गृहिणीला घरकामाचा आर्थिक मोबदला ???_प्राजक्ता धुमाळ

2 887

प्रत्येक गृहिणीला तिच्या घरकामाचा आर्थिक मोबदला मिळालाच पाहिजे. हे विधान, हा एक विचार आपण वेबसाईटवरील ऑक्टोबर-नोव्हेंबर या पोलद्वारे व्यक्तींची मतं जाणून घेण्यासाठी खुला केलेला होता. महिनाभरात या विधानावर एकूण २२८ व्यक्तींनी आपलं मत दिलेलं आहे. यापैकी १४५ (६४%) व्यक्ती ‘प्रत्येक गृहिणीला तिच्या घरकामाचा आर्थिक मोबदला मिळालाच पाहिजे’, या विधानाशी म्हणजेच या विचाराशी सहमत आहेत. दुसऱ्या बाजूला १४५ मतांच्या तुलनेत जवळपास निम्म्या म्हणजे ७० (३१%) व्यक्ती वरील विधानाशी असहमत आहेत. ठाम मत नसलेल्या म्हणजे सांगता येत नाही  अशा १३ (६%) व्यक्ती आहेत.

पुरुषांची कामे आणि स्त्रियांची कामे अशी कामांविषयीची चौकट आपल्या समाजात वर्षानुवर्षांपासून आखली गेली आहे, हे आपण सगळे जाणून आहोत. घरात आई काय कामं करते आणि घरात बाबा काय कामं करतो, हे चार-पाच वर्षाचं मूलदेखील सांगू शकतं, इतकी स्पष्ट आखणी अजूनही अनेक ठिकाणी दिसते. आता चित्र बदललंय असं अनेकजण म्हणतात. पण ते कुठं आणि कसं बदललंय हे समजून घ्यायला हवं. स्त्रियांनी घराचे उंबरठे ओलांडून विविध क्षेत्रांत करियर, नोकरी, अर्थार्जन करायला सुरुवात केली. तसं पुरुषांनीही हॉलचा उंबरठा ओलांडून स्वयंपाकघरात प्रवेश केला का? तर हो, असं काहीजण म्हणतील. विशेषतः हे चित्र शहरातलं आहे. कारण ‘करावंच लागतं’, ‘त्याशिवाय पर्यायच नसतो’, अशी उत्तरं स्त्री-पुरुषांकडून मिळतात. म्हणजे दोघांच्याही मनात पक्कं आहे की स्वयंपाक किंवा घरातील इतर कामं हे पुरुषाचं काम नाहीच. पण आता दोघंही कमावत असल्यामुळे घरातील काही कामं नाईलाजानं, पर्यायच नाही म्हणून करावी लागतात, घरकाम ही दोघांचीही जबाबदारी आहे; हा विचार मात्र अजूनही मूळ धरत नाहीये. एखाद्या विवाहित पुरुषाला विचारलं, ‘तुमच्या मिसेस काय करतात?’ – “ती घरीच असते.” एखाद्या घर सांभाळणाऱ्या (हाउसवाईफ) स्त्रीला विचारलं, ‘तुम्ही काय करता?’ – “काही नाही, मी घरीच असते.” अशा उत्तरांतून असं लक्षात येतं की, घरकामाला आवश्यक ते महत्व दिलं जात नाहीये. त्यामुळे आवश्यक असणारा आदर घरकामाला आणि स्त्रियांना दिला जात नाहीये, असं दिसतं.

एकूणच भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत अनेक वर्षांपासून स्त्रियांचं स्थान दुय्यम राहिलेलं आहे. ‘चूल आणि मूल’ सांभाळणं ही मुख्यतः स्त्रियांची जबाबदारी आहे हे वर्षानुवर्षांपासून गृहीत धरलेलं आहे, ठसवलं गेलं आहे. मागील काही दशकांपासून स्त्रिया विविध क्षेत्रांत नोकरी करू लागल्या आहेत, कर्तुत्वाचा ठसा उमटवू लागल्या आहेत, पण त्याबरोबरच चूल, मूल आणि नोकरी असा तिहेरी बोजाही पडलेला आहे. अशा वेळी घरातील पुरुषांनी घरातील काही कामाचा वाटा उचलला तर तो त्या स्त्रीला घरकामात केलेली ‘मदत’ असते. ‘मी करतो बायकोला स्वयंपाकात मदत’, ‘मी आईला पण घरकामात मदत करतो’, ‘हो, आमचे हे हलकी-फुलकी कामं तरी करतात बाई’, अशी वाक्यं अनकेदा ऐकायला मिळतात. असा अभिमानाचा तुरा अनेकदा अनावश्यक बाळगला जातो, असं वाटतं. पण अशी मदत करणंही कमीपणाचं आहे, असं मानणारेही संख्येने कमी नाहीत. लिहिता-लिहिता आमच्या घरातलाच एक प्रसंग आठवला. एकदा अशीच आमच्या घरात लग्नांची चर्चा सुरु असताना लहानपणापासून छोट्या शहरात वाढलेल्या माझ्या चुलत भावाला मी विचारलं, “तू करतोस का रे स्वयंपाकघरात काही काम?” त्याचं उत्तर – “हो करतो ना, आईला विचार.” माझा पुढचा प्रश्न – “लग्न झाल्यावर पण करशील ही कामं?” त्याचं उत्तर – “हो. ती जर नोकरी करणारी असेल तर करेन. पण खरं तर नोकरी करणारी नकोच आहे. घरी असेल तर घरच्यांचं सगळं नीट-नेटकं पाहिलं जाईल. पण बाकी सगळं जुळत असेल आणि तिला नोकरी करायचीच असेल तर तेवढ्यासाठी कशाला अडून राहायचं?” पुन्हा माझा पुढचा प्रश्न – “घरातली काय कामं करशील तू?” तो – “मदत करेन तिला.” मग मी म्हटलं, समजा एक दिवस ती तुला म्हणाली की, तू आज स्वयंपाक कर, मी तुला मदत करेन तर? यावर तो – “नाही, मी मदतच करेन, संपूर्ण स्वयंपाक मात्र तिलाच करावा लागेल.” म्हणजे काय तर कधी बायको नोकरी करते म्हणून, तर कधी घरात कुणी ‘बाईमाणूस’च नाही म्हणून, घरात ‘बहिणी’चा अभाव आहे म्हणून, कधी ‘घरातली ‘बाई’ आजारी पडली म्हणून, कधी कामवाली बाई आलीच नाही म्हणून म्हणजे पुरुषांनी  घरकामाला हात लावणं, ‘विशिष्ट परिस्थितीतच लागू’ (conditionally applicable) असा जणू अलिखित करारच असतो.

ग्रामीण भागातील स्त्रियांच्या आयुष्याकडे पाहिलं तर चूल, मूल आणि शेती असा तिहेरी बोजा तिथेही आहे. शहरातील पुरुषांच्या तुलनेने स्वयंपाकघरातील कामांना गावातील पुरुषांचा हात तितकासा लागलेला नाही. अर्थात ‘शहरात असं आणि गावात तसं’ अशी काटेकोर विभागणी नक्कीच नाही. खंत वाटणारी बाब म्हणजे स्त्रिया घरात जी कामे करतात, त्याकडे कमी दर्जाची कामं अशा दृष्टीने पाहिलं जातं. समाजात स्त्रीला दुय्यम समजणं आणि तिच्यावर ठराविक कामं लादून त्या कामांनाही दुय्यम समजणं असं समीकरण झालेलं दिसतं. स्वयंपाक करणं, कपडे धुणं, भांडी घासणं, घराची साफसफाई करणं; अशी अनेक कामं स्त्रिया रोजच्या रोज करत असतात.  या कामांमध्येच इतर अनेक कामांची लांबलचक यादी असते. दैनंदिन कराव्या लागणाऱ्या या कामांमध्ये काहीही ‘इंटरेस्टिंग’ नसतं, ना त्यातून त्यांच्यासाठी आत्मविकासाची संधी निर्माण होणार असते. उलट ते रोजच्या रोज करून अधिक कंटाळवाणं वाटतं. तरीही स्त्रिया ते पुढं रेटत राहतात. अनेकदा या कामांची हलकीशी तक्रारदेखील स्वतःच्याच कुटुंबात केली जात नाही याचं आश्चर्य नाही, तर याची ‘खंत’ आपल्या सगळ्यांना वाटायला पाहिजे. तिलाही या रोजच्याच कामांचा कंटाळा येत असेल असा विचारही आपल्या कित्येकांच्या मनाला स्पर्शदेखील केलेला नसतो. यासाठी घरातील स्त्रियांची विचारपूस करणं तर अपवादात्मकच!

