Uncle, आप ने कब decide किया की आपको “Gay” नही बनना है?

” बेटा, तुमने कब decide किया की तुम्हे गे बनना है?,

“Uncle, आप ने कब decide किया की आपको गे नही बनना है?”

“उस्मे decide क्या करना है भाई, पैदा हूये तबसे ऐसे ही हैं!!”

आणि त्या नंतर त्या “uncle” च्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात!! कुठेतरी त्यांना चित्रपटाचा नायक विचार करायला भाग पाडतो की आपण दोघेही तितकेच “नॉर्मल” आहोत..  ही आणि अशी बरीचशी वाक्य, काही संभाषणं समलिंगी संबंधांवर सहजपणे भाष्य करणारी आहेत आणि अर्थात विचार करायला लावणारी ही!!

समलिंगी संबंध हा विषय बॉलिवूडसाठी काही नवीन नाही. काही चित्रपटात समलिंगी संबंधांच भांडवल करत बऱ्याचदा त्याची खिल्लीच उडवली आहे, काहींनी हा विषय कथेचा एक अंश म्हणून वावरताना दाखवली आणि त्यात वावगं, वेगळं असं काहीच नाही हेच सांगण्याचा कायम प्रयत्न केला आहे. काही चित्रपट आहेत जे ह्याच विषयाला धरून बनवलेली आहेत जसे My brother Nikhil, Fire, Aligarh, Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga, Margarita With A Straw, Kapoor & Sons  इत्यादी. पण त्यातून समलैंगिकतेची संकल्पना इतक्या परखड आणि स्पष्टपणं मांडली आहे की ते लोकांना पचवणं जड गेलं. त्यातल्या त्यात असे चित्रपट एका विशिष्ट वर्गातील प्रेक्षकांपर्यंत पोहचतात, त्या पलीकडे नाही. त्यामुळे लोकांपर्यंत हा विषय पोहचण्याच उद्दिष्ट किती साध्य होतं ही एक शंकाच आहे.

शुभ मंगल ज्यादा सावधान थोडा पुढचा टप्पा गाठतो आणि दिग्दर्शक इथं हे दाखवायचा प्रयत्न करतोय की एक मुलगा आणि मुलगी जसं प्रेम करतात तसंच दोन मुलगे एकमेकांवर करू शकतात, एकत्र राहू शकतात, समाजाला उघडपणे तोंड देऊ शकतात!!

दोन मुलं (आयुष्मान खुराणा, जितेंद्र कुमार) एकमेकांवर प्रेम करतात, जितेंद्र कुमार च्या वडिलांना (गजराज राव) ते कळतं आणि वेगवेगळ्या नागमोडी वळणावरून कथा पुढं सरकत जाते. घरातील सदस्यांना कसा धक्का बसतो, त्यांची प्रतिक्रिया काय असते, हे दोघं कशा पद्धतीनं त्यांना समजावून सांगतात की, आमचं नातं इतर नात्यांप्रमाणेच नॉर्मल आहे, आम्ही काही चुकीचं करत नाही आहोत, आम्हाला कुठलाही “आजार” नाही, किंवा दुसऱ्या कल्चरची लागण नाही!!

काही ठिकाणी पटकथेची energy drop झाल्यासारखी वाटते. पण तरीही आयुष्मान खुराणा आणि एकूणच सहकलाकरांच्या जबरदस्त टीम नी सांभाळून घेतलं आहे. आई वडिलांच्या भूमिकेत नीना गुप्ता, गजराज राव, काका काकुच्या भूमिकेतील मनु रिशी, सुनीता रजवर आणि त्यांच्या मुलीच्या भूमिकेत असलेली मानवी गागरू ह्यांनी अख्खा चित्रपट उचलून धरला आहे!! अतिशय सुंदर अभिनय आणि सहज संवाद फेक!! ह्या सगळ्यात जितेंद्र कुमार प्रमुख भूमिकेत असूनही कुठंतरी कमी पडतो आणि त्यामुळे दोघांची जी काही केमिस्ट्री दिसली पाहिजे ती कुठंतरी मिसिंग वाटते! पण दिग्दर्शकाला जे काही सांगायचं आहे ते पोचल्यावाचून राहत नाही. ही कथा कलम ३७७ हटवण्यापूर्वीची आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागतो आणि सगळे कसे खुश होतात, त्यांना पकडायला आलेले पोलिस निकाल ऐकुन कसे परत निघून जातात, वगैरे दाखवलं आहे ज्याची खरंच आवश्यकता होती का? असाही प्रश्न पडतो.

अजूनही समाजाला समलिंगी संबंध म्हणजे काहीतरी चुकीचं, कुठला तरी आजार, जो ट्रीटमेंट नी बरा होऊ शकतो, पाश्चिमात्य देशातून भारतात आलेलं फॅड असं वाटतं. ह्यात फक्त छोट्या गावातली, खेड्यापाड्यातीलच लोकं आहेत असं नाही तर काही शहरातील स्वतःला सुशिक्षित, मॉडर्न म्हणवणारी पण मंडळी आहेतच!! हा चित्रपट बघून निदान ते थोडाफार विचार करायला लागतील, समलिंगी संबंध सुद्धा असू शकतात, जे अतिशय नॉर्मल आहेत. तो कुठलाही आजार नाही हे मान्य करायला सुरु करतील!

चित्रपटात शेवटी गजराज राव चा एक डायलॉग आहे,”बेटा, ये क्या है हमे समझ नहीं आता, पर हम तुम्हे रोकेंगे नहीं”. एकच ओळ पण खूप काही सांगून जाणारी आहे! त्यांच्या पारंपरिक विचारसरणीला छेद देत मुलाची लैंगिकता स्वीकारावी लागणार आहे, पण मनात असंख्य प्रश्न आहेत, हे असं का? आपलाच मुलगा असा का आहे, चारचौघांसारखा का नाही? समाज काय म्हणेल? नातेवाईकांना कसं तोंड द्यायचं? पुढे ह्यांचं भविष्य काय? प्रश्न तर आहेत पण उत्तरं पण शोधावी लागणार आहेत हे त्यांनी मान्य करायला सुरुवात केली आहे. प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडताना हा विचार पुढं घेऊन जाणार ह्याची खात्री वाटते इथे. म्हणजे एका नव्या प्रवासाची सुरुवात करायची आहे, जिथं नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. त्या मान्य करायच्या आहेत, स्वतःमध्ये बदल घडवून आणायचे आहेत. स्वतःची विचार करण्याची क्षमता रूंदवायची आहे.

पण हा रातोरात घडणारा बदल नक्कीच नसणार आहे. ह्याला वेळ लागणार अर्थात, पण सगळं वेळेवर सोडून देऊन ही चालणार नाही. जास्तीत जास्त जनजागरूकता महत्त्वाची आहे.  चित्रपट, लेख, पुस्तकं, मोठ्या प्रमाणात ह्या विषयावर खुल्या चर्चा होणं ही! यात विविध माध्यमं चांगली भूमिका निभावू शकतात.

एकंदरीतच LGBTQIA+ community ला दिली जाणारी वागणूक बदलणं गरजेचं आहे. ह्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनच भयंकर आहे. एखादा न बरा होणारा आजार झालेली व्यक्ती, मानसिक रुग्ण, काहीतरी विचित्र, घाण, तुच्छ असे काहीतरी आपल्या समोर आलं आहे असे बऱ्याच जणांना वाटते. मग त्यांना अपमानास्पद वागणूक देणं, सामाजिक वर्तुळातून बाहेर काढणं असले प्रकार होताना दिसतात. बरं, आपल्याला हे अधिकार दिलेत कुणी? असो… परंपरागत, पिढ्यानपिढ्या जे चालत आलं आहे तेच बरोबर आणि त्या विरुद्ध किंवा त्या पेक्षा वेगळं काही होणं म्हणजे ते चूक असं काहीही नाही. अन अनैसर्गिक तर मुळीच नाही! जर निसर्गानच त्यांना तसं बनवलं आहे तर त्यात कुणाचा कसला आलाय दोष? आणि ह्याचं खापर पाश्चात्य संस्कृती वर फोडून तर अजिबातच मोकळं होऊ नये!! ज्यांनी इतिहासाचा खरा अभ्यास केलाय किंवा नुसती देवदत्त पटनायक सारख्या इतिहासकारांची पुस्तकं जर वाचली असतील तर त्यात समलैंगिकतेचे दाखले सापडतील.( त्यांचे “शिखंडी” हे पुस्तक जरूर वाचावे.)

एखाद्या मुलीला मुलगीच आवडू शकते, मुलाला दुसरा मुलगाच आवडू शकतो, Opposites does not always attract each other!!Same poles can also do! प्रत्येक व्यक्तीला जशी खाण्या पिण्याची, कपडे घालण्याची, कुठलं शिक्षण घ्यायचं ह्याची निवड करायचा अधिकार आहे, तर स्वतःची लैंगिकता ठरवण्याचा अधिकार का नाही?

समाज आपल्याला स्वीकारेल की नाही ह्या भीतीपोटी कित्येक जण आपली लैंगिकता वर्षानुवर्ष लपवून ठेवतात, कधी कधी तर सामाजिक मान्यता मिळवण्यासाठी लग्न पण करतात आणि त्यातून जी काही घुसमट होते ती फार वाईट असते. ह्याला कारणीभूत आपणच आहोत. समाज म्हणून जर आपण खुलेपणानं स्वीकारू शकलो तर असे कित्येक जॅक & जॉनी, लैला & शिरीन कोषातून बाहेर येऊ शकतील. अन तेव्हाच ताठ मानेने, स्वतःच्या लैंगिकतेची लाज न बाळगता मुक्तपणे श्वास घेऊ शकतील.

एखादी मुलगी लेस्बिअन आहे किंवा एखादा मुलगा गे आहे हे ऐकल्यावर ज्या दिवशी कुणाच्या भुवया उंचावणार नाहीत त्या दिवशी खरा बदल घडला अस म्हणायला हरकत नाही.

– प्राची शिवपुजे-माने

prachishivpuje@gmail.com

—————

चित्र साभार : https://twitter.com/smzsofficial

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

2 Responses

  1. Swapnil says:

    समाज बदल होतोय पण अजून यावर खूप काम करायला लागेल सर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap