Home / सगळं नॉर्मल आहे / वेगळेपण सामावून घेऊयात…

वेगळेपण सामावून घेऊयात…

होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बायफोबिया म्हणजे समलिंगी, ट्रान्सजेंडर, उभयलिंगी व्यक्तींविषयीची भीती, त्यातून उत्पन्न होणारा द्वेष. १७ मे हा होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बायफोबिया विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस मानला जातो. या दिवसाच्या निमित्तानं आपण लैंगिक वेगळेपण सामावून घेण्याचा निर्धार करूयात.

कालच एका ट्रान्सजेंडर व्यक्तीला एका कामानिमित्त मी आणि माझी सहकारी भेटलायला गेलो होतो. ती म्हणाली, “आठवड्यातील तीन दिवस मला मागायला जावं लागतं. सरकार आमचं ऐकत नाय. आमच्यासाठी कायदा नाय. आमाला काहीच अधिकार न्हायत. काय करणार घर चालवायला काही तरी करायलाच पाहिजेच ना?” गेल्या अनेक वर्षांच्या लढाईनंतर देखील आपल्या समाजात लैंगिक वेगळेपण असणाऱ्या लोकांना द्वेष, तिरस्कार, अन्याय आणि अनेक समस्यांना समोरं जावं लागत आहे.

समलिंगी, ट्रान्सजेंडर, उभयलिंगी, अलैंगिक असणं हा आजार नाही, अनैसर्गिक नाही, व्यंग नाही किंवा विकृतीदेखील नाही. लैंगिक वेगळेपण स्वीकारताना, लैंगिक वेगळेपण असणाऱ्या व्यक्तींना, त्यांच्या घरच्यांना आणि समाजाला सहजतेनं स्वीकारता येत नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक वेगळेपणाचा स्वीकार व्हावा, त्यांना त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी भारतामध्ये अनेकजण लढत आहेत. तरीदेखील अजूनही लैंगिक वेगळेपण असणाऱ्या व्यक्तींना कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये भेदभावाला सामोरं जावं लागत असल्याने त्यांना अनेक समस्यांना समोरं जावं लागतं.

सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे नसतात – काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची – स्त्री-पुरुषसंबंधी नसते. खरंतर प्रत्येकाचा लिंगभाव, लैंगिक कल नैसर्गिक आहे. शिकवून, मारहाण करून किंवा कोणत्याही वैद्यकीय उपायांनी तो बदलता येत नाही. आणि बदलायचा तरी कशाला ? व्यक्ती तितक्या प्रकृती या साध्या नियमानुसार हे वेगळेपण आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे.

खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास अनेकजण दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात. याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आपण जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही.

चला तर मग आज होमोफोबिया, ट्रान्सफोबिया आणि बायफोबिया विरोधी आंतरराष्ट्रीय दिवसाच्या निमित्तानं एक छोटंसं का होईना पाऊल उचलूया. वेगळेपण सामावून घेऊयात. तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या पातळीवर समलिंगी ट्रान्सजेंडर, उभयलिंगी किंवा अलैंगिक व्यक्तींना त्यांचे अधिकार मिळावेत, समान वागणूक मिळावी किंवा समाजामध्ये लैंगिक वेगळेपण स्वीकारले जावे यासाठी काय केलंत? किंवा इथून पुढे काय करणार आहात हे आम्हाला नक्की कळवा.

 

Rainbow flag representing diversity in sexual orientations (P.C:commons.wikimedia.org)

 

About I सोच

I Soch encourages Pune youth to SPEAK OUT on equality, safety, diversity within the discussions of sexuality. It is a platform to learn, argue and clarify.

Leave a Reply

Your email address will not be published.