महत्वाचा मुद्दा म्हणजे, महिला जी कामं घरासाठी करतात, तेच काम पुरुष व्यवसाय म्हणून करत असतात; उदा. हॉटेल्समध्ये जेवण बनवण्यापासून भांडी घासण्यापर्यंत विविध कामं पुरुषच करतात. तेव्हा त्यांना ही कामे करण्याचा कमीपणा वाटत नाही. हॉस्पिटल्स, कंपन्या, इतर सार्वजनिक ठिकाणी शौचालयं साफ करण्याचं कामही पुरुष करतात. कारण त्याचा त्यांना आर्थिक मोबदला मिळतो, पण तेच काम पुरुष घरात करत नाहीत. तिथं ते कमी दर्जाचं समजलं जातं. वास्तविक पाहता, घरातील बाईच्या फुकटच्या श्रमावरच कुटुंबियांच्या दैनंदिन आयुष्याचा सुरळीतपणे ‘गुजारा’ होत असतो. नोकरी करताना आपली ड्युटी साधारणपणे ८-८.३० तासांची असते. पण घरात स्त्रियांच्या कामाचं तसं काही ठरलेलं घड्याळ नसतं. अनेक स्त्रियांचा दिवस तर पहाटे सुरु झालेला असतो आणि रात्री उशिरा संपतो. केवळ ‘गृहिणी’ म्हणून भूमिका पार पाडणाऱ्या स्त्रिया घरासाठी खूप श्रम घेतात पण त्यांच्या श्रमाला काही ‘मोल’ नसतं. आठवड्यातून आपल्याला एक दिवस सुट्टी मिळावी हा आपला हक्क आहे आणि आपल्या या हक्काचं उल्लंघन होणार नाही याबद्दल आपण किती ‘जागरूक’ असतो ना? शिवाय सुट्टीच्या दिवशी उशिरा उठण्याचा आनंद घेतो. पण घरात सातत्याने राबणाऱ्या आईला, बायकोला, बहिणीला, वहिनीला… आठवड्याची सुट्टी तर सोडाच महिन्यातून दोन दिवस घर सोडून कुठे जायचं म्हटलं, तर घरात ‘सिरीयस’ चर्चा होते. शिवाय स्वतःचं आरोग्य, आहार, छंद, मनोरंजन, व्यक्तिमत्व विकास या बाबींवर काही खर्च करायचा म्हटलं तरी तेवढी आर्थिक क्षमता तिच्याकडे नसते आणि हे तिच्यासाठीही महत्वाचं आहे याची दखल कुटुंबाकडून घेतली जातेच असं नाही. एकूण काय, तर घरकामाप्रति, गृहिणींप्रति आदर निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचं ‘आर्थिक’ मोल मिळायला पाहिजे. प्रत्येक गृहिणीला तिच्या घरकामाचा आर्थिक मोबदला मिळालाच पाहिजे आणि तो गृहिणींसाठी तर असावाच पण नोकरी, शेती, छोटे-मोठे व्यवसाय करून घर सांभाळणाऱ्या सर्व स्त्रियांचा तो हक्क आहे.

पण हे वाचत असताना स्त्रियांना घरकामासाठी कुणी आणि किती मानधन द्यायचं? असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. वास्तविक पाहता, ही जबाबदारी घरातील सदस्यांची असली पाहिजे. जे सदस्य कमावते आहेत, त्यांनी त्यांच्या मिळकतीच्या काही टक्के रक्कम घरकामाची जबाबदारी पार पडणाऱ्या स्त्रीच्या (ती आई, बायको किंवा बहिण किंवा इतर कुणीही असेल) नावे तिच्या खात्यावर जमा करता येईल. कदाचित काही स्त्रियांनाही ही कल्पना आवडणार नाही. आपल्याच घरासाठी, मुलांसाठी आपण हे करतो आणि त्याचं मानधन घ्यायचं?, असा भावनिक विचार त्यांच्या मनात येऊ शकतो. पण आपल्यापैकी अनेकींना घरातील कुणासमोरही हात पसरायला आवडत नसतं, हेही खरं आहे. अशा वेळी पुरुष मित्रांना एक गोष्ट सुचवायला आवडेल की, जर  आपल्या घरातील स्त्रीच्या आर्थिक स्वातंत्र्याचा विचार तुम्ही करत असाल आणि वरील गोष्टी आपल्याला थोड्या-फार पटत असतील तर तुम्हीही तुमच्या घरातील किमान घरकामाची जबाबदारी पार पडणाऱ्या स्त्रियांचं ‘आर्थिक स्वातंत्र्य’ जपण्यासाठी काही चांगले पर्याय शोधू शकता. विचार करून बघा आणि काही प्रयत्न केलेच तर आम्हालाही लिहून पाठवू शकता.

यापुढे जाऊन असं म्हणायचं आहे की, घरकाम किंवा ‘चूल आणि मूल’ सांभाळणं ही स्त्री आणि पुरुष दोघांचीही जबाबदारी आहे, हा विचार स्वतःमध्ये रुजवणं आणि कृती आत्मसात करण्याच्या दिशेने पावलं उचलणं आवश्यक आहे. ‘स्त्री’ किंवा ‘पुरुष’ म्हणून कोणतंही काम आपण जन्मतः शिकून आलेले नसतोच. शिकण्यानं आणि सरावानं कोणतंही काम कुणालाही जमू शकतं, आता या विधानावर आपलं एकमत असावं..!

2 Comments
 1. Yogesh Kamble says

  अगदी मान्य आहे. मला वाटतय कि घरगुती कामाबद्दल ची जी पुरुषाची भूमिका आहे ती बदलणे खूप महत्वाचे आहे. हा सकारात्मक बदल घडवून आणणे दोघांना हि खूप कठीण आहे पण अशक्य नाही. या कामा बद्दलचा दृष्टीकोन बदलायची सुरवात घरकामाकडे महत्वपूर्ण आणि आदरपूर्वक बघण्यापासून आणि आत्मसात करण्यापासून सुरवात झाली पाहिजे.

  1. I सोच says

   तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे योगेश…
   तुम्ही तुमचे मत मांडलेत त्याबद्दल आम्ही आभारी आहोत… इतर मुद्द्यांवरही तुमचे मत नक्की मांडा…या मुद्द्यांवर चर्चा आणि संवाद घडवून आणणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.