Home / लिंगभावाची व्यवस्था / माजी नसबन्दी – ले. अमोल

माजी नसबन्दी – ले. अमोल

‘नसबन्दी’ नाव कसं काय पडलं काय म्हायत… पण आयकायला भारी वाट्तं.

तर…मी नसबन्दी किली ना, त्याच्या मागं लय मोठ्ठा इतिहास हे, म्हंजी बगा मी बारका असताना (वयानी बरं का!) माज्या एका बहिनीचं आपरीशन झाल व्हतं, अन ते बी ग्रामीन सरकारी इस्पितळात. बाळ बगायला गेलो तवा तिची अवस्था पाह्यली अन त्या दिसापासनं तिचं आपरीशन अन तिची झाल्याली दैना मनात घर करुन बसली ती कायमचीच.

जसं मोठा झालो तसं हे नसबन्दी प्रकरण कळंल अन भारी वाटलं. पुढच्या काळात लगीन झालं अन नऊ महिनं बाळ पोटात असताना(बायकोच्या बरं का!), बायकुला काय काय भोगावं लागतं हे लय जवळनं पाह्यलं. अन त्यात कहर म्हंजी, बाळ जन्मायच्या येळंला बायकुचं पोट फाडुनच आलं ना राव! (म्हंजी सीझर झालं) बायकुच्या पोटावरलं टाकं पाह्यलं अन त्याच दिवशी मनात ठरवलं, पोरं न व्हयाचं आपरीशन आपुनच करणार, परत बायकुचं पोट फाडायला लावयचं नाय.

अन तिच्या परवानगीनं एका पोरीवर मी माजं आपरेशन करुन घेतलं. माज्यापेक्शा त्या डाक्टरला  अन नर्सबायलाच जास्त टेन्शन. “एका पोरीवर आपरेशन करताय घरी मायती हाय का? आजुन इचार  करा” असं काय काय म्हनले. पन आपला इचार पक्का व्हता. आपरीशन झाल्याव मस्त चार पाच दिस फुल्ल आराम केला अन जायला लागलो कामाला. एवढं सोप्पं व्हतं राव हे.

खरी गम्मत तर पुडं हे, कायबी असुद्या पन बन्दी म्हनलं की भ्या वाटतंच. आदी ‘हा’ म्हनल्याली बायकु मंग मातर घाबारली ना. अन राहू राहू तिला हे टोचायला लागलं, की कायतरी प्राबलेम व्हनार म्हनुन. आख्खा एक हप्ता गेला ना राव ह्याच्यामन्दी, घरात फुल्ल टेन्शन, मला बी कळाना काय कराव ते. एक दिवस बसलो पुडं घीऊन बायकुला अन लय येळ समजावलं अन केलं एकदाचं प्रकरन शान्त.

घरात बायकुचं मिटलं, पन बाकिच्या मेम्बराना सांगनार कोन? अन कसं? याचंच जाम टेन्शन आल्यालं. एकदा बारक्या बहिनीला हळूच सांगुन टाकलं अन डेरिंग वाढल्यावर मोठ्या भावालाबी सांगीतलं. आता पाळी व्हती मायबापाला सांगायची, आन त्यांच्या शिव्या खायची. बरं ह्या शिव्या काय एकदा खाउन भागनार नवत्या, तर जलमभर खायला लागनार व्हत्या. आजुनपतुर सांगायची हिम्मत झाली नाय अन व्हनार पन नाय.

दोस्त लोकांना कळल्याव म्हनत्यात कसं, “आयला, तु काय येडा हे काय रं?”, “ संपलं लेका तुजं  सगळं आता!!”, “ तुजं डोस्कं जास्तच चालतं राव, जगाच्या आक्रित”. एक तर बोलला की, “आयला इथं पाच वर्स झाली ट्राय करतोय राव आम्हाला व्हयना अन तुम्हाला व्हत्यात तर तुमचं असं…” एका बहाद्दारनं तर मेसेज केला अन दिला अन बाकिच्यांना वाटसअपला टाकुन, लय शिव्या खाल्ल्या अन पोरांनी नावं पन ठिवली. पन आपुन ठाम व्हतो. आन आत्ताबी हाय. कुणी कायबी म्हनुदे,  मला माहित व्हतं, आपुन करतोय ते चांगलं हाये. अन आपुन एकटा नाय आपला एक दोस्त हाये अच्युत बोरगावकर, त्यानी बी असच केल्यालं. आपल्याला त्याच्यागत करायचंच हे डोक्यात फ़िट होतं. त्यानी दाखावल्याली ही वाट आपुन सोडायची नाय हे ठरवुनच ठिवल्यालं.

खरंतर किती साधं अन कायबी दुखापत न व्हता करता व्हनारं आपरेशन हाये हे,  जास्त दुखत नाय अन झटक्यात बरं पन व्हतं. ज्याचं (आपल्या सवताच्या) बायकुवर लय प्रेम हाये ते तिला सांगायची भारी सन्धी हे बरं का हे आपरेशन!!  अन गडयांनी  आपुन व्हवुन जर हे आपरेशन केलं तर बायकांची सुटका व्हईल ना एका आपरेशनातुन (तसं बी दर मयन्याला त्यांना कमी सहन कराय लागतं व्हय ? असो ) आन हे तुमच प्रेम बघुन बायकु डबल जीव लावील ते येगळंच.

खरं सांगु का, लय भारी फिलिंग येतं राव. तुमी बघा ट्राय करुन अन कसं वाटतंय आमाला बी सांगा बरं का…

 

About I सोच

I Soch encourages Pune youth to SPEAK OUT on equality, safety, diversity within the discussions of sexuality. It is a platform to learn, argue and clarify.

2 comments

  1. खूप छान लेख आहे… पुरुषांनी खरंच विचार करायला हवा…. तेवढचं स्त्रियांवरचं ओझं कमी होईल…..

    • खरं आहे साधना… पण नसबंदी बद्दलचे अनेक गैरसमज अजूनही लोकांमध्ये आहेत. ते दूर झाल्याशिवाय पुरुष याबद्दल विचार करतील असे वाटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.