लैंगिक शिक्षणाच्या क्षेत्रातले ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. अनंत साठे यांना आदरांजली

0 340

डॉ. अनंत साठे आणि डॉ. शांता साठे हे दोघं जण लैंगिकता शिक्षणाच्या क्षेत्रातले अध्वर्यू आहेत. त्यांनी काळाच्या पुढे असलेलं, अत्यंत मोलाचं आणि धाडसाचं असं लैंगिक शिक्षणाचं काम व्रत घेतल्यासारखं आयुष्यभर केलं. रविवार, दि. 26 जुलै 2015 रोजी डॉ. अनंत साठे यांचं निधन झालं. त्यांनी आजवर केलेल्या कामाची स्मृती त्यांच्या लिखाणाच्या आणि पुस्तकांच्या रुपाने कायम आपल्या सोबत राहील. त्यांनी सुरू केलेलं काम निष्ठेने आणि सचोटीने पुढे नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. त्यांचे काही विचार त्यांच्याच शब्दांत…

—–

लैंगिकता हा न बोलण्याचा विषय आहे अशी आत्ता-आत्तापर्यंत आपल्या समाजात समजूत होती. लैंगिकतेविषयी बोलणं हे थिल्लरपणाचं किंवा असभ्यपणाचं लक्षण समजलं जात होतं. ‘आम्हाला कोणी लैंगिकता शिक्षण दिलं होतं का, आमचं काही अडलं का’ असं म्हणून हा विषय बाजूला सारला जाण्याकडे प्रवृत्ती होती. आजही हा विषय गुलदस्त्यांधून पुरेसा बाहेर आलेला नाही. मात्र एकच झालंय! गेल्या दहा बारा वर्षांमध्ये विविध माध्यमांच्या द्वारा, कळत नकळत तो घरा-घरापर्यंत जाऊन पोहोचला आहे. मालिका, जाहिराती, इंटरनेटद्वारे लैंगिकतेच्या संदर्भात जणू मारा सुरू झालाय. केवळ वयात आलेली नाही तर लहान लहान मुलंही आपल्या आसपासच्या मोठ्या माणसांना भलतेसलते प्रश्न विचारू लागली आहेत. साहजिकच लैंगिकतासंबंधीच्या मुलांच्या साध्या साध्या प्रश्नांना बिचकणाऱ्या पालकांची नवनव्या प्रश्नांना उत्तरं देताना अक्षरशः दमछाक होऊ लागली आहे. काय सांगायचं, कसं सांगायचं, कधी आणि किती सांगायचं अशा विचारांनी पालकांची तारांबळ उडू लागली आहे. आणि याच कारणामुळे काही तरी सांगून वेळ मारून नेली जाते.

मुला-मुलींच्या मनामध्ये स्वतःच्या वाढीविषयी, नव्याने जाणवू लागलेल्या लैंगिक ऊर्मींविषयी, स्त्री पुरुष नात्याविषयी, म्हणजेच लैंगिकतेशी निगडित अनेक प्रश्न आहेत. पण त्याविषयी मोठ्यांशी मोकळा संवाद होत नसल्यामुळे आपले प्रश्न ही मोठी माणसं सोडवू शकतील असा विश्वास त्यांना वाटत नाही. मोठ्यांशी बोलायचं तर नेमकं कसं हेही त्यांना उमगत नाही. पालक आपल्याला काही सांगणार नाहीत, अशी एक ठाम भावनाच, त्यांच्या मनाची झालेली असते. मग ही मुलं आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरिता टीव्ही, इंटरनेट किंवा समवयस्क मित्र-मैत्रिणींकडे वळतात. त्यातून त्यांना मिळते ती अवास्तव, अर्धवट आणि अतिरंजित माहिती आणि लैंगिकतेबाबतचा भोगवादी आणि चंगळवादी दृष्टीकोन.

मोठ्यांशी बालताना लक्षात आलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी लहानांच्या शंका दूर करायच्या, त्या मोठ्या मंडळींनीच लैंगिकतेच्या संकल्पनांचा खोलवर जाऊन विचार केलेला नाही. शास्त्रीय माहिती नाही, शब्द सुचत नाहीत, काय, कसं, कधी आणि किती सांगायचं हीही अडचण आहे. सामाजिक सांस्कृतिक बदलांचा रेटा आज जाणवू लागला आहे. म्हणूनच लैंगिकतेसंदर्भात निर्माण झालेली कोंडी फोडायची आज तीव्र गरज आहे.

लैंगिकता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग. माणसाचं संपूर्ण जीवन व्यापून टाकणारा आणि तरीही खाजगी असा आहे. त्या बाबतच्या अनुभवांचा, विचारांचा, वर्तनांचा, लैंगिकतेविषयी समाजात प्रचलित असलेल्या दृष्टीकोनांचा, वृत्ती प्रवृत्तींचा, व्यक्तिमात्राच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर व जीवनशैलीवर, माणसामाणसांमधल्या नात्यांवर, कुटुंबाचा घटक असल्यास कुटुंबावर आणि एकंदरच समाजावर, बरा-वाईट खोलवर परिणाम होत असतो. म्हणूनच लैंगिकतेचा जो वारता आपल्यापर्यंत आला आहे त्याचा विचार करण्याची, त्यातील त्रुटी समजून घेण्याची, आज (बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर) वेळ आली आहे. या सर्व वारशाचा डोळे उघडे ठेवून, मनं मोकळी करून, स्वतंत्र बुद्धीने विचार करायला हवा. इतर सर्व सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये लैंगिकतेच्या संबंधातही, आपल्या विचारात बदल घडवून आणण्याचा लवचीकपणाही आवश्यक आहे. गाडी योग्य रुळावरून चालायला हवी असेल, घसरू नये असं वाडत असेल, तर वेळेवरच सांधा-बदल करण्याची आवश्यकता असते. वर्तमानातलं परिवर्तन किंवा बदल लक्षात न घेता भूतकाळाला चिकटून राहण्याचा प्रयत्न केला तर बरंच काही हातातून निसटण्याची भीती असते.

साभार –

काय सांगू? कसं सांगू? खास आईबाबांसाठी,

राजहंस प्रकाशन (आवृत्ती चौथी, फेब्रुवारी 2011)

ले. डॉ. शांता साठे – डॉ. अनंत साठे

फोटो साभारhttps://maitri2012.wordpress.com/

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.