आन्

बारक्यापणी काय कळतंय कुणाला सेक्सातलं ?

सेक्स मंजे काय तरी जाम गुपितबिपित असतं. वयात आलं की समदं आपूआप समजतं. कुणी कुणाला शिकवायची गरज नसती असं माणसं म्हणायची. पर सांगायचं कुणीच काय नाय. सारी गपगार. कावरीबावरी. पैल्यांदा जवा चड्डी वली झाली झोपत तवा जाम हबकाय झालं मंग. काय मायतीच नाय तर काय. भ्या वाटलं.  आमची मैतरीण हूती. तिलाबी पयल्यांदा असं काय तरी झालं. चार दिस गायब झाल्ती. परत साळंलाबी आली नाय आन् कायच नाय.  मंग कसलं तरी हाळदीकुंकू झालं तिच्या घरात. आमची आय गेल्ती. मी इचारलं काय झालं गं.. तर म्हंटली.. तुला काय कराचं? पोरींचं असतंय काय बाय.. तू गप जा साळत.. मला मंग लयच डेंजर वाटाय लागलं समदं.. मंग लगीन झालं तिचं वर्साभरात.. पण तिला नेमकं काय झाल्त ते बारक्यापणी कायबी समजलं नाय. पर असं काय झालं की बिचारीची साळा सुटली.लगीन कराय लागलं. कायबी पत्त्या लागला नाय.

फक्त नॉलेज नसल्यानं सेक्सनं लय घोळ घातला लेको आमच्या जिंदगीत. जीवानीशी खेळला ना सेक्स. धावीला होतो आमी. सूऱ्या आमच्या वर्गात. सुमीबर त्येचं झेंगाट होतं. झेंगाट मंजे नुसतचं बगणंबिगणं. चांगलं चाललवतं समदं. पर येक दिस सुमीनं धाड्दिशी उडी हाणली ना लेको हिरीत. जीव द्याला. चार पाच जणानी धडाडा उड्या हाणत वाचीवली सुमिला. तर ‘मला मरुद्या .. मला मरुद्या’ असं किचळाय लागली सुमी. कुणाला काय समजेना. समद्या गावात तमाशा. मंग आयाबायानी तिची समजूत घातली. चार दिस सुमी गपगार. हिकडं सूऱ्या पार जीव गेल्यागत पडल्याला. रातीला माळाव दोस्तास्नी सांगितला का की मी सुमीचा मुका घेतला लेको. त्यापाय तर मराय लागली नसंल? आमच्या चक्कीत जाळ झाला. लेका मुका घेतल्याव बायला प्वार हुतं. सुमिला प्वार हुण्याची दाट शक्यता हाय. आता लग्नाआधी प्वार हुणार म्हंटल्याव कुठली पोरगी जगंल सुऱ्या..? असं आमचं सवाल. सुऱ्याबी मराय निघाल्यालं. आमी आडीवलं.

बारक्यापणी काय मायती नव्हतं ना सेक्सातलं.

आमाला वाटायचं का की मुका घेतल्याव प्वार हुतं.

बाईच्या पोटात आत जाऊन कोण बरं पोरगं ठीवीत असंल?

ते आत कसं जात असंल? बरं गेलं ते गेलं, मंग भाईर कसं येत असंल?

