सुरुवात स्वतःपासूनच करायला पाहिजे !!!

0 527

केरळच्या शबरीमाला येथील आयप्पा मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास अनुमती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे महिला हक्क कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मात्र  हा निकाल सर्वसामान्य लोक मनापासून स्वीकारतील का?  याविषयी शंकाही उपस्थित केली होती. खरंतर मंदिरात जाऊन दर्शन घेणे हा महिलांना मिळालेला घटनात्मक अधिकार आहे. पण पुरुषांच्या तुलनेत महिलांना कायमच दुय्यम वागणूक देण्यात येते. शबरीमाला मंदिरातही तेच सुरू आहे. केवळ लिंगभेदाच्या मुद्यावरून महिलांना मंदिरप्रवेश नाकारणे हा अन्याय होता व तो शबरीमाला प्रकरणीच्या निकालामुळे दूर झाला.

मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील अगदी नैसर्गिक प्रक्रिया असूनही पाळीच्या काळात बाईला अपवित्र का बरं मानलं जातं? आजदेखील किती तरी मुली आणि बायकांना पाळीच्या काळात बंधनं सहन करावी लागतात. स्वयंपाक करायचा नाही, देवळात जायचं नाही, देवपूजा करायची नाही, तुळशीला पाणी घालायचं नाही, लोणच्याला हात लावायचा नाही, पापड करायचे नाही असे एक ना अनेक भेदभाव आहेतच. सर्वच जाती-धर्मामध्ये काही ना काही प्रमाणात ही बंधनं घातलेलीच आहेत. त्यात गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित असा फारसा फरक दिसत नाही.

हाच मासिक पाळीचा संदर्भ महिलांच्या मंदीर प्रवेशाशी जोडला गेलेला आहे. “जोपर्यंत स्त्रिया ‘शुद्ध’ आहेत का नाही हे सांगणारं मशीन शोधलं जात नाही तोपर्यंत स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही”, असं विधान शबरीमाला देवस्थानाचे प्रमूख गोपालकृष्णन यांनी पूर्वीच केलं होतं, अन आजही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही काही लोकांची मानसिकता बदलली आहे असं दिसत नाही. महिलांनी मंदिरप्रवेश करु नये म्हणून मंदिर कमिटी, राजकीय पक्ष तसेच काही संघटना प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. या कारणासाठी आंदोलनांपासून ते दंगे घडवण्यापर्यंत ब-याच बाबी घडलेल्या आपण पाहिलं आहे.

आपण आपल्या वेबसाईटच्या वाचकांना या मुद्द्याबाबत काय वाटतं हे पाहण्यासाठी एक पोल ठेवला होता. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नको अशा हट्टामुळे आपण समाज म्हणून मागे जात आहोत का?

आपल्या वाचकांमध्ये एकूण 1,052 लोकांनी आपली मते नोंदवली. त्यामध्ये 359 सहमत होते, 617 असहमत होते, तर 76 लोकांनी यावर भाष्य करणं टाळलं.

वरील आकडेवारी पाहता अजूनही मासिक पाळीबद्दलच्या, पाळीला विटाळ समजण्याच्या विचारांची पाळंमुळं आपल्या समाजात किती घट्ट आहेत हे दिसून येतं आहे. आजही आपण अशा अशास्त्रीय विचारांना चिकटून राहत असू तर आपण प्रगतीच्या दिशेने नाही तर अधोगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे मात्र नक्की! अर्थात ही वाटचाल प्रगतीच्या दिशेने होण्यासाठी आपण स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे.

तुम्हाला हा लेख वाचून काय वाटलं खाली कमेंटस मध्ये नक्की लिहा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.