‘व्हॅलेंटाइन डे’ च्या निमित्ताने… अरुंधती गडाळे

0 494

आपण मागील वर्षात काय झालं, काय केलं याचा लेखाजोखा स्वत:साठी घेत असतो. तसेच मागील वर्ष हे प्रेम करणाऱ्याच्या बाबतीत कसे होते याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात आली की, प्रेमी जीवांसाठी तसा कोणताच काळ भारतात चांगला नाही याची जाणीव झाली. मी कदाचित खूप निगेटिव्ह वाटत असेल, पण जोपर्यंत आपण वाईटाकडे बघत नाही, तोपर्यंत त्याच्यात सुधारणा होणार कशी ?

मला २०१७ च्या दोन घटनांचा उल्लेख करायचा आहे. भारताच्या दक्षिणेतील एक आणि उत्तरेतील एक घटना. आता पहिली घटना काय आहे ते पाहू. वैदकीय शिक्षण घेणारी एक मुलगी स्व:खुशीने धर्मांतर करून मुस्लीम मुलाशी विवाह करते. अर्थात, मुलीच्या घरच्यांचा या विवाहाला विरोध आहे. मे २०१७ मध्ये पूर्वीचे नाव अखिला आणि आताची हदिया हिचे जबरदस्तीने धर्मांतर करून विवाह केल्याचा आरोप तिचे वडील करतात व केरळ उच्च न्यायलयात दाद मागतात. हे सगळं “प्रेमा”चं प्रकरण सामाजिक माध्यमातून आणि न्यायालयातून ‘लव-जिहाद’चं प्रकरण म्हणून पुढे येताना दिसतं. त्याच्या चर्चा आणि विरोध दोन्ही बघायला मिळतात. हदियाच्या वडिलांच्या याचिकेवर केरळ हायकोर्टाने निकाल दिला आणि हदियाच्या झालेल्या विवाहाची मान्यता रद्द केली आणि तिला तिच्या वडिलांच्या नजरकैदीत म्हणजेच घरात बंद केले. हदियाला तिच्या वडिलांच्या परवानगी शिवाय बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची अनुमती नव्हती. या निकालच्या विरोधात हदियाचा नवऱ्याने दाद मागितली आणि ‘हे ‘लव-जिहाद’चं प्रकरण नाही तर हदियाने स्व:खुशीने माझ्याशी विवाह केला आहे’ असे सांगितले. इथुन पुढे ही केस संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेत आहे आणि आता ही केस सुप्रीम कोर्टात चालू आहे. हदिया वारंवार सांगते आहे की, मी माझ्या इच्छेने मुस्लीम धर्म स्वीकारला आहे आणि मला माझ्या नवऱ्याबरोबर राहायचे आहे. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, हदिया एक २५ वर्षाची सज्ञान तरुणी आहे. या घटनेमध्ये हिंदू जागृतीचा सहभाग माझ्या सारख्या तरुणांमध्ये धडकी भरवणारा होता.

दुसरी घटना आहे उत्तरप्रदेश राज्यातील. उत्तरप्रदेश हे भारतातलं भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मोठं राज्य असलेल्या राज्यात स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली अॅन्टी रोमियो स्काँड सुरु करण्यात आले आहेत. पण त्यांची कामगिरी पाहता रोगांपेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती आहे.

मग, प्रेमीयुगल दिसले तरी त्यांच्यातला ‘संस्कृतीरक्षक’ भयानक पद्धतीने जागे होत होते. म्हणजे साधारण मार्च २०१७ मध्ये हा उपक्रम उत्तरप्रदेशच्या सरकारने हातात घेतला आणि तिथल्या सार्वजनिक उद्यानात एकमेकांचा सहवास मिळावा म्हणून येणाऱ्या जोडप्यांची संख्या ३०० ते ४०० वरून थेट १० ते ५ वर आली, असे उद्यानातील तिकीट विक्री करणाऱ्या व्यक्तींचे म्हणणे होते, या सर्व गोष्टी त्यावेळी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये तसेच वृत्तवाहिन्यावरून दाखवल्या गेल्या. म्हणजे टग्गेगिरी करणाऱ्यांना शहाणे करायचे सोडून हे तरुण जोडप्यांना टार्गेट करत होते. त्यांच्या भीतीने प्रेमीजीव अपराध्यांसारखे भूमिगत झाले! या सगळ्यांमधून उत्तरप्रदेशच्या सरकारला काय साधायचे होते?  ‘रोमियो’ची व्याख्या कशी करणार आणि कोणाला कसे पकडणार आणि हे स्काँड त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर तरुणांना धमकावण्यासाठी करणार नाही हे कोण ठरवणार…

वरील दोन्ही घटना २०१७ च्या प्रेमाच्या भावनेवर सांस्कृतिक बाण चालवणाऱ्या आहेत. संस्कृतीरक्षकांना आपल्याला वेळोवेळी न घाबरतात, डोळ्यात डोळे घालून सांगायची गरज आहे की,  ‘प्रेम आमच्या हक्काचं’!  कोणत्या व्यक्तीबरोबर सार्वजनिक ठिकाणी चार क्षण घालवण्याचा अधिकार आम्हांला आहे आणि अश्लीलता तुमच्या डोक्यात आहे.

या सगळ्याबरोबर, तरुणांनी देखील सार्वजनिक ठिकाणी आपण काय करतो याचे भान जपले पाहिजे. जसे आपल्या स्वातंत्र्यावर गदा येऊ नये असे आपल्याला वाटते. तसेच कोणत्याही ‘सार्वजनिक’ ठिकाणी केलेल्या वर्तनामुळे आपल्याकडे कोणी बोट दाखवत कामा नये. याची काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे.

 

चित्र साभार : https://magoz.is/love/

 

You might also like More from author

Leave A Reply

Your email address will not be published.