निरोधला विरोध…

0 1,977

वाचक मित्र – मैत्रिणींनो, गेल्या महिन्यामध्ये आपण ‘कंडोमच्या जाहिराती दिवसा दाखवण्यावर केंद्र शासनाने घातलेली बंदी योग्य आहे का ?’ हा पोल प्रकाशित केला होता. एकूण १८६१ जणांनी त्यावर आपले मत दिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ६३ टक्के लोकांनी या निर्णयाच्या विरोधात मत व्यक्त केलं तर ३४ टक्के लोकं या निर्णयाशी सहमत होते तर ३ टक्के लोकांची याबाबत काहीच भूमिका नव्हती.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घालताना म्हटले आहे की,   ‘कंडोमच्या जाहिराती या काही विशिष्ट वयांच्या लोकांसाठी आहे आणि या जाहिरातींचा लहान मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि जर या जाहिराती दाखवायच्या असतील तर त्या रात्री १० ते सकाळी ६ या वेळात दाखवता येऊ शकतात’.

कंडोमच्या जाहिरातींवर घालण्यात आलेली बंदी खरंच योग्य आहे का?  तसं पाहिलं तर कंडोमच्या वापराविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की, निरोध ही सर्वात सुरक्षित आणि निर्धोक गर्भनिरोधन पद्धत आहे शिवाय एच. आय. व्ही. सारख्या अनेक लैंगिक आजारांपासून वाचण्यासाठीही कंडोमचा वापर ही एक प्रभावी पद्धत आहे. स्त्रियांसाठी असलेल्या गर्भनिरोधन पद्धतीत वापरली जाणारी साधने स्त्रियांच्या शरीरात जाणारी असतात त्यामुळे ती स्त्रियांच्या शरीरावर विपरीत परिणाम करतात. उदा. कॉपर-टी, गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन्स, ई.

मासिक पाळी, दोन – तीन बाळंतपणं, एखादा गर्भपात, स्त्री नसबंदी, गर्भनिरोधन साधने या साऱ्यातून जाताना स्त्रियांना कितीतरी त्रास सहन करावे लागतत. लैंगिक आणि प्रजनन आरोग्याचे अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. स्त्रीकडे निसर्गतः गर्भधारणा आणि बाळंतपणाची जबाबदारी आहे त्यामुळे गर्भनिरोधनाची जबाबदारी पुरुषांनी घेणे आवश्यक आहे.

सरकारच्या या निर्णयाकडे दोन पातळ्यांवर पाहता येईल. एकीकडे पुरुषांसाठीचं कंडोम हे एकमेव गर्भनिरोधन साधन आहे आणि त्याच्याही वापराबाबत पुरुषांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उदासीनता असलेली आपल्याला दिसून येते. तसेच कंडोमचा वापर न करण्यामागे समाजातील मर्दानगीच्या धारणा आणि काही प्रमाणात संकोच ही कारणे देखील दिसतात. स्त्रियांवर असलेली गर्भनिरोधनाचा अतिरिक्त ताण कमी करायचा असेल तर यावरचा एकमेव मार्ग म्हणजे जाहिरातींच्या माध्यमातून कंडोमच्या वापरला प्रोत्साहन देणे पण सरकारची भूमिका याच्या अगदीच विरोधातील दिसते.

दुसरी गोष्ट म्हणजे या बंदीच्या मागचं जे कारण सरकारकडून दिलं गेलंय ते खरंतर हास्यास्पद म्हणावं असंच आहे. हे म्हणजे असं आहे की, दिवस उगवू नये म्हणून कोंबड झाका. अप्रत्यक्षपणे सरकार असं म्हणू पाहतंय की, या जाहिरातींमुळे मुला-मुलींना लहान वयात लैंगिक संबंधाबद्दल माहिती होते आणि त्यामुळे ती बिघडतात. रात्री १० ते ६ मुलं टी. व्ही. बघतच नाहीत जणू! आयपीलच्या जाहिरातींबद्दल किंवा स्तन (सुडौल) आणि सेक्स स्टॅमिना वाढविण्याच्या वर्तमान पत्रातील जाहिरातींच्या माध्यमातून लैंगिकतेविषयी चुकीचे समज पसरविणाऱ्या जाहिरातीविरुद्ध कोणीच बोलत नाही.

कंडोमच्या जाहिराती बंद झाल्या तरी मुलं-मुली वयात येणं बंद होणार नाहीये आणि महत्वाचं म्हणजे या जाहिरातींच्या व्यतिरिक्त अनेक माध्यमातून मुला-मुलींपर्यंत लैंगिक संबंधांबद्दल माहिती पोहचतच असते.  बऱ्याचदा अशी माहिती शास्त्रीय नसण्याची शक्यताच अधिक असते. अशावेळी आपल्या मुलांना लहानपणापासूनच टप्याटप्याने योग्य भाषेत, शास्त्रीय पद्धतीने आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने माहिती दिली तर त्यांच्या आपल्या निकोप वाढ होईल नाही का? शरीरात होणारे बदल, सेक्स, लैंगिक आवड, कल, प्रेम संबंध लैंगिक आरोग्य, प्रजनन, गर्भनिरोधन अशा सर्वच गोष्टींबद्दल मुलांशी बोलणं गरजेचं आहे. लैंगिक सुखाबरोबरच, लैंगिक शोषण म्हणजे काय, स्पर्शाचे अर्थ, लैंगिक नाती, त्यातलं नियंत्रण, दबाव आणि स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. लैंगिक नात्यांबद्दल असणाऱ्या कल्पना, भावना मोकळेपणाने सांगणं, विश्वास आणि आदर निर्माण करणं गरजेचं आहे.

अशा रीतीने, लहानपणापासूनच आपण मुलांना टप्याटप्याने माहिती दिली तर अशी वेळ येणार नाही. गर्भनिरोधन ही स्त्री आणि पुरुष दोघांचीही जबाबदारी आहे, हा विचार समाजात रुजवणं आणि कृती आत्मसात करण्याच्या दिशेने पावलं उचलणं आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.