तिच्या अधिकारांचं काय ?_ले. सुषमा खराडे

मावळ. पुण्यापासून अवघ्या ३० किलोमीटरवर असणारा प्रांत. सीमा (नाव बदलले आहे) मावळातील एका खेडेगावातील २४ वर्षांची तरुणी. शिक्षण ७ वी. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची. आईवडील लहानपणीच गेले. तिचा सांभाळ नातेवाईक करतात. नातेवाईकांचे म्हणणे आहे की, “तिला काही समजत नाही, बोलायचे कळत नाही, ती वेडी आहे.” घरातील सर्व कामं तिच्याकडून करवून घेतली जातात.

दोन वर्षापूर्वी, तिला ‘काही कळत नाही’ या परिस्थितीचा फायदा घेऊन, तिच्यासोबत कुणीतरी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. ‘कोणी ठेवले?’ हे शोधण्याचे किंवा त्याला शिक्षा देण्याचे कुणीही कष्ट घेतले नाहीत. त्यातून ती गरोदर राहिली. गर्भ पाडण्यासाठी तिला घरच्यांनी गोळी दिली. काही दिवसांनी, कोकणातील एक पुरुष ज्याला मूल होऊ शकत नाही, तो या तरुणीचा स्वीकार करायला तयार झाला. त्याला तिच्या गर्भात वाढणारे मूल हवे होते. गावकऱ्यांच्या निर्णयानुसार, एक करार करून सीमाचे त्या व्यक्तीशी लग्न लावून देण्याचे ठरले. कोणताही विधी न करता तिला त्या व्यक्तीबरोबर पाठवून दिले. मात्र तिला गर्भपातासाठी जी गोळी दिली होती, तिचा असर झाला होता आणि काही दिवसानंतर तिचा गर्भ पडला. ही गोष्ट जेव्हा तिच्या ‘करारबद्ध’ नवऱ्याला समजली तेव्हा त्याने तिला कायमस्वरूपी तिच्या घरी पाठवून दिले. तेव्हापासून ती नातेवाईकांकडेच राहते. ‘आता तिच्याकडे लक्ष कोण ठेवणार?’ ‘ती वेडी, मतिमंद, प्रतिकार न करणारी मुलगी आहे, म्हणजे कुणीतरी तिचा गैरफायदा घेणारच.’ असे प्रश्न नातेवाईकांसमोर आहेत. तिची नसबंदी करायची हा नातेवाईकांनी शोधलेला उपाय.

जेव्हा आम्ही तिची भेट घेतली आणि तिच्याशी संवाद साधला. तेव्हा लक्षात आलं की, आजूबाजूला काय घडतंय, लोक काय बोलतायेत, हे सर्व तिला व्यवस्थित समजतं. पण ती खूप शांत राहते, बोलायचं टाळते. कदाचित पूर्वीपासूनच तिच्याशी मनमोकळा संवाद कोणी साधला नसावा. तिला आपुलकीनं कुणी विचारत नाही. तिच्या या स्थितीचा फायदा घेणारा व्यक्ती एक नाही कदाचित अनेक असतील. बाहेरचेच काय पण घरातीलही असू शकतात.

सीमाला किती प्रकारच्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं आहे.  तिची होणारी अवहेलना, जबरदस्तीने तिच्याशी केले गेलेले लैंगिक संबंध आणि त्यातून झालेली गर्भधारणा, बेकायदेशीर आणि असुरक्षित गर्भपात केला गेला, लग्नाच्या नावाखाली झालेली विक्री, आणि आता तिची नसबंदी.

मागच्याच महिन्यात, ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला. दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. महिलांच्या प्रश्नांवर बोलले जाते, त्यांच्या मागण्या मांडल्या जातात. सोशल मिडियावर मेसेजसच्या माध्यमातून विचार मांडले जातात. त्यावर भरपूर चर्चा होतेच त्याचबरोबर शुभेच्छांचा वर्षावही होत असतो. स्त्रीचे हक्क, स्वातंत्र्य आणि समता याविषयीदेखील भरभरून बोलले जाते. पण खरंच यातून प्रश्न सुटतात का? आजही कित्येक स्त्रिया त्यांच्या अधिकारांपासून वंचित आहेत. मावळ भागात काम करत असताना स्त्रियांच्या अनेक समस्या दिसतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. आरोग्याच्या सेवांअभावी कित्येक महिला या घरीच किंवा दवाखान्यात जाताना रस्त्यात बाळंत होतात. तर कितीतरी महिला प्रजनन मार्गाच्या आजारांनी ग्रस्त आहेत. लिंगाधारित भेदभाव तर आहेच.

प्रत्येक स्त्री रोज कोणत्या न कोणत्या प्रकारच्या हिंसेला सामोरी जातेय. ‘हिंसामुक्त जीवन प्रत्येक स्त्रीचा अधिकार’ असे म्हंटले जाते पण किती स्त्रिया आज हिंसामुक्त जीवन जगत आहेत? उलट स्त्रियांच्या अधिकारांचे उल्लंघनच होताना दिसतंय. पितृसत्ताक पद्धतीमध्ये स्त्रियांचे श्रम, प्रजनन आणि लैंगिकतेचा वापर व नियंत्रण करण्यासाठी हिंसेचा वापर करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. त्यातून ती स्त्री जर शारिरीक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असेल तर तिच्यावर होणाऱ्या हिंसेचं प्रमाण अधिकच वाढते.

सीमाला भेटल्यानंतर माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. नसबंदी करून नातेवाईकांची काळजी (?) कमी होईल पण तिच्यावर होणारे लैंगिक अत्याचार थांबतील का? की आणखी नवीन प्रश्न तयार होतील?  ‘माझ्या शरीरावर माझा अधिकार’ असे आपण म्हणत असू तर हे सीमाच्या बाबतीत का लागू होत नाही? जरी ही तरुणी मतिमंद असली तरी तिचंही भावनाविश्व नाही का? तिच्या गरजांचं काय? तिच्या लैंगिक अधिकारांचं काय?

नोट: तथापि ही गेल्या अनेक वर्षांपासून ‘स्त्री आणि आरोग्य’ या क्षेत्रात काम करत आहे. तथापिच्या माध्यमातून पुण्यातील मावळ भागामध्ये ‘तारा’ नावाचा प्रकल्प राबविला जातो. या प्रकाल्पा अंतर्गत ‘स्त्री आणि आरोग्य, लिंगभाव, शरीर साक्षरता’ या मुद्दयांवर काम सुरु आहे. पुणे शहराच्या जवळ असलेल्या मावळ भागातील काही गावांतील स्त्रियांच्या आरोग्याची आणि त्यांच्या एकूणच समस्यांची सद्यस्थिती गंभीर आहे. या प्रकल्पाचं काम करत असताना अनेक महिलांचे आरोग्याचे प्रश्न, त्यांचे दुख:द अनुभव समोर आले. त्यातीलच एक या लेखामध्ये मांडला  आहे.

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap