शरीर साक्षरता सर्वांसाठी – मेधा काळे

0 629

मोठं होण्याच्या काळात स्वतःच्या शरीराची, शरीराच्या वाढीची, वयात येण्याविषयीची माहिती अतिशय मोलाची असते. मात्र बहुतेक मुला-मुलींपर्यंत ही माहिती पोचत नाही. आणि त्यातून अनेक शंका, गोंधळ मनात ठेऊन मुलं मोठी होतात. त्यांच्या वागण्यावर, विचारांवर आणि दृष्टीकोनावरही याचा परिणाम होतो. शारीरिक/मानसिक अपंगत्व असणाऱ्या मुला-मुलींपर्यंत तर अशी माहिती पोचणं त्याहूनही अवघड आहे.

आपण सर्व जण लैंगिक आहोत. आपल्यापैकी बहुतेकांना लैंगिक भावना आहेत. आपल्याला त्या व्यक्त कराव्याशा वाटतात. त्याचबरोबर आपण कसं रहावं, वागावं, आपल्या भावना, विचार आपण कसे मांडू शकतो याबाबतही समाजाचे काही नियम आहेत. लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार हाही लैंगिकतेचा भाग आहे आणि त्याचबरोबर लैंगिक आरोग्य हाही आपल्या आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही आणि जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच बिकट बनतो.

अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही लैंगिक भावना नसतातच किंवा त्या नसाव्यात असाच समाजाचा समज असतो. पण हे खरं नाही. डोळ्यांना दिसत नसेल, कानांना ऐकू येत नसेल, हात-पाय नीट काम करत नसतील तरीही वयात येण्याच्या प्रक्रिया शरीरात घडत असतातच. वयात येताना ज्या लैंगिक भावना निर्माण होतात त्याही बहुतेकांच्या मनात निर्माण होतात. कुणाबद्दल आकर्षणही वाटू शकतं. शरीराची एखादी क्षमता कमी आहे याचा अर्थ या भावना किंवा लैंगिक नाती ठेवण्याची इच्छा निर्माणच होणार नाही असं थोडंच आहे? त्यातही मानसिकदृष्ट्या अपंगत्व असेल, मतिमंदत्व, गतिमंदत्व, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम अशा मानसिक स्वरुपाच्या अपंगत्वामध्ये भावना, त्यांची अभिव्यक्ती या गोष्टी अधिकच गुंतागुंतीच्या होतात. या भावनांचा स्वीकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या भावनांना, इच्छांना वाट कशी करून देणार हा प्रश्न निरुत्तरितच राहणार आहे.

सध्या असं चित्र आहे की अपंग व्यक्तींच्या, विशेष गरजा असणाऱ्या मुला-मुलींच्या अगदी प्राथमिक गरजाही पूर्ण होत नाहीयेत. शिक्षण, आरोग्य, अपंगत्वावर मात करण्यासाठी आवश्यक सहाय्य, अन्न आणि निवारा या गोष्टीही मिळत नाहीयेत. त्यामुळे लैंगिक भावना, गरजा, अधिकार हे कधी कधी नुसते पोकळ शब्द बनून जातात. मात्र एकीकडे अपंग मुलांवर संस्थांमध्ये होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे आपल्या लैंगिक अधिकारांबद्दल काही लोक तरी जागरुकपणे बोलू लागले आहेत.

अपंगत्व आणि लैंगिकता, मुलांची वयात येण्याची प्रक्रिया, त्यांच्या वागण्यात होणाऱ्या बदलांविषयी शिक्षक आणि पालकांसाठीही सकारात्मक पद्धतीने माहिती देणारी संसाधनं मोजकीच आहेत. या विषयावर काम करणे आव्हानात्मक आहेच पण अतिशय गरजेचेही आहे. यामुळेच आता या गरजा लक्षात घेऊन ‘अपंगत्व आणि शरीर साक्षरता’ या विषयावर ‘तथापि ट्रस्ट’ संसाधनं तयार करत आहे. ‘नथिंग अबाउट अस विदाउट अस’ ही धारणा मनाशी पक्की बाळगून २०१४ साली तथापिनं अंध मुला-मुलींच्या सहभागातून ब्रेल लिपीतील एक पुस्तक, ऑडिओ सीडी आणि पालक-शिक्षकांसाठी मार्गदर्शिका असा संसाधन संच तयार केला आहे. बौद्धिक किंवा मानसिक अपंगत्व असणारी मुलं-मुली वयात येताना त्यांच्या वागण्यात होणारे बदल पालक कसे हाताळतात, त्यांना कोणत्या अडचणी येतात, त्यावर काही पालकांनी काय मार्ग शोधले आहेत याबाबत तथापिने मागील ३ वर्षांपूर्वी औरंगाबाद, नाशिक, यवतमाळ, पुणे, सिंधुदुर्ग अशा महाराष्ट्राच्या विविध भागांत पालक, शिक्षक, मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशकांसोबत गटचर्चा घेतल्या. या चर्चांमधून पुढे आलेले काही मुद्दे सर्वांसाठी देत आहोत.

  • वयात येतानाच्या काळात मुला-मुलींच्या वागण्यात बदल होतात. शरीरातले बदल, तसंच लैंगिक भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केल्या जातात. मुलं लिंगाला हात लावतात, लिंगाशी खेळतात किंवा मुलीही जननेंद्रियाला स्पर्श करतात. अशा वेळी त्यांना काय सांगायचं, अशा वेळी त्यांचं वागणं कसं थांबवायचं हे समजत नाही.
  • मुलींनाही लैंगिक भावना असतात हे कुणी सहज मान्य करत नाही पण ते समजून घेणं गरजेचं आहे. समलैंगिक आकर्षण, संबंधांचाही उल्लेख चर्चांमधून झाला.
  • कधी कधी वयात आल्यावर मुलं आक्रमक बनतात. त्यावेळी त्यांना आवर कसा घालायचा?
  • मासिक पाळीच्या काळात काय काळजी घ्यायची हे मतिमंद मुलींना शिकवता येतं, पण त्यासाठी प्रशिक्षित सेविकांची खूप जास्त आवश्यकता आहे.
  • गरीब घरांमध्ये अपंग मुलांच्या संगोपनाचा प्रश्न मोठा आहे. आई-वडील दोघंही कामाला जातात तेव्हा या मुलांना सांभाळायला कुणी नसतं. तेव्हा त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटते.
  • अपंगत्व असणाऱ्या मुला-मुलींची लग्नं याबाबतही समाज अजून तितकासा पुढारलेला नाही. त्यामुळे कधी कधी लग्नं जमत नाहीत. खासकरून शहरांमध्ये हा प्रश्न जास्त बिकट झाला आहे. अनेकदा लग्न झाल्यानंतरही त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा होत असल्याचं काही ठिकाणी दिसून आलं आहे. मुलांची लग्नं लावण्याचा अट्टाहास दिसून येतो. वेळप्रसंगी अपंगत्व लपवून लग्नं लावली जातात. यामध्ये गरीब घरातील मुलींची फसवणूक होण्याचा धोका आहे.
  • लग्नं जमली नाहीत तर लैंगिक नातेसंबंध जोडण्यासाठी सध्या तरी अपंग मुला-मुलींकडे कोणत्याही जागा, संधी उपलब्ध नाहीत.
  • बाहेरच्या देशांमध्ये अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना एकत्र राहता येतं, लैंगिक नाती प्रस्थापित करता येतात आणि त्यासाठी तशा संस्था, यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. मात्र आपल्या देशात अपंग व्यक्तींना त्यांचे मूलभूत अधिकारही मिळालेले नाहीत, त्यामुळे लैंगिकतेचा प्रश्न अजून थोडा लांबच आहे.
  • लैंगिक छळाच्या, छेडछाडीच्या घटना सर्रास घडतात. त्याला पायबंद घालण्यासाठी मुला-मुलींना जसं शक्य आहे तसं लैंगिक शिक्षण देणं आवश्यक आहे. लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर लैंगिक छळ होत आहे. त्याबाबत काय करायचं हाही प्रश्न आहे.
  • काही पालकांनी मुलांच्या लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक वेगळ्या वाटा चोखाळल्या आहेत. समाजाला मान्य नसल्या तरी या मुलांच्या लैंगिक भावना आणि गरजा त्यांनी ओळखल्या आहेत आणि त्याबाबत ते त्यांना जे काही सहकार्य करता येईल ते ते करत आहेत.

वरील मुद्द्यांना हाताळण्याची गरज, पालकांनी समोर आणलेले काही प्रयत्न, मतिमंद मुलांच्या भावना, लैंगिक अधिकार, मतिमंद मुला-मुलींच्या लैंगिकता शिक्षणाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न, पालकांचे, शिक्षकांचे अनुभव या सर्व गोष्टींना एकत्र करणारे ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी’ हे पुस्तकही २०१६ मध्ये प्रकाशित केले आहे. थेट मतिमंद मुला-मुलींसाठीदेखील लैंगिकता शिक्षणाची संसाधनं तथापि विकसित करत आहे. पालक, शिक्षक किंवा शाळांचा, इतर वाचकांचा या क्षेत्रातील अनुभव, नवीन कल्पना स्वागतार्ह आहेत… आपणही या प्रक्रियेत जरूर सहभागी होऊ शकता.. तथापि ट्रस्टशी जरूर संपर्क साधा… tathapi@gmail.com

– हा लेख उमेद परिवार या मतिमंद मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या उमेद परिवार परिषद २०१४ च्या अंकात प्रथम प्रसिद्ध करण्यात आला आहे. वेबसाईटवर प्रकाशित करताना काही संदर्भ अपडेट करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.