लैंगिक कल बदलता येत नाही! – डॉ. भूषण शुक्ल

डॉ. भूषण शुक्ल हे नामवंत मानसोपचारतज्ञ आहेत. लैंगिकतेच्या विषयावर त्यांनी गेली पंधरा वर्षे काम केलं आहे. चार वर्षे त्यांनी इंग्लंडमध्ये एन.एच.एस (नॅशनल हेल्थ सर्व्हिस)मध्ये कामं  केलं. २००८पासून ते पुण्यात प्रॅक्टीस करत आहेत. त्यांच्याशी केलेली बातचीत.

*  लैंगिकतेची प्राथमिक जाण याबद्दल थोडं सांगा. 

सर्वांनी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे तुमचा लैंगिकतेचा जो भाग आहे, याच्याशी कोणाचा काही संबंध नाही. ती निर्माण करण्यात पालकांचा (किंवा इतर कोणाचा) हात नाही. हे खरं आहे, की तुमची लैंगिकता तुमच्यासाठी खूप अडचणीची असू शकते, गैरसोईची असू शकते, पण तरीसुध्दा त्याबद्दल तुम्ही काहीही करु शकत नाही.

प्रत्येकाची लैंगिकता चार भागांत विभागली जाऊ शकते. हे समजावं म्हणून मी खूप सोपं करून सांगतोय, पण शास्त्रीयदृष्ट्या ते पूर्ण सत्य आहे, असं मी म्हणत नाही.

  1. मुलाचे / मुलीचे ’गोनड्स’ – शरीरात वृषण आहेत, की स्त्रीबीजांडं आहेत व ती कशी काम करतात, याला आपण ’गोनॅड पातळी’ म्हणूया.
  2. मुलाची / मुलीची बाह्य जननेंद्रिय. याला आपण शारीरिक पातळी म्हणूया.
  3. मुलाचा / मुलीचा लिंगभाव काय आहे? म्हणजे तरूणपणी ते स्वत:ला मुलगा की मुलगी समजतात?4.वयात आल्यावर त्या मुलाला / मुलीला कोणत्या लिंगाच्या व्यक्तीबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं? (स्त्री? पुरुष?  का दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटतं?)

या चारही पातळ्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ८०% लोकांमध्ये या सर्व पातळ्यांमध्ये एकसंधपणा (कॉंग्रुअन्स) असतो. म्हणजे त्या मुलाची / मुलीची गुणसूत्र, जननेंद्रियं, लिंगभाव व लैंगिक कल यांच्यात एकसंधपणा असतो, या एकसंधपणाला पुरुष किंवा स्त्री हे सर्वसाधारणपणे नाव दिलं गेलं आहे. पण या सगळ्यांमध्ये इतक्या छटा आहेत, की हे सर्व बर्‍याचदा सामान्य माणसाच्या तर सोडाच अनेक डॉक्टरांच्याही समजेच्या पलीकडचं आहे. थोडक्यात सांगायचं तर यातलं आपल्याला फार कळतं असा आव खरचं कोणी आणू नये.

*  औषधोपचार, समुपदेशन, धाक, शिक्षा या मार्गांनी लैंगिक कल बदलता येतो का?

मुलांचा / मुलींचा लैंगिक कल बदलता येत नाही. असे बदल करायचा प्रयत्नांनी त्या मुलाची/मुलीची अस्मिता (जी अगोदरच रसातळाला गेलेली असते) अजूनच दुखावते. यातून काहीही साध्य होत नाही.

काहीजणांमध्ये असा समज आहे, की कालांतराने लैंगिक कल बदलू शकतो किंवा आपोआप बदलतो. एक लक्षात ठेवा, की जसंजसं वय वाढतं तसतशा लैंगिक आवडी बदलतात. लैंगिक सुखाच्या संकल्पना बदलतात. लैंगिकता खूप बदलणारी (डायनॅमिक / फ्लुइड) गोष्ट आहे. दहा वर्षापूर्वी तुमची जी लैंगिकता होती तीच आज आहे असा कोणताही माणूस नाही. तसं कोणी असेल तर तो अत्यंत दयनीय स्थितीत जगत आहे, ही इज लिव्हिंग अ व्हेरी पथेटिक लाइफ.

इथे लक्षात घ्या, की ’फ्लुइड’ आहे याचा अर्थ प्रत्येक गोष्ट बदलता येते असं नाही. ’फ्लुइड’ म्हणजे ती नदी सारखी ’फ्लुइड’ आहे म्हणजे त्यातील पाणी बदलतं, त्यातील मासे बदलतात, पाणी कमी-जास्त होतं, वेग कमी जास्त होऊ शकतो, पण त्याचा अर्थ तिचा इकडचा काठ तिकडे आणि तिकडचा काठ इकडे होत नाही आणि ती क्षणात इथून उठून ६ कि.मी. दूर जात नाही. नदीचा समुद्र होत नाही.

*  अनेक पालकांना असं वाटतं, की आमच्यामुळे असं मूल झालं का, त्याविषयी काय सांगाल?

याचं उत्तर स्पष्टपणे ’नाही’ असं आहे. आईवडीलांनी मुलामुलींना कसं वाढवलं याचा त्याच्या मुलामुलींच्या लैंगिकतेशी काहीही संबंध नाही.

मला अनेक पालक विचारतात, की आम्ही या मुलांची / मुलींची लैंगिकता बदलण्यासाठी काय करू शकतो? याचंही उत्तर ’काहीही नाही’ असं आहे. म्हणजे आईवडीलांना वाटतं, की त्यांच्या मुलामुलींच्या घडणीवर त्यांचा खूप मोठा प्रभाव असतो. असं त्यांना वाटत असलं तरी हा प्रभाव लैंगिकतेच्या बाबतीत (वरील दिलेल्या पैलूंमध्ये) काहीही नसतो.

याच्यापुढे जाऊन मी असं म्हणेन, की अल्पसंख्यांक म्हणून मानल्या गेलेल्या ज्या लैंगिकता आहेत त्या खूप ’बायालॉजीकल ड्रिव्हन’ आहेत आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी फारसा काही संबंध नाही, हे वारंवार शास्त्रीयदृष्ट्या सिध्द झालेलं आहे. ही गोष्ट आईवडीलांना लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांना आपल्या मुलामुलींच्य लैंगिकतेचं वाईट वाटणं, त्याचं दुख: होणं, हे मूल चारचौघांसारखं नाही, याचा त्रास होणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे आणि त्याच्याबद्दल माझी पूर्ण सहानभूती आहे. पण हे माझ्यामुळे झालं आणि काहीतरी करून याच्यात आपण बदल घडवून आणू शकतो, ही गोष्ट खरी नाही.

*  पालकांच्या काय मर्यादा आहेत?

मानसोपचारतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करताना  मला नेहमी जाणवतं, की अनेक पालक त्यांच्या प्रकारे (विशेषत: आई) मुलाला / मुलीला समजून घ्यायचा प्रयत्न करतात, सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. पण अशा वेळी असं दिसतं, की काही मुलांची पालकांकडून अवास्तव अपेक्षा असते. आईवडीलांना ही सर्व गोष्ट समजणं खूप अवघड जात, कारण ते या मुलांच्या/मुलींच्या तीन पिढ्य़ा मागे असतात. एक पिढी ७-१० वर्षांची मानली तर ही मुलं तीन पिढ्या पुढे असतात. या मुलांपेक्षा तीन पिढ्या मागे असणाऱ्या पिढीला लैंगिकतेची संकल्पना पूर्णपणे समजावी ही अपेक्षा रास्त नाही. प्रगल्भता आली, की तुम्हाला हे लक्षात येईल, की कोणीही दुसऱ्याला पूर्णपणे समजू शकत नाही. आईवडीलांनी आपल्याला स्विकारावं ही एक गोष्ट, पण आपल्याला पूर्णपणे समजून घ्यावं हा अट्टाहास आततायी आहे.

दुसरी गोष्ट उपस्थित होते ती म्हणजे काही मुलं म्हणतात, “ जर पालकांनी आम्हाला स्विकारलं तर आम्ही जसं हवं तसं वागू व या सगळ्याला तुम्ही नुसता होकारच नाही दिला पाहिजे, तर तुम्ही त्याला ’सपोर्ट’ केला पाहिजे.” जर पालक ते करू शकले तर उत्तमच, पण हे अनेक पालकांना अवघड जातं. विशेषत: ज्या मुलाला/मुलीला विरुध्द लिंगाच्या व्यक्तींचे कपडे घालणं, हावभाव करणं हा त्यांच्या लैंगिकतेचा महत्वाचा भाग आहे अशांची, आईवडीलांनी हे सर्व स्विकारलं पाहिजे, ही अपेक्षा खूप अवास्तव आहे. त्या आईवडिलांवर हा खरतर अन्याय आहे. त्यांनी अत्यंत कष्टाने तुम्हाला समजून स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे, ही खूप मोठी बाब आहे. ते जर तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करताहेत तर तुम्हीही त्याची जाण ठेवली पाहिजे.

जर आपल्याला वाटत असेल, की आपले पालक आपल्याला स्वीकारत नाहीत, तर आपण स्वतंत्र राहून आपली जीवनशैली जरूर जगावी, पण प्रौढ झाल्यावरही घरच्यांकडे राहायचं, त्याच्यां पैशावर आपली जीवनशैली जगायची आणि त्यांनी अजून पूर्णपणे आपल्याला का स्वीकारलं नाही म्हणून जाब विचारायचा हे मला पटत नाही. तुम्ही शिका, स्वत:च्या पायावर उभं राहा, स्वतंत्र राहा आणि तुमची जीवनशैली जगा. जर ते मूल स्वतंत्र राहायची तयारी दाखवत असेल तर आईवडिलांनीही त्याला / तिला अजिबात अडवू नये. काही झालं तरी चालेल, पण त्यांनी माझ्यापाशीच राहिलं पाहिजे हा अट्टाहास पालकांनी धरू नये. काही वेळेला पालकांना आणि मुलांना असं वाटतं ’धरलं’ तर चावतंय आणि सोडलं तर पळतयं’, पण अशा वेळी पालकांनी आणि मुलांनी कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे.

*  गे व्यक्तींनी त्याचं लैंगिक आरोग्य कसं सांभाळावं?

तुम्ही गे आहात म्हणून तुमचं शारीरिक वास्तव (रिअलिटी) काही बदलत नाही. इतर जण एचआयव्ही व एसटीआय (लैंगिक संबंधातून पसरणारे आजार) होऊ नयेत यासाठी लैंगिक संबंधांच्या बाबतीत जी काळजी घेतात ती यांनीही घेतली पाहिजे. या समाजातील काही जणांचे अनेक जोडीदार असतात. म्हणून हा समाज जास्त ’रिस्क’ मध्ये आहे. यांनी तर जास्त काळजी घेतली पाहिजे.

लैंगिक संबंधाच्या वेळी निरोध वापरायलाच पाहिजे, एखादा पुरूष दिसायला चांगला आहे, त्याला कोणत्या आजाराची लक्षणं दिसत नाहीत म्हणजे त्याला एचआयव्ही  किंवा एसटीआयची लागण नाही असा अर्थ लावू नका. लक्षणं दिसत नसली तरी हे आजार त्या व्यक्तीला असू शकतात. म्हणून त्याच्याबरोबर बिन निरोधचा संबंध करू नका. तो निरोध वापराय़ला तयार नसेल तर त्याला ’बाय बाय’ करा.

जर निरोध न वापरता लैंगिक संबंध झाले व एक दोन महिन्यात गुप्तरोगाची लक्षणं दिसली (लिंगातून दुर्गंधीयुक्त स्त्राव जाणं, जननेंद्रियांवर फोड / जखमा होणं, जननेंद्रियांवर पाण्याने भरलेले, जळजळ करणारे पुरळ येणं, जांघेत गळू होणं, लिंगावर / गुदद्वारावर फ्वॉवरसारखे कोंब येणं, गुदातून रक्त जाणं इत्यादी) तर लगेच अलोपॅथिक डॉक्टरकडून उपचार घ्यावेत.

जर तुम्ही एचआयव्हीसंसर्गित असाल, तर संभोगाच्यावेळी न चुकता निरोधचा वापर करा. म्हणजे तुमच्या जोडीदाराला एचआयव्हीची लागण होणार नाही व जर जोडीदाराला एचआयव्हीचा संसर्ग असेल व त्याला एआरटीची औषधं चालू असतील तर त्याच्या एआरटी रेझिस्टंट विषाणूची लागण तुम्हाला होणार नाही. खाणं, पिणं, व्यायाम, योग्य त्या चाचण्या (उदा. सीडी –फोर काउंट) योग्य वेळी करा. वेळच्या वेळी औषधं घेणं इत्यादी सर्व काळजी घ्या. ’क्रोनिक’ आजारात माणसं जी पथ्य पाळतात ती पथ्य तुम्हीही पाळली पाहिजे.