लय चर्चा चालायची, पण वांझुटी. धड कुणाला कायबी मायती नाय. एचारायची सोय नाय. पुस्तकात वाचवं तर उघडया बायका छापल्याल्या पुस्तकाबिगर कायबी मिळायचं नाय. त्यात सगळ्या सेक्साड कथाच. लय हाल व्हायचं वाचून. असलं काय बाय वाचायचा नाद लागलावता आमच्या गँगला. घडया घालून घालून काड्यापेटी एवढं पुस्तक करायचं, ते कमरला खवायचं नायतर खिशात घालायचं. लांब माळावं नायतर हिरीत जायाचं आन् हापापल्यागत वाचायचं. कायबी कळायचं नाय. सुहाली दिसायला आयटम होती. तिचे स्तन आणि नितंब लई भारदार होते. साधारण ३६-३२-३६ ची फिगर असावी तिची. तिचे ते भरलेले शरीर.. मोठया आंब्यासारखे स्तन गोल गरगरीत.. मोठे नितंब मला तिच्याकडे जास्तच आकर्षित करायचे.. असं काय काय असायचं. स्तन..नितंब..फिगर..कायबी समजायचं नाय.. पर वाचताना भारी वाटायचं. हे वाचुने असं सांगाय कुणी नसायचं. मुळात वाचायचं चोरून. वाचून झालं का की पुस्तक दुसऱ्याला द्याचं. मंग त्यानं तिसऱ्याला… चवथ्याला.. सारी गँगच वाचून झालं की मंग ती जाळायचं. या असल्या पुस्तकानं पोरं बिघडली हेबी खरंच. जे वाचलंय ते करून बघू वाटायचं. पर डेंजर वाटायचं समदं.

किती बारक्या बारक्या गोष्टी.. किती बारके बारके प्रश्न.. पण त्यानं पोरापोरींची आयुष्य दडपून टाकली होती. कित्येकांचं लहानपण कुकरमध्ये कोंबल होतं.. खालून सेक्स ची आग आणि वरून घुसमटीच झाकण. वाफ बाहेर पडायला चान्स नाही आणि मंग कित्येक पोरांची टोपण उडून गेली आणि आयुष्य करपून गेलं.

आता तर उठता बसता बारोमास कंडोमच्या जाहिराती सुरु असतात. व्हिस्पर.. स्टेफ्री.. काय काय राजरोस सांगत असतात. गावाकडच्या किरणा दुकानातबी कंडोमची.. व्हिस्परची पाकीटं साबणासारखी ठेवलेली असतात. आता कुणाला काही वाटत नाही त्याचं.

ही इतकी जागृती यायला.. हे इतक्या सवालांचे जबाब मिळायला किती वर्ष जावी लागली? किती पिढयांनी घुसमट सोसली? किती जणांची जिंदगी उध्वस्त झाली? किती जीव हकनाक गेले?

आता सांगलीसारख्या गावात पण वेश्या कंडोम पायजे म्हणून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढतात. ‘कंडोम आमच्या हक्काच, नाही कुणाच्या बापाच’ म्हणत भर रस्त्यावर घोषणा देतात. कंडोम नसेल तर बसणार नाही म्हणत गिऱ्हाईकाला नाही म्हणून संगतात. गावाकडची पोरगी पण आता मासिक पाळी आली म्हणून तीन दिवस शिवाशिवीचा खेळ खेळत बसत नाही. तिला ते शक्य पण नाही.

जग इतकं वेगानं चाललंय लेको पुढं..

कुणाला वेळ नाही.. अडकायला टाईम नाही..

मार्केट तेजीत आहे..त्याच्या आयडीया बदलतायत.

मार्केट बदलतंय आणि रिलेशन्सपण.

आत मॉम बेस्ट फ्रेंड असते मुलीची आणि डॅडा मुलाचा.

हातात पाचपन्नास हजाराचे हॅडसेट असतात. फेसबुक..व्हॉटसप..नेट..!

पण पोरं बोलतात का अजून तरी सेक्स विषयी मोकळेपणानं?

आपल्या पालकांशी? शिक्षकांशी?

ग्लोबल एज्युकेशन सिस्टीममध्ये शिकवतात का हे समदं?

कुकरची शिट्टी अजून जराशी ढिली कराय पायजे लेको..!

साभार: ‘पुरुषस्पंदनं माणूसपणाच्या वाटेवरची’ दिवाळी अंक २०१५ मधील नंदू गुरव लिखित ‘ सेक्सबिक्स’ या लेखातील काही भाग. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.