कामजीवनाचे भाष्यकार डॉ. विठ्ठल प्रभू यांचे निधन

डॉ. प्रभू हे कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पेरेंटहूड (इंटरनॅशनल) या संस्थेचे ते मानद अध्यक्ष होते. फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सेक्स एज्युकेशन, कौन्सिलिंग, रिसर्च, थेरपी केंद्राचे ते मानद सल्लागारही होते.

0 693

कामजीवनाबद्दल समाजशिक्षण करणारे, अनेक समस्यांना थेट उत्तरे देऊन लोकांमध्ये जनजागृती करणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांचे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास शिवाजी पार्क येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. बुधवारी संध्याकाळी त्यांच्यावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. निरामय कामजीवन, यौवन ते विवाह ही त्यांची पुस्तके गाजली.

कामसमस्येसंदर्भात त्यांनी मराठीत साहित्यनिर्मिती करून समाजातील न विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. लैंगिकता, शिक्षण, आरोग्य या विषयांवर त्यांनी सुमारे ३५ पुस्तके लिहिली. त्यांच्या तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. त्याव्यतिरिक्त त्यांनी दोन ललित पुस्तके लिहिली. स्नेहबंध आणि गोष्ट एका डॉक्टरची ही दोन पुस्तके त्यांच्या साहित्यनिर्मितीचा महत्त्वाचा हिस्सा आहेत. स्नेहबंध हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक असून यात पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी अशा दिग्गजांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. ‘गोष्ट एका डॉक्टरची’ हे त्यांचे आत्मचरित्र असून त्यामध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचा आपला प्रवास रेखाटला आहे.

डॉ. प्रभू यांनी लिहिलेली कामजीवनावरील पुस्तके ही आधीच्या कामजीवनावरील पुस्तकांच्या तुलनेत उत्कृष्ट गणले गेले. निरामय कामजीवन या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८२ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर सध्या बाजारात ३४वी आवृत्ती आहे.  अत्यंत सोप्या शब्दांत, शास्त्रोक्त मांडणीद्वारे त्यांनी लैंगिक शिक्षण जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. या माध्यमातून त्यांनी समुपदेशनाचे कामही केले.

निरामय कामजीवन, उमलत्या कळ्यांचे प्रश्न, प्रश्नोत्तरी कामजीवन, तारुण्याच्या उंबरठ्यावर, माझं बाळ, विवाहेच्छू आणि नवविवाहितांसाठी विवाह मार्गदर्शन, प्राथमिक उपचार, लैंगिकता शिक्षण, यौवन विवाह आणि कामजीवन, आरोग्य दक्षता अशी त्यांची पुस्तके गाजली.

लैंगिकता या विषयासाठी जन्मभर कार्य केलेल्या या महान अवलियास  आपल्या वेबसाईटकडून भावपूर्ण श्रद्धांजली !!!!

 

आपल्या वेबसाईटवर त्यांचे असलेले साहित्य.

चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १

चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक २

 

बातमीचा स्त्रोत: https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/dr-vitthal-prabhu-is-passed-away/articleshow/68195190.cms

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.