मर्जी, मस्ती की आणखी काही…

0 728

गेल्या आठवड्यात अमेरिकेतल्या कोलोरॅडोमधल्या कॅनन सिटी इथल्या मिडल स्कूल आणि हाय स्कूलमध्ये मोठाच गहजब उडाला. जवळ पास 100 विद्यार्थ्यांनी आपले नग्न फोटो ट्रेड केले. या विद्यार्थ्यांनी आपल्या फोनवरून सुमारे 300 ते 400 नग्न फोटो एकमेकांसोबत ट्रेड केले. फोटो ट्रेड करताना विद्यार्थ्यांनी एक विशिष्ट पॉइंट सिस्टिम तयार केल्याचं दिसलं. आणि त्याप्रमाणे फोटो असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. ज्यांच्याकडे जास्त फोटो त्यांना जास्त गुण मिळाले. या सगळ्या प्रकारात सहभागी नसणाऱ्या एका मुलाने सर्वात जास्त फोटो असणाऱ्या एका मुलाचा उल्लेख फोटोंचा दलाल (the pimp of pictures) असा केला.

तरुण, किशोरवयीन मुलांमध्ये सेक्स्टिंग मोठ्या प्रमाणावर चालू असतंच. सेक्स्टिंग म्हणजे फोनवरून लैंगिक स्वरुपाचे मेसेज, फोटो, बोलणं, इत्यादी. एकमेकांमधल्या आकर्षणाचं अजून एक रुप. मात्र या मजेशीर सेक्स्टिंगचं स्वरूप असं आणि इतकं होईल अशी मात्र कुणाला कल्पना नव्हती. कॅनन सिटी हे गाव तसं लहान. तिथल्या शाळेत हा प्रकार घडल्यामुळे शिक्षक आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. हाय स्कूलमधल्या मुलांसोबत यात आठवीमधल्या काही मुलांचा आणि मुलींचाही तितक्याच प्रमाणावर सहभाग या प्रकारात आहे असं कळल्यावर या मुलांवर काय कारवाई करायची असा मोठा प्रश्न पोलिस आणि वकिलांसमोर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर मुलांचा सहभाग असल्याने त्यांचा विचार नक्कीच वेगळा करावा लागेल असं डिस्ट्रिक्ट अॅटर्नी थॉमस लदू यांनी म्हटलं. अल्पवयीन मुला-मुलींचे नग्न फोटो आपल्या फोनमध्ये बाळगणं हा गुन्हा आहे. हा प्रकार चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये मोडतो. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर मुला-मुलींनी स्वतःचे आणि इतरांचे फोटो बाळगले, एकमेकांना पाठवले त्यामुळे त्यांच्यावर असे आरोप तरी कसे करायचे हा मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे.

आपली आयुष्यं, आपली शरीरं आणि आपले नातेसंबंध इतके लैंगिक स्वरुपाचे कसे आणि कधी झाले असा प्रश्न आता विचारला जातोय. मोठ्यांनी असं कितीही आणि काहीही करावं. मात्र अगदी शाळेपर्यंत या गोष्टी आणि त्याही इतक्या मोठ्या प्रमाणावर येणं हे कसलं लक्षण आहे हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण असं म्हणत असतानाच आपल्याच शरीराकडे आपण एक लैंगिक वस्तू म्हणून तर पाहत नाही ना हाही प्रश्न आहेच. नग्नतेत वाईट काही नाही पण त्याचा बाजार व्हायला लागतो, त्याला गुण दिले जाऊ लागतात तेव्हा शरीराबद्दलचा आदर कुठे जातो हाही प्रश्न आहे.

प्रेमाच्या भरात, आकर्षणाच्या भरात नग्न फोटो पाठवले आणि नंतर त्या फोटोंचा गैरवापर झाल्याच्या घटना आपल्यासाठी नव्या नाहीत. सेक्स्टिंगचं असं रूप आपल्याकडेही कुठे ना कुठे पहायला मिळतं. आपल्या शरीराचा वापर आपण कसा करायचा याचा मात्र आपण नक्कीच विचार करायला पाहिजे.  आणि लैंगिकता म्हणजे नक्की काय याचाही विचार सतत करत रहायलाच पाहिजे हेच खरं.

image courtesy  and reference –
http://www.nytimes.com/2015/11/07/us/colorado-students-caught-trading-nude-photos-by-the-hundreds.html?_r=0

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.