*  गे मुलांच्या/मुलींच्या मानसिक आरोग्याबद्दल थोडं सांगा.

मला वाटतं, की मुलांचं शिक्षण व आर्थिक स्वातंत्र्य हे सर्वांत महत्वाचे मुद्दे असले पाहिजेत. शिका आणि लवकारात लवकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा. इंग्रजी शिका. याच्या खालोखाल मी म्हणेन, की भावनिकदृष्ट्या मुलांनी आईवडिलांपासून स्वतंत्र होणं आवश्यक आहे. हे दोन्ही मुद्दे खरतरं सर्व लैंगिकतेच्या मुलामुलींसाठी लागू आहेत, पण विशेषत: लैंगिक अल्पसंख्यांक मुलांसाठी. कारण ही मुलं अत्यंत त्रासदायक परिस्थितीतून आयुष्य काढत असतात. म्हणजे इतर दोन भावाबहिणींसारखे ते दोन भावनिक दणके खायला तयार आहेत हे गृहीत धरणं चुकीचं आहे. या सनातनी समाजात वाढताना अशा मुलांवर जो परिणाम होतो, जो पीळ बसलेला असतो तो आयुष्यभर त्यांच्यांसोबत राहतो. सर्व समाजांमध्ये हा परिणाम दिसतो. असा कोणताही समाज नाही जिथे तो दिसत नाही. त्यामुळे या मुलांना जरा हलक्या हाताने वाढवावं लागतं. त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व भावनिक स्वातंत्र्याकडे आईवडीलांनी लक्ष दिलं पाहिजे. त्या दृष्टीने लागेल ती मदत करावी, पण त्या मुलाला जपलं पाहिजे म्हणून त्यांचे वाट्टेल ते लाडही करू नयेत. म्हणजे तो २५ वर्षांचा झाला तरी आईवडिलांच्या जिवावर राहात असेल, आपल्या स्वत:बद्दलच्या जबाबदार्‍या स्वीकारत नसेल तर ते योग्य नाही.

मला वाटतं, की लैंगिक अल्पसंख्यांक समाजामध्ये भावनिक असुरक्षितता आणि मानसिक आजारांचे (विशेषत: नैराश्य) प्रमाण इतर समाजापेक्षा कैकपतीने जास्त असतं. म्हणून अशा मुलांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे.

पहिल्यांदा त्या मुलाने / मुलीने हे स्वीकारायला पाहिजे, की मी इतरांपेक्षा जास्त ’इमोशनली व्हल्नरेबल’ आहे आणि त्य़ाचबरोबर आपल्या वाट्याला येणारी प्रलोभनं कितीही ’टेम्पटिंग’ असली तरी त्याबद्दल स्वत:ला एकतर लांब ठेवायचा प्रयत्न करणं किंवा पुरेसं संरक्षण बाळगणं. त्यांनी कायम लक्षात ठेवलचं पाहिजे, की ’अट एनी पॉईन्ट इन टाइम आय अम मोअर इम्पॉर्टंट दॅन माय रिलेशनशिप’. माझ्या आयुष्यात माझ्या नात्यापेक्षा, जोडीदारापेक्षा माझं सुदृढ राहणं जास्त महत्वाचं आहे. मला मान्य आहे, की काही नाती अशी असतात, की त्याक्षणी ती नाती आपल्यापेक्षा, सर्व जगापेक्षा महत्वाची वाटायला लागतात. पण वस्तिस्थिती अशी आहे, की स्वत:चं स्वातंत्र्य हे सर्वांत महत्वाचं असतं. द फॅक्ट रिमेन्स दॅट इंडिव्हिज्युअल फ्रीडम रिमेन्स सुप्रीम. त्यामुळे या मुलामुलींनी स्वत:ला जपणं ही सर्वांत मोठी जबाबदारी आहे.

(बिंदुमाधव खिरे यांनी संकलित केलेल्या, समपथिक ट्रस्टतर्फे प्रकाशित झालेल्या ‘अंतरंग’ या पुस्तकावरून साभार)

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap