‘स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर’ – चोखेर बाली (2015)

0 138

‘स्टोरीज बाय रवींद्रनाथ टागोर’ – चोखेर बाली (2015)

दिग्दर्शक: अनुराग बसू

मूळ लेखक: रवींद्रनाथ टागोर

भाषा: हिंदी, अवधी: प्रत्येकी एक तासाचे तीन भाग

प्रसारणकर्ता: एपिक चॅनल

‘एपिक’ ह्या नव्या दमाच्या, दर्जेदार मालिका प्रस्तुत करण्यासाठी ख्याती पावत असलेल्या वाहिनीवर काही आठवड्यांपासून रवींद्रनाथांच्या कथा-कादंबऱ्यांवर आधारित मालिका सुरु झाली आहे. ‘चोखेर बाली’ हे त्या मालिकेतील पहिलं पुष्प (पहिली कथा).

‘चोखेर बाली’ (अर्थ: eyesore, डोळ्यात खुपणारी, टोचणारी गोष्ट) ही टागोरांची लघुकादंबरी आपल्याला ब्रिटीशकालीन भारतातील बंगाली जीवनाचे, तत्कालीन विधवा परित्यक्तांच्या जीवनाचे, माणसा-माणसांतील भावनिक, प्रणयिक (romance-related) संघर्षाचे कितीतरी कंगोरे दाखवते. कादंबरीचा पसारा प्रचंड नसला तरी कथा फार वळणावळणाची आहे. दिग्दर्शक अनुराग बसूने ती टीव्हीकरता नव्याने साकारताना मूळ कथासूत्रात कित्येक फेरफार, काटछाट केले आहेत आणि व्यतींच्या भावनिक, आंतरिक, प्रणयिक व परस्परसंबंधांतील गुंतागुंतीवर आपलं सर्व लक्ष केंद्रित केलं आहे. बसूची ही ‘चोखेर बाली’, जणू पुरातन शिल्पातून नव्या तंत्राने, नव्या माध्यमात साकारलेलं हे कोरीव शिल्प स्वयंपूर्ण, स्वंतंत्ररित्या सुंदर आहे असं मला वाटतं. तेव्हा आपण व्यर्थ तुलना न करता टागोरांची मूळ कृती बाजूला ठेवलेलं चांगलं.

कथेचा काही भाग इथे समजावून द्यायला हवा:

श्रीमंती थाटात वाढलेला महेंद्र विनासायास चालून आलेलं सुशिक्षित, कलाकौशल्यनिपुण ‘विनोदिनी’चं स्थळ (मुलगी न बघता) “मला लग्न करायचंच नाही” म्हणून नाकारतो. त्याचा घनिष्ट मित्र बिहारीसुद्धा “महेंद्र जे जे नाकारेल ते माझ्या ताटात वाढायचं हा कुठला न्याय!” या भावनेतून विनोदिनीचं स्थळ (न बघताच) नाकारतो. मात्र नंतर बिहारीसाठी सांगून आलेलं स्थळ ‘आशालता’ महेंद्रला आवडते, बिहारीच्या भावनांचा विचार न करता तो लगोलग तिच्याशी लग्न करण्याचा इरादा पक्का करून मोकळा होतो.

महेंद्र-आशालता वैवाहिक गोडीगुलाबी, कामसुखात आकंठ बुडून जातात. इतक्यात मुलावर रुसून आपल्या जन्मगावी गेलेली महेंद्रची आई परत येते. सोबत विनोदिनी असते. आतापावेतो लग्न होऊन नवरा अकाली मरण पावल्याने ती तारुण्यातच विधवा झालेली असते. घरात पाऊल टाकताच साऱ्यांच्या डोळ्यात भरलेली – महेंद्रच्या आईला सुनेहून लाडकी वाटणारी; आशालताशी मस्त गट्टी जमवणारी; महेंद्र आणि बिहारीला मोहून टाकणारी – ही विनोदिनी शेवटी साऱ्यांच्याच आयुष्यातलं बोचरं कुसळ, ‘चोखेर बाली’ का ठरते?

‘चोखेर बाली’तील भावकल्लोळ हृदयस्पर्शी असले तरी गमतीशीर वाटतात.

…’हा न भेटताच आपल्या नावावर काट मारून गेलेला माणूस आहे तरी कसा?’ हे फणकारामिश्रित कुतूहल मनात घेऊन आलेली विनोदिनी. महेंद्रसारख्या उच्चशिक्षित, कलंदर माणसाने आपल्याला झिडकारून साधी गृहकर्तव्यंसुद्धा न जमणाऱ्या भोळ्या पोरीशी सुखाचा संसार थाटावा हे पाहून ईर्ष्येने पोळलेली, परंतु त्याचवेळी आशालताचा भोळेपणा आवडल्याने तिच्याशी मैत्री करणारी विनोदिनी.

महेंद्रच्या मनाचा दुबळेपणा, दुसऱ्यांची पर्वा न करता आपलंच घोडं दामटण्याची वृत्ती, त्याचं अशालताला वाऱ्यावर   सोडून अचानक आपल्याभोवती मांजरासारखं  घुटमळू लागणं बघून धुसफुसणारी विनोदिनी.

सद्गुणी बिहारीबाबूच्या नजरेतून आपण उतरू नये म्हणून मनोमन तळमळणारी विनोदिनी.

पुढे बऱ्याच वर्षांच्या निःशब्दतेनंतर बिहारीला भेटल्यावर, समज-गैरसमजांची जळमटं दूर झाल्यावर ‘आपल्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल नेहमीच प्रेम होतं’ या जाणीवेने सुखावलेली विनोदिनी. पण तरीही ‘माझ्या नादी लागून ह्या भल्या माणसाचं आयुष्य फिसकटू नये’ म्हणून तडकाफडकी निघून जाणारी विनोदिनी. आपल्या अशा निघून जाण्याने बिहारीच्या मनाला मूक यातना देणारी विनोदिनी.

यात गमतीचा भाग असा की एक विचित्र गुंतागुंत साऱ्यांनाच वेढत चाललीय हे समजूनही “..पण मग या व्यक्तींनी, या पात्रांनी प्राप्त परिस्थितीत याहून वेगळं करावं तरी काय?” हे कोडं सुटत नाही. ते त्या व्यक्ती/पात्रांनाही सुटत नाही. या पातळीवर पात्रांच्या मनोवस्थेशी आपण समरस होतो. काचेच्या चेंडूत पाण्याबरोबर खालीवर होणारी चमचम पाहत राहावं त्याप्रमाणे जे घडतंय ते शांतपणे बघत राहतो.

टागोरांना ह्या कादंबरीतून समाजाला काही बोधपर संदेश द्यायचा होता का, व असल्यास तो कोणता ते मला माहित नाही. अनुराग बसूने तिचा केलेला दृकश्राव्य ‘अनुवाद’ बघून मनात घोंगावणारे प्रश्न खालीलप्रमाणे:

विवाह, वैधव्य इत्यादी समाजाकडून लादण्यात आलेल्या रुढींमुळे, भोवती आखल्या गेलेल्या मर्यादांच्या वर्तुळांमुळे, बाह्य बंधनांमुळे व्यक्तीचं मन कुणाकडे आकर्षित व्हायचं थांबतं का? प्रेम आणि आकर्षणात अंतर असतं तरी किती? लग्न करून आपल्यातील संबंध जाहीर करणं चांगलं आणि लग्न न करता संबंध ठेवणं वाईट? आणि कुणी ठरवायचं हे सगळं? आपलं वागणं, आपले हेतू, कामना, वासना, खोलवर सलणारी आपली दुःखं, जसं की विनोदिनीच्या मनातील एकाकीपणाची वेदना – सगळं आपल्याला तरी नक्की किती समजत असतं? मग दुसऱ्याच्या जगण्याचा निवाडा करणारे आपण कोण? काय अधिकार आहे आपल्याला?

…हे आपलंच आपल्याला न समजणं व त्यामुळे अपरिहार्यपणे दुसऱ्यांनाही न उलगडणं म्हणजेच का ‘चोखेर बाली’?

– मुक्ता मंदार

Leave A Reply

Your email address will not be published.